पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

जम्मू आणि काश्मिर वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोकडून मोठी कारवाई; मोठ्या प्रमाणावर छापे टाकून वन्यजीवांची तस्करी रोखली


अलिकडच्या काळातील सर्वात मोठ्या जप्तीच्या कारवाईबद्दल केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडून कौतुक

Posted On: 30 JAN 2021 6:13PM by PIB Mumbai

 

नवी दिल्लीच्या वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने (डब्ल्यूसीसीबी) धडकेबाज गुप्त कारवाई करून श्रीनगर खो-यातल्या अनंतनाग आणि जम्मू भागातल्या मनवाल क्षेत्रातल्या बेकायदा वन्यजीव शिकार आणि व्यापार होत असलेल्या दोन केंद्रावर छापे टाकले आणि तस्करीचा माल जप्त केला.

Kudos to the team of @WCCBHQ , J&K police and the Forest department for their successful operation and arresting 2 main kingpins involved in illegal wildlife trafficking in the J&K region.

Keep up the continued commitment towards ending wildlife crime. https://t.co/v4u0cYDWm8

— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) January 30, 2021

यासाठी दिल्ली येथून डब्ल्यूसीसीबीचे अधिकारी जम्मू-काश्मिरला गेले होते. त्यांना जम्मू-काश्मिरच्या वन्यजीव खात्याच्या प्रमुखांनी आणि राज्यांच्या पोलिसांनीही मदत केली. अधिका-यांनी 29 जानेवारी, 2021 रोजी दोन्ही ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.

या संदर्भात केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका व्टिट संदेशाव्दारे डब्ल्यूसीसीबीच्या अधिकारी वर्गाचे अभिनंदन करून त्यांनी वन्यजीव गुन्हे  संपुष्टात आणण्यासाठी दाखवलेली कटिबद्धता कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.

अनंतनाग येथे ब्युरोच्यावतीने टाकलेल्या छाप्यामध्ये शेरपुरा येथील रहिवासी मोहम्मद गनी यांच्याकडून आठ बिबट्यांची कातडी, 38 अस्वलांच्या पोटातल्या आतले भाग-अवयव, चार कस्तुरीची बोंडे असा माल जप्त करण्यात आला.

जम्मू भागातल्या मनवाल येथे पाच बिबट्यांची कातडी,, सात बिबट्यांची नखे, 8 जंगली कुत्री, दोन दात, दोन बिबट्यांच्या कवट्या आणि बिबट्यांची हाडे , एक कस्तुरी दात असा वन्यजीवांशी संबंधित  साहित्य  जम्मूतल्या किंगरियाल येथील रहिवासी कुशल हुसेन बाॅकेड यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे.

या अवैध व्यवहाराविषयी सखोल तपास करण्यात येत आहे, तसेच अशा प्रकारे अवैध व्यापार कसा सुरू आहे, त्यामध्ये आणखी कोण कोण गुंतले आहेत, या वन्यजीवांच्या वस्तूंना मागणी कोठून येते, त्यांना मालाचा पुरवठा कसा केला जातो, तसेच व्यापार कसा केला जातो, यांच्याविषयी दुवे शोधून तपास करण्यात येत आहे.

या भागामध्ये अलिकडच्या काळात काल केलेली ही सर्वात मोठी कारवाई आणि जप्ती आहे. कस्तुरी हरीण आणि हिमालयीन काळी अस्वले या प्रजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कस्तुरीच्या बोंडासाठी आणि पारंपरिक चिनी औषधांसाठी या प्राण्याची अवैध शिकार केली जाते, असे दिसून आले आहे. वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 कलम 1 अनुसार कस्तुरी मृग, बिबट्या, अस्वल यांची शिकार करण्यास सक्त मनाई आहे. तसेच या प्राण्यांची शिकार करणे, त्यांच्या आणि इतर अवयवांचा व्यापार करणे यावर बंदी आहे आणि तो शिक्षापात्र गुन्हा आहे. असे अवैध कृत्य करण्यांना किमान तीन वर्ष ते सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येते.

या प्रकरणी संबंधितांवर अनंतनाग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

***

Jaydevi PS/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1693591) Visitor Counter : 243