पंतप्रधान कार्यालय

आसाममध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 22 FEB 2021 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2021

 

भारत माता की – जय,

भारत माता की – जय,

भारत माता की – जय।

धेमाजिर हारुवा भूमिर परा अखमबाखीक एई बिखेख दिनटोट मइ हुभेच्छा आरु अभिनंदन जनाइछो !

मंचावर  उपस्थित आसामचे राज्यपाल प्राध्यापक  जगदीश मुखी , इथले लोकप्रिय  यशस्वी मुख्यमंत्री  सर्वानंद सोनोवाल , केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी  धर्मेंद्र प्रधान , रामेश्वर तेली , आसाम सरकारमधील  मंत्री डॉक्टर हिमंता बिश्वा सरमा , राज्य सरकारचे अन्य मंत्रीगण, खासदार , आमदार , आणि विशाल संख्येने उपस्थित आसामच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

हे माझे सौभाग्य आहे की आज मला तिसऱ्यांदा धेमाजी इथे येण्याचे, तुम्हा सर्वाना भेटण्याचे सौभाग्य लाभले, आणि दरवेळी इथल्या लोकांची आत्मीयता, इथल्या लोकांची आपुलकी , इथल्या लोकांचा  आशीर्वाद मला जास्तीत जास्त मेहनत करण्याची, आसामसाठी , ईशान्य प्रदेशासाठी काही ना काही नवे करण्याची प्रेरणा देत राहतो. जेव्हा मी इथे गोगामुखमध्ये भारतीय कृषी संशोधन संस्थेचा शिलान्यास करण्यासाठी आलो होतो तेव्हा मी म्हटले होते कि ईशान्य प्रदेश भारताच्या विकासाचे नवे इंजिन बनेल. आज आपण हाच विश्वास आपल्या डोळ्यांसमोर साकार होताना पाहत आहोत.

बंधू आणि भगिनींनो

ब्रह्मपुत्रच्या याच उत्तरेकडील किनाऱ्यावरून आठ दशकांपूर्वी आसामच्या चित्रपटांनी आपला प्रवास जॉयमती चित्रपटासह सुरु केला होता. या क्षेत्राने आसामच्या संस्कृतीचा गौरव वाढवणारी अनेक व्यक्तिमत्वे दिली आहेत. रूपकुंवर ज्योति प्रसाद अग्रवाल असतील, कलागुरू बिश्नु प्रसाद राभा असतील, नचसूर्य फणि सरमा असतील, यांनी आसामची ओळख नव्या उंचीवर पोहचवली. भारतरत्न डॉ  भुपेन हज़ारिका यांनी लिहिले होते - लुइतुर पार दुटि जिलिक उठिब राति, ज्बलि हत देवालीर बन्ति। ब्रह्मपुत्रचे दोन्ही किनारे दिवाळीत जळणाऱ्या दिव्यांनी प्रकाशमय होतील आणि काल मी विशेषतः  सोशल मीडियावर पाहिले देखील की तुम्ही या क्षेत्रात कशी दिवाळी साजरी केली , कसे हजारो दिवे पेटवले. दिव्यांचा तो प्रकाश, शांतता आणि स्थायित्व यामध्ये आसाममध्ये होत असलेल्या विकासाचे चित्र देखील  आहे.  केंद्र आणि आसाम सरकार मिळून राज्याच्या समतोल विकासासाठी प्रयत्न करत आहेत. आणि आसामच्या पायाभूत सुविधा  या विकासाचा एक मोठा आधार आहेत.

