श्रम आणि रोजगार मंत्रालय
पाच अखिल भारतीय सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर अप्लिकेशन आणि प्रश्नावलीसह सूचना नियमावली गंगवार यांनी केली जारी, धोरण आखताना कामगारविषयक डाटा महत्वाचा असल्याचे केले प्रतिपादन
Posted On:
18 FEB 2021 5:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2021
केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्य मंत्री ( स्वतंत्र कार्यभार ) संतोष कुमार गंगवार यांनी अखिल भारतीय सर्वेक्षणासाठी, सॉफ्टवेअर अप्लिकेशन आणि प्रश्नावलीसह सूचना नियमावली जारी करत यासाठीच्या प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यकमाचा आज प्रारंभ केला. कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा लेबर ब्युरोकडून ही सर्वेक्षणे केली जाणार आहेत. कामगार आणि रोजगार सचिव अपूर्व चंद्रा आणि लेबर ब्युरोचे महासंचालक डीपीएस नेगी यावेळी उपस्थित होते.

कामगारविषयक सर्व पैलूंचा डाटा अर्थात माहिती आणि आकडेवारी ही धोरण आखताना विशेष करून कोविड- 19 महामारीच्या काळात अतिशय महत्वाची असल्याचे गंगवार यांनी यावेळी सांगितले. स्थलांतरित मजूर, घरकाम करणारे कामगार, व्यावसायिकांकडून निर्माण करण्यात आलेला रोजगार आणि वाहतूक क्षेत्र याबाबतच्या अखिल भारतीय चार सर्वेक्षणांची राष्ट्रीय स्तरावर, अतिशय महत्वाची भूमिका आहे. कामगार विषयक बाजारपेठेत सर्वात परिणाम झालेल्या घटकांची माहिती देण्यासाठी ही सर्वेक्षणे महत्वाची ठरणार आहेत.
या सर्वेक्षणामध्ये लेबर ब्युरोला मार्गदर्शन करण्यासाठी,डॉ एस पी मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ अमिताभ कुंडू यांच्या सह अध्यक्षतेखाली, तज्ञ गटाची केंद्र सरकारने स्थापना केल्याची माहिती अपूर्व चंद्र यांनी दिली. आघाडीचे अर्थ आणि सांख्यिकी तज्ञ या गटाचे सदस्य आहेत . प्रश्नावली, सूचनावली आणि सर्वेक्षणासाठी नमुना आरेखनासाठी तज्ञ गट आणि उप गटाने आतापर्यंत 46 बैठका घेतल्या आहेत. ब्युरो प्रथमच मोठ्या प्रमाणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत माहिती गोळा करत असल्याचे त्यांनी सांगितले. माहिती संकलन, एकीकरण आणि प्रक्रिया अधिक समृद्ध व्हावी यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशीन लर्निंगच्या वापरावर भर दिला असल्याचे नेगी यांनी सांगितले.
स्थलांतरीत मजूर, घरगुती काम करणारे कामगार, व्यावसायिकांकडून झालेली रोजगार निर्मिती, वाहतूक क्षेत्राकडून झालेली रोजगार निर्मिती आणि आस्थापना आधारित तिमाही रोजगार सर्वेक्षण अशी अखिल भारतीय स्तरावरची पाच सर्वेक्षणे लेबर ब्युरो हाती घेत आहे.माहिती संकलनाच्या संपूर्ण साखळीत माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग या दृष्टीने अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणूनही ही सर्वेक्षणे महत्वाची आहेत. या सर्व सर्वेक्षणामधली माहिती ही माहिती तंत्रज्ञान आधारित सॉफ्टवेअर द्वारे गोळा केली जाईल आणि या माहितीची साठवणूक आणि प्रक्रिया इलेक्ट्रोनिकली केली जाईल. माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सर्वेक्षणाचा कालावधी 30-40% ने कमी होणार आहे. 10 पेक्षा कमी कामगार आणि 10 पेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांमधल्या रोजगार परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अखिल भारतीय तिमाही आस्थापना आधारित रोजगार सर्वेक्षणही करण्यात येणार आहे.
कामगार आणि रोजगार क्षेत्रात, विविध संबंधितांची माहिती आणि आकडेवारी विषयक आवश्यकता पूर्ण करण्यात लेबर ब्युरो गेली शंभर वर्षे आघाडीवर आहे. कामगारविषयक माहितीच्या भांडाराबरोबरच, औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक, कृषी आणि ग्रामीण कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक आकडेवारी त्याच बरोबर कामगारविषयक विविध पैलुबाबत अनेक अभ्यास आणि सर्वेक्षण यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही ब्युरो ओळखला जातो.
Jaydevi PS/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1699090)