सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

“आत्मनिर्भर भारत” आणि “टाकाऊतून टिकाऊ” ला मोठे प्रोत्साहन; गडकरी यांच्या हस्ते आसाममध्ये अगरबत्ती काडी उत्पादन कारखान्याचे उद्‌घाटन

Posted On: 18 FEB 2021 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2021

मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज आसाममधील बजाली जिल्ह्यातील केसरी जैव उत्पादन एलएलपी नामक प्रमुख बांबू अगरबत्ती काडी उत्पादन कारखान्याचे आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्‌घाटन केले.

हा कारखाना ‘आत्मनिर्भर भारत’ च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून ‘टाकाऊतून टिकाऊ’ चे एक उत्तम उदाहरण आहे, या कारखान्यात अगरबत्ती काडीचे उत्पादन घेण्याव्यतिरिक्त बांबूच्या कचऱ्यापासून जैविक इंधन आणि इतर विविध उत्पादने तयार केली जातात. 10 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा अगरबत्ती काडी उत्पादन कारखाना 350 लोकांना थेट रोजगार उपलब्ध करून देईल तर 300 हून अधिक अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करेल.

चीन आणि व्हिएतनाममधून अगरबत्तीच्या कच्च्या मालाच्या आयातीवर बंदी घालण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाच्या अनुषंगाने आणि अगरबत्ती काडीसाठी लागणाऱ्या गोल बांबूवरील आयात शुल्कामध्ये होणारी वाढ पाहता आसाममध्ये हा कारखाना स्थापन करण्याच्या निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अगरबत्ती उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल या दोन्ही देशांमधून आयात होत असल्यामुळे भारतीय अगरबत्ती उद्योग कमकुवत झाला होता, या दोन्ही देशांमधून होणारी अगरबत्ती आणि बांबूची मोठ्या प्रमाणावरील आयात रोखण्यासाठी हे दोन निर्णय घेण्यात आले आहेत.

या दोन वस्तूंच्या आयातीवर आळा घालण्यासाठी गडकरी आणि केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय सक्सेना यांनी चांगले प्रयत्न केले. परिणामी, गेल्या दीड वर्षात भारतातील शेकडो बंद पडलेले अगरबत्ती उत्पादक कारखाने पुन्हा सुरु झाले आणि जवळपास 3 लाख नवीन रोजगार निर्माण झाले. या धोरणात्मक निर्णयानंतर केसरी जैव उत्पादन एलएलपी हा पहिला मोठा प्रकल्प आहे.

गडकरी यांनी आसाममधील नवीन बांबू काठी कारखाना सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. स्थानिक रोजगार निर्मितीची मोठी क्षमता असणाऱ्या स्थानिक अगरबत्ती उद्योगांना बळकटी आणण्याच्या दिशेने हा कारखाना मोठे कार्य करेल.

अगरबत्तीच्या काड्या बनवण्यासाठी फक्त 16% बांबू वापरला जातो तर उर्वरित 84% बांबू वाया जातो. केसरी जैव उत्पादन एलएलपीद्वारे वापरण्यात येणाऱ्या विविध तंत्रज्ञानामुळे बांबूच्या प्रत्येक भागाचा वापर केला जातो. पर्यायी इंधन म्हणून डिझेलमध्ये मिसळण्यात येणारा मिथेन गॅस तयार करण्यासाठी वाया जाणारा बांबू जाळला जातो. जळलेल्या बांबूचा उपयोग अगरबत्ती आणि इंधन ब्रिकेटसाठी कोळशाची पावडर तयार करण्यासाठी देखील केला जातो. आईस्क्रीमच्या काड्या, चॉपस्टिक, चमचे आणि इतर वस्तू बनवण्यासाठी देखील वाया जाणारा बांबू वापरला जातो.

 

 

M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1699155) Visitor Counter : 199