मित्रानो,

उत्तर किनाऱ्यावरील भागात भरपूर सामर्थ्य असूनही पूर्वीच्या सरकारांनी या क्षेत्राबरोबर सापत्नभावाचा व्यवहार केला. इथली संपर्क व्यवस्था असेल, रुग्णालये असतील, शैक्षणिक संस्था असतील, उद्योग असतील, यांना यापूर्वीच्या सरकारांनी प्राधान्य दिल्याचे दिसत नाही.  सबका साथ-सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्रानुसार काम करत असलेल्या आमच्या  सरकारने, सर्वानंदजी यांच्या सरकारने हा भेदभाव दूर केला आहे . ज्या  बोगीबील पुलाची या प्रदेशाला अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती , त्याचे काम आमच्या  सरकारने वेगाने पूर्ण केले. उत्तरेकडील किनाऱ्यावर  ब्रॉड गेज रेलवे मार्ग आमचे सरकार आल्यानंतरच होऊ शकला.  ब्रम्हपुत्रवर दुसरा कलियाभुमुरा पूल इथली कनेक्टिविटी आणखी जास्त वाढवेल. त्याचे काम देखील वेगाने पूर्ण केले जात आहे.  उत्तर किनाऱ्यावरील भागात  चार-पदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम देखील वेगाने सुरु आहे . गेल्या आठवड्यातच महाबाहू ब्रह्मपुत्र इथून जलमार्ग जोडणी संदर्भात नवीन कामांचा प्रारंभ करण्यात आला. बोंगाइगांव मधील जोगीघोपा येथे एक मोठे टर्मिनल आणि लॉजिस्टिक्स पार्कचे  काम देखील सुरु झाले आहे.

मित्रानो

याच शृखंलेत आज आसामला  3 हजार कोटी रुपयांहून अधिक ऊर्जा आणि शिक्षण संबंधित पायाभूत प्रकल्पांची एक नवी भेट मिळत आहे. धेमाजी आणि  सुआलकुची मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय असेल, बोनगई गावच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या  विस्ताराचे काम असेल, डिब्रुगढ़ मध्ये सेकेंड्री टैंक फार्म असेल किंवा मग  तिनसुखिया येथील गैस कंप्रेसर स्टेशन, हे प्रकल्प ऊर्जा आणि शिक्षण याचे केंद्र म्हणून या प्रदेशाची ओळख सशक्त करतील. हे प्रकल्प आसाम बरोबरच वेगाने मजबूत होत असलेल्या  पूर्व भारताचे देखील प्रतीक आहेत.

मित्रानो,

आत्मनिर्भर भारतासाठी आपले  सामर्थ्य, आपल्या क्षमता यामध्ये सातत्याने वाढ करणे हे देखील  अत्यंत आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात आम्ही भारतातच  रिफायनिंग आणि आपत्कालीन वापरासाठी तेल साठवणूक क्षमता यात मोठी वाढ केली आहे.  बोंगइगांव रिफाइनरीमध्येही रिफायनिंग क्षमता वाढवण्यात आली आहे. आज ज्या गॅस  यूनिटचे  लोकार्पण करण्यात आले त्यामुळे इथली  एलपीजी उत्पादन क्षमता वाढणार आहे . या सर्व प्रकल्पांमुळे आसाम आणि ईशान्य प्रदेशात लोकांचे जीवन सुलभ होईल आणि युवकांसाठी  रोजगाराच्या संधी देखील वाढतील.

बंधू आणि भगिनींनो

जेव्हा एखाद्या व्यक्तीला  मूलभूत सुविधा मिळतात, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास खूप वाढतो. हा वाढणारा आत्मविश्वास त्या भागाचाही विकास करतो आणि देशाचाही विकास करतो. आज आमचे  सरकार त्या लोकांपर्यंत, त्या भागांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे जिथे यापूर्वी  सुविधा पोहचल्या नाहीत. आता  व्यवस्थेने त्यांना  सुविधा पुरवण्यावर भर दिला आहे . यापूर्वी लोकांनी सगळे काही नशिबावर सोडून दिले होते. तुम्ही विचार करा ,  2014 पर्यंत , देशातील दर  100 कुटुंबांपैकी केवळ 50-55 कुटुंबे म्हणजेच जवळपास निम्म्या घरांमध्ये स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी होती. आसाममध्ये तर  रिफाइनरी आणि अन्य सुविधा असूनही  100 पैकी  40 लोकांकडेच गॅस जोडणी  उपलब्ध होती.  60 लोकांकडे नव्हती.  गरीब भगिनी-मुलींचे स्वयंपाकघरातील धूर आणि आजारांच्या जाळ्यात राहणे हा त्यांच्या आयुष्यातील नाईलाज होता. आम्ही उज्वला योजनेच्या माध्यमातून ही  स्थिति बदलली. आसाममध्ये आज गॅस जोडणीची व्याप्ती सुमारे शंभर टक्क्यांच्या जवळ पोहचली आहे . इथे बोंगईगांव रिफायनरीच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्येच  2014 नंतर 3 पटीने अधिक एलपीजी जोडण्या वाढल्या आहेत. आता यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आणखी  1 कोटी  गरीब बहिणींना उज्वलाची मोफत एलपीजी जोडणी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मित्रानो,

