पोलाद मंत्रालय
आत्मनिर्भर भारत घडवण्यात धातू आणि खाण क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावू शकतात- धर्मेंद्र प्रधान
विशेष प्रकारच्या पोलादासाठी पीएलआय योजनेचा लाभ घेण्याचे आणि देशात नवीन उत्पादक व्यवस्था विकसित करण्याचे उद्योगाला केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
24 FEB 2021 7:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2021
धातू आणि खाण क्षेत्र आत्मनिर्भर भारत घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले आहे. 58 व्या राष्ट्रीय धातुशास्त्रज्ञ दिनी भारतीय धातू संस्थेच्या (आयआयएम) 74 व्या वार्षिक तांत्रिक बैठकीत ते बोलत होते. हे क्षेत्र अतिशय सचेतन आणि निरंतर विकसित होणारे क्षेत्र आहे आणि त्यामध्ये केवळ या क्षेत्रासाठीच नव्हे तर अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी प्रचंड क्षमता आणि विकासाची हमी आहे, असे त्यांनी सांगितले. सरकारने विशेष प्रकारच्या पोलादासाठी उत्पादन आधारित योजना (पीएलआय) जाहीर केली आहे आणि स्वदेशी उत्पादनाला चालना देण्यासाठी या क्षेत्रातील ही एक मोठी सुधारणा आहे, असे ते म्हणाले. उद्योगाने या अतिशय महत्त्वाच्या उपक्रमाचा पुरेपूर फायदा घेण्याचे आणि देशात नवीन उत्पादक व्यवस्था विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या देशातील नैसर्गिक साधनसंपत्ती देशवासीयांच्या मालकीची आहे ही सरकारची स्पष्ट भूमिका आहे, म्हणूनच, आम्ही नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वितरणासाठी पारदर्शक, जबाबदार यंत्रणेचा अंगिकार केला आहे, असे त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्प 2021 हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण, प्रगतीशील आणि विकासाभिमुख असल्याचे सांगत प्रधान म्हणाले की भविष्यासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर त्यामध्ये अभूतपूर्व भर देण्यात आला आहे. यामुळे निश्चितच पोलादाची मागणी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धातूंची मागणी वाढवण्याची क्षमता असणार्या रेल्वे, रस्ते आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासारख्या मुख्य क्षेत्रातील गुंतवणूकीत मोठी वाढ दिसून आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
विकसित पोलाद आणि मिश्र धातुंच्या क्षेत्रात बौद्धिक संपदा आणि तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जेणेकरून देशातील महत्वपूर्ण गरजा देशातच पूर्ण होऊ शकतील आणि निर्यातीची क्षितिजे विस्तारतील, असे ते म्हणाले. आयआयटीमध्ये उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यास देखील मंजुरी देण्यात आली आहे. लोह व पोलाद क्षेत्रात राष्ट्रीय महत्त्व असलेल्या संयुक्त संशोधन प्रकल्पाना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय पोलाद संशोधन आणि तंत्रज्ञान अभियानाची स्थापना करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
आयआयएमच्या अमृत महोत्सवानिमित्त अभिनंदन करताना प्रधान म्हणाले की, स्वातंत्र्यापूर्वी 1946 मध्ये स्थापन झालेली ही संस्था आजही भरभराटीला येत असून देशाच्या विकासात हातभार लावत आहे ही फार अभिमानाची बाब आहे. "आत्मनिर्भर भारत" मध्ये भरीव योगदान देण्यासाठी सध्याचे स्वदेशी बनावटीवर आणि नवनिर्मितीवर भर देण्याचे धोरण अधिक व्यापक करण्याचे आवाहन त्यांनी केले.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1700544)
आगंतुक पटल : 165