पंतप्रधान कार्यालय
केरळमध्ये ऊर्जा आणि शहरी क्षेत्रातील प्रमुख प्रकल्पांच्या उद्घाटन आणि शिलान्यास प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
Posted On:
19 FEB 2021 11:35PM by PIB Mumbai
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन, मंत्रिमंडळातील माझे सहकारी आर. के. सिंह, हरदीपसिंग पुरी, इतर मान्यवर अतिथी,
मित्रहो,
नमस्कारम केरळ ! काही दिवसांपूर्वीच मी पेट्रोलियम क्षेत्राच्या प्रमुख प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी केरळमध्ये आलो होतो. आज, तंत्रज्ञानामुळे आपण पुन्हा एकदा जोडले गेलो आहोत. केरळच्या विकासाच्या प्रवासात आम्ही महत्त्वपूर्ण पावले उचलत आहोत. आज सुरू होणारी विकासकामे राज्यभरातील आहेत. विविध क्षेत्रांमधील आहेत. ती या सुंदर राज्याला सामर्थ्यवान आणि सक्षम करतील, जेथील लोक भारताच्या प्रगतीत भरीव योगदान देत आहेत. दोन हजार मेगावॅटची अत्याधुनिक पुगलूर-त्रिशूर हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट सिस्टमचे आज उद्घाटन होत आहे. नॅशनल ग्रिडशी केरळची ही पहिली एचव्हीडीसी आंतरजोडणी आहे. त्रिशूर हे केरळचे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे. आता हे केरळचे उर्जा केंद्रदेखील असेल. राज्यातील वीजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज हस्तांतरित करण्यात ही प्रणाली सहाय्यक ठरेल. पारेषणासाठी देशात प्रथमच व्हीएससी कन्व्हर्टर तंत्रज्ञान सादर केले आहे. . खरोखरच हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे.
मित्रहो,
केरळमधील अंतर्गत वीज निर्मितीचे स्रोत हंगामी आहेत. त्यामुळे राष्ट्रीय ग्रिडमधून वीज आयातीवर राज्य प्रामुख्याने अवलंबून आहे. ही दरी भरून काढायची होती. एचव्हीडीसी सिस्टम हे साध्य करण्यास आपल्याला मदत करते. आता विश्वासार्हतेसह वीज उपलब्ध होईल. घरगुती आणि औद्योगिक कारखान्यांना वीज पोहचवण्यासाठी आंतर -राज्य पारेषण नेटवर्क मजबूत करणे तितकेच महत्वाचे आहे. या प्रकल्पाबद्दल आणखी एक गोष्ट मला आनंदित करते. या प्रकल्पात वापरण्यात आलेली एचव्हीडीसी उपकरणे भारतात तयार केली आहेत. यामुळे आपली आत्मनिर्भर भारत चळवळ अधिक बळकट होते.
मित्रहो,
आपण केवळ एक पारेषण प्रकल्प समर्पित करत नाही. आपल्याकडे वीज निर्मितीचा प्रकल्प देखील आहे. स्वच्छ ऊर्जेचा आणखी एक प्रकल्प - 50 मेगावॅट क्षमतेचा कासारगोड सौर प्रकल्प समर्पित करताना मला आनंद होत आहे. आपल्या देशाचे हरित आणि स्वच्छ ऊर्जा स्वप्न साकार करण्यासाठी हे एक पाऊल असेल. भारत सौरऊर्जेला खूप महत्त्व देत आहे. सौर ऊर्जेमधील आपले लाभ हवामान बदलाविरूद्ध मजबूत लढा सुनिश्चित करतात: यातून आपल्या उद्योजकांना चालना मिळेल. आपल्या मेहनती शेतकर्यांना आपल्या अन्नदात्यांना ऊर्जादाता बनवण्यासाठी त्यांना सौर क्षेत्राशी जोडण्याचे काम चालू आहे
पीएम-कुसुम योजनेंतर्गत 20 लाख सौर उर्जा पंप शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत. गेल्या सहा वर्षांत, भारताची सौर ऊर्जा क्षमता 13 पटीने वाढली आहे. भारताने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या माध्यमातूनही जगाला एकत्र आणले आहे.