गॅस जोडणी असेल, वीज जोडणी असेल, खत  उत्पादन असेल, यात घट झाल्यास सर्वात जास्त नुकसान आपल्या देशातील गरीबांचे, छोट्या शेतकऱ्यांचे होते. स्वातंत्र्यानंतर इतक्या दशकानंतरही ज्या 18 हजार गावांमध्ये वीज पोहचली नव्हती, त्यापैकी बहुतांश गावे आसाममधील होती, ईशान्य प्रदेशातील होती.  पूर्व  भारतातील अनेक खत  कारखाने गॅसच्या अभावी बंद पडले किंवा आजारी घोषित केले गेले. भोगावे कुणाला लागले ? इथल्या गरीबाला, इथल्या मध्यम वर्गाला, इथल्या तरुणाला, यापूर्वीच्या चुका सुधारण्याचे काम आमचे सरकारच करत आहे.  आज पंतप्रधान ऊर्जा गंगा योजनेअंतर्गत पूर्व भारताला जगातील सर्वात मोठया  गॅस पाइपलाइनपैकी एकच्या माध्यमातून जोडले जात आहे. धोरण योग्य असेल, हेतू चांगला असेल, तर नीयत देखील बदलते,  नियति देखील बदलते. वाईट हेतू नष्ट होतो, आणि नियती  जन – जनचे भाग्य देखील बदलून टाकते. आज देशात गॅस पाइपलाइनचे जे नेटवर्क तयार होत आहे, देशातील प्रत्येक गावापर्यंत  ऑप्टिकल फायबर जाळे पसरले जात आहे,  प्रत्येक घरात पाणी पोहचवण्यासाठी  पाइप बसवले जात आहेत, भारतमातेच्या कुशीत या ज्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत त्या केवळ पोलादी पाईप किंवा फायबर नाहीत. त्या तर भारतमातेच्या नवीन  भाग्यरेषा आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

आत्मनिर्भर भारत अभियानाला वेग देण्यामध्ये आपल्या संशोधकांनी, आपल्या अभियंत्यांनी, तंत्रज्ञांनी तयार केलेल्या बौद्धिक सेतूची खूप मोठी भूमिका आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशामध्ये असे काही वातावरण तयार करण्याचे काम होत आहे, ज्याठिकाणी देशातले नवयुवक समस्यांवर उपाय योजना करण्यासाठी नव-नवीन संकल्पनांचे नव्या पद्धतीने स्टार्टअप्स आणत आहेत. आज संपूर्ण दुनिया भारताचे अभियंते, भारताचे तंत्रज्ञ यांचे कार्य वाखाणत आहे. आसामच्या युवकांमध्ये तर अतिशय अद्भूत क्षमता आहे. या क्षमता वृद्धीसाठी राज्य सरकार अगदी जीव तोडून कार्य करीत आहे. आसाम सरकारच्या प्रयत्नांमुळेच आज इथे 20 पेक्षाही जास्त अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. आज धेमाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे लोकार्पण केले आणि सुआलकुची अभियांत्रिकी महाविद्यालयाचा शिलान्यास करण्यात आल्यामुळे अधिक स्थिती मजबूत होत आहे. धेमाजी अभियांत्रिकी महाविद्यालय तर उत्तरेकडच्या किनाऱ्यावरील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. अशाच प्रकारची आणखी तीन अभियांत्रिकी महाविद्यालये बनविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मला आज देण्यात आली आहे. कन्यावर्गासाठी विशेष महाविद्यालय असो , पॉलिटेक्निक महाविद्यालय असो , अथवा दुसऱ्या संस्था, आसाम सरकार यासाठी  इतक्या मोठ्या प्रमाणावर काम करीत आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

