पंतप्रधान कार्यालय

केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 नंतर पंतप्रधानांचे वक्तव्य

Posted On: 01 FEB 2021 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2021

नमस्कार,

वर्ष 2021 चा अर्थसंकल्प विलक्षण परिस्थितीत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात वास्तविकतेची भावना आणि विकासाबद्दल आत्मविश्वास देखील आहे. जगातील कोरोनाच्या प्रभावामुळे संपूर्ण मानवजाती हादरली आहे. अशा परिस्थितीत आजचा हा अर्थसंकल्प भारताचा आत्मविश्वास उंचावणार आहे. आणि त्याच वेळी, जगामध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण करणारा अर्थसंकल्प देखील आहे.

आजच्या अर्थसंकल्पात आत्मनिर्भतेचा दृष्टीकोन देखील आहे आणि प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक वर्गाचा  समावेश देखील आहे. या अर्थसंकल्पात आम्ही विकासासाठी नवीन संधी, नवीन शक्यतांचा विस्तार, तरुणांसाठी  नवीन संधी निर्माण करणे या तत्वांचा समावेश केला आहे.  मनुष्यबळाला एक नवीन उंची प्रदान करणे. पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी नवीन क्षेत्रे विकसित करणे, आधुनिकतेकडे वाटचाल करणे, नवीन सुधारणा आणणे या बाबींवर भर दिला आहे.

मित्रांनो,

या अर्थसंकल्पात, नियम आणि कार्यपद्धती सुलभ करुन सामान्य लोकांच्या जीवनात 'सुलभ राहणीमानाला’ प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे. हा अर्थसंकल्प व्यक्ती, गुंतवणूकदार, उद्योग तसेच पायाभूत क्षेत्रात देखील अनेक सकारात्मक बदल घडवून आणेल. याबद्दल मी देशाच्या अर्थमंत्री निर्मला जी आणि त्यांचे सहकारी मंत्री अनुराग जी आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

पहिल्या दोन तासांमध्येच सकारात्मक प्रतिक्रिया प्राप्त होणे असे अर्थसंकल्प क्वचितच पाहायला मिळतात. कोरोनामुळे सरकार सामान्य नागरिकांवरील ओझे वाढवेल असा अंदाज अनेक तज्ञांनी व्यक्त केला होता. परंतु आर्थिक शाश्वततेप्रती आपली जबाबदारी लक्षात घेत सरकारने अर्थसंकल्पाचा आकार वाढवण्यावर भर दिला. अर्थसंकल्प पारदर्शक असावा, यासाठी आमच्या सरकारने अविरत प्रयत्न केले आहेत. मला आनंद आहे की आज अनेक अभ्यासकांनी या बजेटच्या पारदर्शकतेचे कौतुक केले आहे.

मित्रांनो,

कोरोनाच्या युद्धात भारत नेहमीच    

स्वयंप्रेरित राहिला आहे. मग त्या कोरोना कालावधीत केलेल्या सुधारणा असो वा आत्मनिर्भर भारताचा संकल्प असो. ही सक्रियता वाढवित असताना आजच्या अर्थसंकल्पात प्रतिक्रियात्मकतेचा मागमूस देखील नाही. आम्ही या अर्थसंकल्पात पूर्वलक्षी अर्थसंकल्प सादर करून देशासमोर  स्वयंप्रेरित राहण्याचा संदेशही दिला आहे. हा अर्थसंकल्प विशेषत: अशा क्षेत्रांवर केंद्रित आहे ज्यामुळे संपत्ती आणि निरोगीपणा वेगाने वृद्धिंगत होईल. यामध्ये  एमएसएमई आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला आहे. तसेच हा अर्थसंकल्प ज्या प्रकारे आरोग्यसेवेवर केंद्रित आहे ते देखील अभूतपूर्व आहे. हा अर्थसंकल्प देशातील प्रत्येक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाची चर्चा करतो. विशेषतः मला आनंद आहे की या अर्थसंकल्पाने दक्षिणेतील आपल्या राज्ये, ईशान्येकडील आपली राज्ये आणि उत्तरेकडील लेह लडाखसारख्या क्षेत्राच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले आहे. हा अर्थसंकल्प तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल यासारख्या किनारपट्टीच्या राज्यांना व्यवसाय केंद्र म्हणून उदयाला आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. हा अर्थसंकल्प आसामसारख्या ईशान्येकडील राज्यांमधील अनपेक्षित संभाव्यतेच्या दृष्टीने बरीच प्रगती करेल. या अर्थसंकल्पात ज्या पद्धतीने संशोधन आणि नाविन्यपूर्ण परिसंस्थेवर जोर देण्यात आला आहे, त्या तरतुदी केल्या गेल्या आहेत, त्यामुळे आपल्या तरुणांना बळकटी मिळेल , उज्ज्वल भविष्यासाठी भारत खूपच ठोस पावले उचलेल.

मित्रांनो,

देशातील सामान्य माणसाचे, महिलांचे जीवन सुलभ करण्यासाठी आरोग्य, स्वच्छता, पोषण, शुद्ध पाणी आणि संधींच्या समानतेवर या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवरील खर्च अभूतपूर्व वृद्धी करण्यासोबतच अनेक व्यवस्थांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत  ज्यामुळे देशाचा विकास आणि रोजगार निर्मिती, नोकरीसाठी मोठ्याप्रमाणात फायद्याचे ठरणार आहेत. देशातील कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी, शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी या अर्थसंकल्पात जोर देण्यात आला आहे, त्यामध्ये अनेक तरतुदी केल्या आहेत. कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना अधिक सहजतेने अधिक कर्ज मिळू शकेल. देशातील बाजारपेठा मजबूत करण्यासाठी अर्थात एपीएमसीला मजबूत करण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधीची तरतूद करण्यात आली आहे. हे सर्व निर्णय हेच दर्शवितात की या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी गाव आहे, आमचे शेतकरी आहेत. एमएसएमई क्षेत्राला चालना देण्यासाठी, रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होण्यासाठी यावर्षी एमएसएमई क्षेत्राचा व्यय निधी देखील  गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाला आहे.

मित्रांनो,

हा अर्थसंकल्प देशाच्या प्रत्येक नागरिकाची प्रगती समाविष्ट असलेल्या आत्मनिर्भरतेच्या मार्गावर मार्गक्रमण करत आहे.  हा अर्थसंकल्प या दशकाच्या सुरूवातीचा मजबूत पाया आहे. स्वावलंबी भारताच्या या महत्त्वपूर्ण अर्थसंकल्पासाठी मी सर्व देशवासीयांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा अर्थमंत्री आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार.

(सूचना: हे पंतप्रधानांच्या भाषणाचे  भाषांतर आहे. मूळ भाषण हिंदीत आहे .)

 ***

G.Chippalkatti/S.Mhatre/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1694255) Visitor Counter : 169