पंतप्रधान कार्यालय

आयआयटी खरगपूरच्या 66 व्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधानांनी संबोधित केले


स्वयं-जागरूकता, आत्मविश्वास आणि नि:स्वार्थपणाचा दिला मंत्र

Posted On: 23 FEB 2021 4:01PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयआयटी खरगपूरच्या 66 व्या दीक्षांत समारंभाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले. केंद्रीय शिक्षणमंत्री  रमेश पोखरियाल निशंक आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान म्हणाले की हा दिवस फक्त आयआयटीमधील पालक आणि शिक्षकांसाठीच महत्वाचा नाही तर नवीन भारतासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे कारण विद्यार्थी संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतात. देशातील कोट्यावधी लोकांचे जीवन बदलू शकतील अशा स्टार्टअप्स आणि नाविन्यपूर्ण गोष्टींच्या दिशेने काम  करण्याचे आवाहन त्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना केले. ते म्हणाले की आज त्यांनी जी पदवी मिळवली आहे  ती लाखो लोकांच्या आकांक्षाचे प्रतिनिधित्व करते, ज्या त्यांना पूर्ण करायच्या आहेत .

उद्यासाठी नवसंशोधन करण्यासाठी भविष्याच्या गरजा लक्षात घेणे ही काळाची गरज आहे असे पंतप्रधान म्हणाले. अभियंत्यांकडे  गोष्टीकडे  अधिक तपशीलवार  पाहण्याची क्षमता असते आणि ही जाणीव  भविष्यात नवीन शोध आणि नवीन संशोधनाचा आधार निर्माण करते. कोट्यवधी लोकांचे जीवन सुधारणारे आणि  देशाच्या  संसाधनांची बचत करू शकतील असे  उपाय शोधण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांच्या मनातल्या शंका व अडथळे यावर मात करण्यासाठी सेल्फ 3  हा मंत्र अवलंबण्यास सांगितले. ते म्हणाले की सेल्फ 3 म्हणजे स्वयं -जागरूकता, आत्मविश्वास आणि निस्वार्थ वृत्ती  आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता ओळखून पुढे जाण्याचा, पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा, निःस्वार्थ वृत्तीने  पुढे वाटचाल करण्याचा सल्ला दिला.

पंतप्रधान म्हणाले की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात घाई करण्याला  कोणतेही स्थान नाही. तुम्ही करत  असलेल्या नाविन्यपूर्ण संशोधनात तुम्हाला कदाचित पूर्ण यश मिळणार नाही, असेही ते म्हणाले.  परंतु तुमचे हे अपयश देखील यश मानले जाईल, कारण तुम्ही त्यापासून देखील काहीतरी शिकाल. ते म्हणाले की, 21 व्या शतकात बदलत्या मागण्या आणि नवीन भारताच्या आकांक्षांची पूर्ती करण्यासाठी आयआयटीला भारतीय तंत्रज्ञान संस्था ते स्वदेशी तंत्रज्ञान संस्था असे  पुढच्या स्तरावर नेण्याची गरज आहे.

मोदी म्हणाले की, जेव्हा जग जागतिक हवामान बदलांच्या आव्हानांशी झगडत आहे, तेव्हा भारत आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (आयएसए) ही कल्पना घेऊन पुढे आला, आणि स्थापनाही केली.  ते म्हणाले, आज भारत त्या देशांपैकी एक आहे जिथे प्रति युनिट सौर ऊर्जेची किंमत खूप कमी आहे. परंतु घरोघरी सौर ऊर्जा देण्यात अजूनही  अनेक आव्हाने आहेत. ते म्हणाले की भारताला अशा तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे जे पर्यावरणाचे कमीतकमी नुकसान करेलटिकाऊ असेल आणि वापरायला सुलभ असेल.

पंतप्रधान म्हणाले की आपत्ती व्यवस्थापन हा एक विषय आहे ज्यासाठी  जग भारताकडे पाहत आहे. जीवनासह मोठ्या आपत्तींमध्ये पायाभूत सुविधांवर सर्वाधिक परिणाम होतो. दोन वर्षापूर्वी हे लक्षात येताच भारताने संयुक्त राष्ट्रात आपत्ती निवारण पायाभूत सुविधा स्थापण्यासाठी पुढाकार घेतला,

पंतप्रधानांनी उद्योग 4.0 साठी महत्त्वपूर्ण नवसंशोधनावर  भर दिला. औद्योगिक स्तरावर इंटरनेट ऑफ थिंग्स आणि आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान यासह कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित शैक्षणिक संशोधनात बदल घडवून आणण्यासाठी आयआयटी खरगपूरच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले की आयआयटी खरगपूरचे सॉफ्टवेअर संशोधन  कोरोनाविरूद्ध लढ्यातही उपयुक्त ठरले. आरोग्य तंत्रज्ञानातील  भविष्यातील उपायांवर वेगाने कार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले. ते म्हणाले, वैयक्तिक आरोग्यसेवा उपकरणांसाठी एक प्रचंड बाजारपेठ उदयाला आली आहे. ते म्हणाले की आरोग्य आणि तंदुरुस्तीशी संबंधित उपकरणांची बाजारपेठही वाढत आहे. ते म्हणाले, भारतात परवडणारी आणि अचूक अशी वैयक्तिक आरोग्यसेवा उपकरणे पुरवण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे.

पंतप्रधान म्हणाले की कोरोना नंतर विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि नाविन्यपूर्ण संशोधन क्षेत्रात भारत एक प्रमुख जागतिक नेतृत्व म्हणून उदयास आला आहे. या प्रेरणेसह विज्ञान आणि संशोधनाच्या तरतुदीत मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने नकाशा व भू-स्थानिक डेटा नियंत्रणापासून मुक्त केला आहे. हे पाऊल टेक स्टार्टअप इकोसिस्टमला मोठे बळ  देईल, स्वावलंबी भारतासाठी मोहीम अधिक तीव्र करेल आणि देशातील तरूण स्टार्ट-अप आणि नवसंशोधकांना नवीन स्वातंत्र्य देईल.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्याबाबत पंतप्रधानांनी आयआयटी खरगपूरच्या प्रयत्नांचे कौतुक केले. आपल्या भविष्यातील नवसंशोधनाचे  सामर्थ्य म्हणून ते ज्या प्रकारे  ज्ञान आणि विज्ञानाचा शोध घेत आहेत त्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. त्यांनी स्वातंत्र्याच्या  75 व्या वर्षानिमित्त संस्थेने केलेली 75 प्रमुख संशोधने संकलित  करण्याचे आणि ती देश आणि जगापर्यंत पोहचवण्याचे आवाहन संस्थेला केले  ते म्हणाले की या प्रेरणा देशाला नवीन चालना देतील आणि आत्मविश्वास वाढवतील.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1700192) Visitor Counter : 78