आसाम सरकार  येथे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणही लवकरात लवकर लागू करण्याचा प्रयत्न करीत आहे. या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा लाभ आसामला होणार आहे. इथल्या आदिवासी समाजाला, चहाच्या मळ्यामध्ये काम करणा-या माझ्या श्रमिक बंधू-भगिनींच्या मुलांना जास्त प्रमाणावर लाभ होणार आहे. यामागचे कारण म्हणजे, या धोरणानुसार येथे स्थानिक भाषेमध्ये शिक्षण दिले जाणार आहे आणि स्थानिक व्यवसायांशी संबंधित कौशल्य निर्मितीवर भर दिला जाणार आहे. ज्यावेळी स्थानिक भाषेमध्ये वैद्यकीय शिक्षण दिले जाईल, त्यावेळी स्थानिक भाषेमध्ये तंत्रज्ञानाशी संबंधित शिक्षणही दिले जाईल. आणि त्यामुळे गरीबातल्या गरीब मुलांनाही डॉक्टर, अभियंता बनता येईल आणि त्यांना देशाचे कल्याण करता येईल. गरीबातल्या गरीब मातापित्यांची स्वप्ने त्यांच्या मुलांना पूर्ण करता येईल. आसामसारख्या राज्यांत ज्याठिकाणी चहा, पर्यटन, हातमाग आणि हस्तकला आहे, या सर्व गोष्टी आत्मनिर्भर अभियानाला खूप मोठी शक्ती देणा-या आहेत. अशा ठिकाणी युववर्गाने ही कौशल्ये शाळा आणि महाविद्यालयामध्येच शिकली तर त्यांना खूप मोठा लाभ होऊ शकणार आहे. आत्मनिर्भरतेचा पाया तिथेच घातला जाणार आहे. यावर्षी अर्थसंकल्पामध्येही आदिवासी क्षेत्रामध्ये शेकडो नवीन एकलव्य आदर्श शाळा स्थापन करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्याचा लाभ आसामलाही मिळेल.

मित्रांनो,

ब्रह्मपुत्रेच्या आशीर्वादाने, या क्षेत्रातली जमीन अतिशय सुपीक आहे. इथले शेतकरी आपले सामर्थ्य अधिक वाढवू शकले, त्यांना शेतीसाठी आधुनिक सुविधा मिळू शकल्या तर त्यांचे उत्पन्न वाढेल. यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रित काम करीत आहे. शेतकरी बांधवांच्या बँक खात्यांमध्ये थेट पैसे हस्तांतर करायचे असतील, शेतकरी निवृत्तीवेतन योजना सुरू करायची असेल, त्यांना चांगले बियाणे द्यायचे असेल, मृदा आरोग्य पुस्तिका द्यायचे असेल, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करण्यात येत आहे. मत्स्यपालनावर विशेष भर दिला जात असतानाच आमच्या सरकारने मत्स्योद्योगाशी संबंधित एक नवीन मंत्रालय खूप पूर्वीच बनविले आहे. मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी जेवढा खर्च स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केला गेला नाही, त्याच्याही पेक्षा जास्त खर्च आता आमचे सरकार करीत आहे. मत्स्य उद्योगाशी संबंधित शेतकरी बांधवांना 20 हजार कोटी रुपयांची एक खूप मोठी योजनाही बनण्यात आली आहे. त्याचा लाभ आसाममधल्या मत्स्य उद्योगाशी जोडल्या गेलेल्या माझ्या बांधवांना मिळेल. सरकारचा प्रयत्न आहे की, आसामचा शेतकरी, देशाचा शेतकरी जे काही पिकवतो, ते आंतरराष्ट्रीय बाजारापर्यंत पोहोचले पाहिजे. यासाठीच कृषीसंबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

मित्रांनो,

आसामच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्तर किनारपट्टीवरील चहाच्या मळ्यांची खूप मोठी, महत्वपूर्ण भूमिका आहे. या चहा मळ्यांमध्ये काम करणा-या आमच्या बंधू-भगिनींचे जीवन सुकर बनावे, यासाठीही आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. राज्य सरकारने लहान लहान चहा उत्पादकांना जमिनीचे पट्टे देण्याचे अभियान सुरू केले आहे, यासाठी आसाम सरकारचे मी कौतुक करतो.