मित्रहो,
आपली शहरे विकासाची इंजिन आणि नावीन्यपूर्ण संशोधनाची प्रमुख केंद्र आहेत. आपली शहरे तीन उत्साहवर्धक कल पाहत आहेत: तांत्रिक विकास, मोठ्या लोकसंख्येचा अनुकूल लाभ , वाढती देशांतर्गत मागणी. या क्षेत्रातील वाढीसाठी आपल्याकडे स्मार्ट शहरे अभियान आहे. या अभियानाअंतर्गत एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर शहरांना उत्तम शहर नियोजन व व्यवस्थापनात मदत करत आहेत. मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की 54 कमांड सेंटर प्रकल्प कार्यरत आहेत. तर असे 30 प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यावर आहेत. ही केंद्रे विशेषत: महामारीच्या दिवसात उपयुक्त ठरली. केरळमधील दोन स्मार्ट शहरांपैकी कोची स्मार्ट शहराने यापूर्वीच कमांड सेंटर स्थापित केले आहे. तिरुअनंतपुरम स्मार्ट सिटी आता त्याच्या नियंत्रण केंद्रासाठी सज्ज झाली आहे. स्मार्ट शहरे अभियानाअंतर्गत कोची आणि तिरुअनंतपुरम या केरळच्या दोन स्मार्ट शहरांनी लक्षणीय प्रगती केली आहे. आत्तापर्यंत, दोन स्मार्ट शहरांमध्ये 773 कोटी रुपयांचे 27 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. सुमारे दोन हजार कोटींच्या 68 प्रकल्पांची कामे लवकरच सुरु होतील.
'अमृत' हा शहरी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणखी एक उपक्रम आहे. ' अमृत ' योजना शहरांना त्यांच्या सांडपाणी प्रक्रिया संबंधित पायाभूत सुविधा विस्तारण्यात आणि उन्नत करण्यात मदत करत आहे. केरळमध्ये अमृत अंतर्गत एक हजार एकशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे एकूण 175 पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. 9 अमृत शहरांमध्ये सार्वत्रिक व्याप्ती प्रदान केली आहे. आज आपण अरुविक्कारा येथे दररोज 75 दशलक्ष लिटर क्षमतेच्या जल शुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन करत आहोत. यासाठी 70 कोटी रुपये खर्च आला आहे. यामुळे सुमारे 13 लाख नागरिकांचे जीवन सुधारेल. माझे सहकारी मंत्री म्हणाले तसे या प्रकल्पातून तिरुअनंतपुरममध्ये दरडोई पाणीपुरवठ्यात आधीच्या 100 लिटर प्रतिदिन वरून 150 लिटर पर्यंत वाढ करण्यात मदत होईल.
मित्रहो,
आज आपण महान छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन भारतातील लोकांना प्रेरणा देते. विकासाचे लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी स्वराज्यवर भर दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा भारताच्या किनारपट्टीशी विशेष संबंध होता. एकीकडे त्याने मजबूत नौदल उभारले. तर दुसरीकडे, किनारपट्टीच्या विकासासाठी आणि मच्छिमारांच्या कल्याणासाठी त्यांनी काम केले. आम्ही त्यांची ही दूरदृष्टी पुढे सुरू ठेवत आहोत. भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर आहे. संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण सुधारणा केल्या आहेत. या प्रयत्नांमुळे अनेक प्रतिभावान भारतीय तरुणांसाठी संधी निर्माण होतील. त्याचप्रमाणे आपल्या देशाने किनारपट्टीच्या उत्कृष्ट पायाभूत सुविधांच्या दिशेने एक मोठी चळवळ सुरू केली आहे. भारत आपल्या नील अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करत आहे. आमच्या मच्छिमारांचे प्रयत्न आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. मच्छीमार समुदायांसाठी आमचे प्रयत्न अधिक पतपुरवठा , वाढते तंत्रज्ञान ,उत्कृष्ट दर्जाच्या पायाभूत सुविधा, सहाय्यक सरकारी धोरणे या बाबींवर आधारित आहेत. मच्छीमारांना आता किसान क्रेडिट कार्ड वापरता येईल. आम्ही अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहित करत आहोत जे समुद्रात दिशादर्शनासाठी मदत करतील. ते वापरत असलेल्या बोटींचे आधुनिकीकरण करण्याचे काम सुरू आहे. सरकारची धोरणे भारताला सीफूड निर्यातीचे केंद्र बनवणे सुनिश्चित करेल. या अर्थसंकल्पातच कोचीसाठी फिशिंग हार्बरची घोषणा करण्यात आली आहे.
मित्रहो,
महान मल्याळम कवी कुमारनशन म्हणाले होते: ताई, मी तुमची जात विचारत नाही, मी पाणी मागत आहे , मला तहान लागली आहे. विकास आणि सुशासन यांना जात, धर्म, वंश, लिंग, धर्म किंवा भाषा माहित नाही. विकास प्रत्येकासाठी आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास यांचे हेच मर्म आहे. विकास हे आमचे ध्येय आहे. विकास हा आमचा धर्म आहे. एकजूट आणि विकासाचे हे सामायिक स्वप्न साकारण्यासाठी पुढे वाटचाल करण्यासाठी मला केरळच्या जनतेची साथ हवी आहे. नंदी! नमस्कारम!
***
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1699584)
Visitor Counter : 219
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam