संरक्षण मंत्रालय

विमानांच्या ताफ्याच्या  देखभालीसाठी भारतीय हवाई दलाचा स्वदेशीकरणावर भर

Posted On: 04 FEB 2021 1:27PM by PIB Mumbai

 

 

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात मिग -21 बायसन पासून अत्याधुनिक राफेल विमानापर्यंत परदेशी बनावटीची विमाने कार्यरत आहेत. हवाई दलाच्या विमान आणि प्रणालीच्या उत्पादन सहाय्यासाठी तसेच प्रणालीचे सुटे भाग निर्मितीत आत्मनिर्भरता, विमानांचे स्वदेशीकरण तसेच स्वदेशी दुरुस्ती आणि देखभाल (आरओएच) सुविधा स्थापन करण्यावर भारतीय हवाई दलाचा प्रामुख्याने भर आहे.

भारतीय हवाई दलात स्वदेशीकरणाला मोठा वाव आहे. विमाने आणि प्रणालीच्या देखभालीसाठी सुट्या भागांची निर्मिती देशाच्या विविध भागात आयएएफच्या बेस रिपेयर डेपो (बीआरडी) तसेच नाशिकच्या क्रमांक 1 मध्यवर्ती स्वदेशीकरण आणि उत्पादन डेपो (सीआयएमडी), येथे केली  जाते.

स्वयंपूर्णता आणि आत्मनिर्भर भारत अभियानावर भारतीय हवाई दलाचा भर असून स्वदेशीकरणाला चालना देण्यासाठी भारतीय एरोस्पेस आणि संरक्षण उद्योग विशेषत: एमएसएमईच्या सहभागाची व्याप्ती वाढवली जात आहे. या दिशेने, हवाई दलाने आधीच अंदाजे 4000 सुट्या भागांच्या निर्मितीची गरज ओळखली आहे. एमएसएमईंसह भारतातील एरोस्पेस आणि संरक्षण उद्योग भागीदारांना  स्वदेशीकरण मोहिमेमध्ये भारतीय हवाई दलाला सहकार्य करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.

सुटे भाग आणि एकूण उत्पादनांच्या व्यतिरिक्त, भारतीय हवाई दलाचा भारतात दुरुस्ती आणि देखभाल  (आरओएच) सुविधा स्थापित करण्यासाठी उद्योगाना सहभागी करून घेण्यावर विशेष भर आहे. देशातील  एमआरओ सुविधांचा विकास आणि प्रोत्साहन देण्याबरोबरच वित्तीय तिजोरीत मोठ्या प्रमाणात बचत करणे आणि दुरुस्तीसाठी लागणारा  वेळ कमी करणे हे भारतीय हवाई दलाचे उद्दिष्ट आहे.

स्वदेशीकरणाच्या आवश्यकतेचा प्रसार सुलभ करण्यासाठी, बीआरओ / सीआयएमडीने सीपीपीपी पोर्टलद्वारे जारी केलेल्या आरएफपीचा तपशील आयएएफ संकेतस्थळ indianairforce.nic.in  येथे उपलब्ध आहे.

आयएएफ एरो इंडिया दरम्यान हॉल सी मधील त्यांच्या स्टॉलवर स्वदेशीकरण संबंधी आवश्यक बाबी मांडणार आहे. स्वदेशीकरण आणि त्यासंबंधित कार्यपद्धतीची आवश्यकता स्पष्ट करण्यासाठी उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी विविध बीआरओचे प्रतिनिधी स्टॉलवर उपस्थित असतील.

 

U.Ujgare/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1695446) Visitor Counter : 129