बंधू आणि भगिनींनो,

ज्या लोकांनी दशकांपर्यंत देशावर राज्य केले, त्यांनी दिसपूरला दिल्लीपासून खूप दूर मानले होते. या विचारामुळे आसामचे खूप मोठे नुकसान झाले. परंतु आता तुमच्यापासून दिल्ली काही दूर नाही. दिल्ली तुमच्या दरवाजासमोर उभी आहे. गेल्या वर्षामध्ये केंद्र सरकारच्या अनेक मंत्र्यांना शेकडो वेळा इथे पाठविण्यात आले. यामागचे कारण म्हणजे, त्यांना तुमच्या समस्या, अडचणी माहिती व्हाव्यात आणि प्रत्यक्षात जमिनी स्तरावर जे काही काम सुरू आहे, ते त्यांनी पहावे. तुमच्या आवश्यकता, गरजा लक्षात घेवून योजना बनविण्याची आवश्यकता आहे; आणि त्या दिशेने आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. तुम्हा सर्वांमध्ये येऊन आपल्या विकास यात्रेमध्येही मला सहभागी होता यावे, यासाठी मी सुद्धा अनेकवेळा आसामला आलो आहे. इथल्या नागरिकांना चांगले जीवन देण्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते सर्वकाही  आसामजवळ  आहे. आता आवश्यकता आहे ती विकासाची, प्रगतीची, याचे आता डबल इंजिन सुरू आहे. या डबल इंजिनाला आणखी मजबूत करण्याची, आणखी ताकद देण्याच्या संधी आता तुमच्याकडे येत आहेत. आसामच्या लोकांना मी विश्वास देऊ इच्छितो की, तुमच्या सहकार्याने, तुमच्या आशीर्वादाने, आसामच्या विकासामध्ये अधिक वेगाने काम करण्यात येईल, विकासाची नवीन उंची आसाम गाठेल.

बंधू आणि भगिनींनो,

तुम्ही सर्वजण निवडणुकीची वाट पहात असणार, हे मी जाणून आहे. मला चांगले आठवतेय की, गेल्यावेळी निवडणुका घोषित झाल्या होत्या, ती तारीख माझ्या आठवणीप्रमाणे बहुतेक 4 मार्च होती. यावेळीही मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये कधीही निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाचे हे काम आहे, ते काम आयोग करेल. परंतु माझा प्रयत्न असेल की, निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच मी शक्य तितक्या जास्त वेळा आसामला येईन. पश्चिम बंगालमध्ये जाईन, केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी या राज्यांनाही  भेट देण्याचा माझा प्रयत्न असेल. गेल्या वर्षी 4 मार्चला निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यंदा कदाचित त्या 7 मार्चला जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मधला थोडा काळ मिळेल,  त्यावेळी येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. तुमच्यामध्ये येण्याचा मी निरंतर प्रयत्न करीत राहणार आहे. बंधू भगिनींनो, आज इतक्या मोठ्या संख्येने येऊन तुम्ही मला तर आशीर्वाद दिले आहेत. विकासाच्या यात्रेसाठी तुम्ही सर्वांनी आपला विश्वास अधिक मजबूत केला आहे. यासाठी मी आपल्या सर्वांचे हृदयापासून आभार व्यक्त करतो. आणि या विश्वासानेच पुन्हा एकदा इतक्या  सर्व विकास योजनांसाठी, आत्मनिर्भर आसाम बनविण्यासाठी, भारताच्या निर्मितीमध्ये   आसामच्या योगदानासाठी, आसामच्या युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आसामचे मच्छिमार बांधव असो, आसामचे शेतकरी बांधव असो, माता- भगिनी असो, आसामचे माझे आदिवासी बंधू-भगिनी असो, प्रत्येकाच्या कल्याणासाठी आज ज्या अनेक योजनांचे लोकार्पण आणि शिलान्यास झाला आहे, त्यासाठी मी आपल्या सर्वांचे हृदयापासून खूप-खूप अभिनंदन करतो. खूप-खूप शुभेच्छा देतो.  दोन्ही हातांच्या मुठी बंद करून माझ्याबरोबर संपूर्ण ताकदीनिशी जयघोष करावा,

भारत माता की - जय!

भारत माता की - जय!

भारत माता की - जय!!

 

* * *

M.Chopade/S.Kane/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1700044) Visitor Counter : 278