अर्थ मंत्रालय

या वित्तवर्षात भारताच्या विक्रीयोग्य मालाच्या व्यापार तुटीत घट


परकीय चलनबाजारात रिजर्व बँकेच्या हस्तक्षेपामुळे अस्थिरतेवर आणि रुपयाच्या एकतर्फी मूल्यवर्धनावर नियंत्रण मिळविण्यात यश

Posted On: 29 JAN 2021 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2021


कोविड-19 साथीमुळे 2020 मध्ये महामंदीनंतरच्या सर्वात वाईट जागतिक मंदीचा फटका बसला, मात्र अर्थव्यवस्थेवरील त्याचा विपरीत परिणाम आरंभीच्या भीतीपेक्षा सौम्य असण्याची शक्यता आहे. यामुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे जागतिक व्यापारात तीव्र घसरण, वस्तूंच्या किमतीतील घसरण, परकीय वित्तपुरवठ्यातील तंगी असे परिणाम झाले आहेत. तसेच चालू खात्यांतील शिलकीवर आणि विविध देशांच्या चलनांवर वेगवेगळे परिणामही झाले आहेत. विक्रीयोग्य मालाच्या जागतिक व्यापारात 2020 मध्ये 9.2 टक्क्यांची घट होण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षण 2020-21 मध्ये मांडण्यात आला आहे. केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत हे सर्वेक्षण सादर केले.

भारताच्या आयातीतील घट ही निर्यातीतील घटीपेक्षा अधिक असल्याचे निरीक्षण, सदर आर्थिक सर्वेक्षणाने मांडले आहे. या फरकामुळे, 2020-21च्या एप्रिल ते डिसेंबर या काळात 57.5 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी व्यापारतूट नोंदली गेली आहे. गेल्यावर्षी याच काळात हे प्रमाण 125.9 अब्ज अमेरिकी डॉलर इतके होते.

चालू खाते-:

* निर्यात-

2020-21 च्या एप्रिल ते डिसेंबर या काळात मालाची निर्यात 15.7 टक्क्यांनी घसरून 200.8 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी झाली. 2019-20 च्या एप्रिल ते डिसेंबर दरम्यान हेच प्रमाण 238.3 अब्ज अमेरिकी डॉलर इतके होते.

* आयात-

2020-21 च्या एप्रिल ते डिसेंबर या काळात मालाची एकूण आयात 29.1 टक्क्यांनी घसरून 258.3 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचली. गेल्यावर्षी याच काळात हा आकडा 364.2 अब्ज अमेरिकी डॉलर इतका होता. आयात कमी झाल्याने चीन आणि अमेरिकेबरोबरचा व्यापार-समतोल सुधारला असे, आर्थिक सर्वेक्षण 2020-21 मध्ये म्हटले आहे.

* सेवा-

एप्रिल ते सप्टेंबर 2020 या काळात सेवाक्षेत्रातून झालेली निव्वळ प्राप्ती 41.7 अब्ज अमेरिकी डॉलरवर स्थिर राहिली. गेल्यावर्षी याच काळात हे प्रमाण 40.5 अब्ज अमेरिकी डॉलर इतके होते. प्रामुख्याने सॉफ्टवेअर मुळे सेवाक्षेत्राला टिकाव धरण्यास मदत झाली. सेवांच्या एकूण निर्यातीपैकी 49 टक्के वाटा सॉफ्टवेअर सेवांचा होता, असे आर्थिक सर्वेक्षण 2020-21 मध्ये म्हटले आहे.

वित्तवर्ष 2020-21च्या पहिल्या सहामाहीत, मालाच्या निर्यातीत तीव्र घसरण दिसून आली, तसेच प्रवासविषयक सेवांमधेही कमी उलाढाल झाली. यामुळे चालू खात्यावरील खर्चात (30.8 टक्क्यांनी) चालू खात्यावरील उत्पन्नापेक्षा (15.1 टक्क्यांनी) , अधिक तीव्र घसरण झाली. परिणामी, चालू खात्यावर 34.7 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी (सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या 3.1 टक्के ) शिल्लक राहिली. भारताच्या चालू खात्यात वर्षभराचा विचार करता, शिल्लक राहू शकणार असल्याची स्थिती 17 वर्षांनंतर आल्याचे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे.

भांडवली खाते-

एफडीआय अर्थात थेट परकीय गुंतवणूक आणि एफपीआय अर्थात संस्थात्मक परकीय गुंतवणूक यांत प्रचंड वाढ झाल्याने भारताच्या भांडवली खात्यातील समतोलाला भक्कम आधार मिळाला असल्याचे निरीक्षण आर्थिक सर्वेक्षण 2020-21 मध्ये मांडले आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 2020 या काळात एफडीआयच्या बाबतीत 27.5 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी निव्वळ आवक नोंदली गेली. चालू आणि भांडवली खात्यांतील या घडामोडींमुळे परकीय चलनाच्या गंगाजळीत वाढ झाली आहे. 8 जानेवारी 2021 रोजी भारताकडे 586.1 अब्ज अमेरिकी डॉलर इतका विक्रमी परकीय चलनसाठा होता.

सप्टेंबर 2020 च्या अखेरीस, भारताचे परकीय कर्ज 556.2 अब्ज अमेरिकी डॉलर इतके होते. मार्च 2020 च्या तुलनेत यात 2.0 अब्ज अमेरिकी डॉलर (0.4 टक्के) इतकी घट झालेली होती. तर जीडीपी म्हणजे सकल देशांतर्गत उत्पन्ननाशी असलेल्या त्याच्या गुणोत्तरात किंचित वाढ होऊन ते 21.6 टक्के झाले होते.

परकीय चलनबाजारात रिजर्व बँकेने केलेल्या हस्तक्षेपांमुळे अस्थिरता आणि रुपयाचे एकतर्फी मूल्यवर्धन यांवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे.

* * *

M.Chopade/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1693353) Visitor Counter : 245