आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड लसीकरण अभियानात खाजगी क्षेत्रांच्या सहभागात वाढ
आयुष्मान भारत-पीएमजय योजनेअंतर्गत सुमारे 10,000 रुग्णालये आणि सीजीएचएस योजनेअंतर्गत 687 रुग्णालयांचा राज्यांना कोविड लसीकरण केंद्र म्हणून वापर करता येणार
राज्य सरकारांची आरोग्य विमा योजना लागू असणाऱ्या सर्व खाजगी रुग्णालयांचा कोविड लसीकरण केंद्र म्हणून वापर करण्याचे राज्य सरकारांना स्वातंत्र्य
सर्व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याच्या आरोग्य सुविधा आणि सरकरी आरोग्य सुविधांचा वापरही लसीकरण केंद्र म्हणून करण्याची राज्यांना परवानगी
कोविड लसीकरण केंद्र म्हणून कार्यरत खाजगी रुग्णालये लसीकरणाचे शुल्क आकारू शकतील,मात्र ते प्रति व्यक्ती/मात्रा 250 रुपयांपेक्षा अधिक नसावे
Posted On:
27 FEB 2021 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2021
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव राजेश भूषण यांनी आज दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव तसेच राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या महासंचालकांशी विशिष्ट वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरण मोहिमेविषयी चर्चा केली.
देशभरात, कोविड-19 ची लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021 रोजी सुरु झाली. या दिवसापासून आरोग्य कर्मचाऱ्याना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. तर दोन फेब्रुवारी 2021 पासून यात पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचाही समावेश करण्यात आला. आतापर्यंत, 1.5 कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे.
आता या देशव्यापी लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली असून खालील वयोगटातील नागरिकांसाठीची लसीकरण मोहीम 1 मार्च 2021 पासून सुरु होणार आहे.
- 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक; आणि,
- काही विशिष्ट सहव्याधी असलेले, 45 ते 59 या वयोगटातील नागरिक
कोविड लसीकरणाच्या क्षमतेत मोठी वाढ करण्याच्या दृष्टीने, आता या मोहिमेत खाजगी क्षेत्रांचाही सहभाग घेतला जाणार आहे. आयुष्मान भारत-पीएमजय योजनेअंतर्गत नोंदणी झालेली सुमारे 10,000 खाजगी रुग्णालये आणि सीजीएचएस योजनेअंतर्गत समाविष्ट 600 पेक्षा अधिक रुग्णालये तसेच, राज्य सरकारांच्या विमा योजना लागू असलेली खाजगी रुग्णालये या सर्वांचा वापर कोविड लसीकरण केंद्र म्हणून करता येणार आहे. राज्य सरकारांच्या आरोग्य विभागांनी याआधीच, अशा निकषांत बसणाऱ्या खाजगी रुग्णालयांशी यासंदर्भात चर्चा सुरु केली असून या मोहिमेत सहभागी होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जात आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आणि राष्ट्रोय आरोग्य प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर अशा खाजगी रुग्णालयांची यादी टाकण्यात आली आहे.
a) https://www.mohfw.gov.in/pdf/CGHSEmphospitals.xlsx
b) https://www.mohfw.gov.in/pdf/PMJAYPRIVATEHOSPITALSCONSOLIDATED.xlsx
त्याशिवाय, सरकारी आरोग्य सुविधांचा वापरही कोविड लसीकरण केंद्र म्हणून करता येईल. जसे की वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, उपविभागीय रुग्णालये, प्रमाणित आरोग्य सुविधा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र आणि आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्र यांचा समावेश आहे. जिथे कोविड केंद्र असतील त्यांचे जीपीएस सुविधेसह जीओ संदर्भ नकाशे देखील तयार करण्यात आले असून हा डेटा राज्यांनाही दिला जाणार आहे.
सरकारी कोविड लसीकरण केंद्रात लसीकरण मोफत राहणार असून त्याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार वहन करेल.
ज्या सर्व खाजगी आरोग्य रुग्णालयांचा वापर सरकारी कोविड लसीकरण केंद्र म्हणून केला जाणार आहे, त्यांनी संपूर्ण नियम- प्रक्रीयेचे , गुणवत्तेचे आणि सुरक्षिततेचे कठोर पालन करायचे आहे. यात राष्ट्रीय कोविन तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मशी त्यांनी संलग्न असायचे आहे. सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी पुरेशी जागा, पुरेशी शीतसाखळी व्यवस्था, लस देणाऱ्यांची पुरेशी संख्या आणि काही विपरीत परिणाम झाल्यास ती परिस्थिती हाताळण्याची क्षमता असणे अनिवार्य असेल.
राज्यांना या लसीकरणासाठी तीन पद्धतीने नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. ती म्हणजे, आगावू स्वयं नोंदणी, प्रत्यक्ष जागेवर नोंदणी आणि सुविधात्मक सहकारी नोंदणी.
तसेच, लसीकरण केंद्र म्हणून कार्यरत खाजगी रुग्णालये, लसीकरणाचे शुल्क आकारू शकतील,मात्र ते प्रती व्यक्ती/प्रती मात्रा 250 रुपयांपेक्षा अधिक नसावे. यात, या मोहिमेसाठी; लागणार्या इलेक्ट्रोनिक आणि वित्तीय व्यवस्थापनाचा खर्चही समाविष्ट असेल. खाजगी रुग्णालयांना कोविन-2.0 चा प्रभावी वापर करण्याची सुविधा मिळावी, यासाठी युजर नेम आणि पासवर्ड देखील दिला जाईल, याविषयीही आजच्या बैठकित चर्चा झाली.
त्याशिवाय, खाजगी सुविधांचे आणि जवळपासच्या शीतसाखळी सुविधांचे मैपिंग करण्यात आले असून, लसीचे वितरण नीट व्हावे, यासाठी ही माहिती देखील राज्यांना पुरवली जाणार आहे.
नोंदणी झालेल्या, 45-59 वर्षे वयोगटातील विशिष्ट 20 सहव्याधीपैकी एखादा आजार असलेल्या, व्यक्तींना प्रमाणित करण्याची सोपी व्यवस्थाही सर्व राज्यांना समजावून सांगण्यात आली. कोणत्याही नोंदणीकृत डॉक्टरची स्वाक्षरी असलेले एका पानाचे प्रमाणपत्र परिशिष्ट -1 मध्ये आहे. स्वयंनोंदणी करतांना, हे प्रमाणपत्र कोविन ऐप वर लाभार्थ्यांना स्वतःच अपलोड करता येईल किंवा कोविड लसीकरण केंद्रावर त्याची मुद्रित प्रत (हार्ड कॉपी) सोबत नेता येईल.
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701421)
Visitor Counter : 431