आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजारांचा सामना करताना जगाबरोबर कार्य करण्यासाठी एकजुटीचे प्रतीक म्हणून भारत कुतुब मीनार प्रकाशमान करणार
दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजारांचा सामना करण्यासाठी एकजुटीचे प्रतीक म्हणून जगभरातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या वास्तू उजळणार
Posted On:
28 JAN 2021 11:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2021
जगातल्या दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजारांचे (एनटीडी) निर्मूलन करण्यासाठी जागतिक समुदायाच्या वचनबद्धतेला उजाळा देणारा दुसरा वार्षिक जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार दिवस दि. 30 जानेवारी, 2021 रोजी पाळण्यात येणार आहे. अशा रोगांमुळे उष्णकटिबंधामध्ये वास्तव्य करणा-या समुदायाला त्रासाचा सामना करावा लागतो. या आजारांच्या विरोधात संपूर्ण जगामध्ये सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत आता भारतही सहभागी झाला आहे. त्यासाठी एकजुटीचे प्रतीक म्हणून 30 जानेवारी रोजी दिल्लीतला कुतुब मीनार दिवे लावून प्रकाशमान करण्यात येणार आहे.
दि.30 जानेवारी रोजी दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजारांच्या विरोधात एकजूट दर्शविण्यासाठी जगभरातल्या 25 राष्ट्रांतल्या ऐतिहासिक महत्व असलेल्या 50 पेक्षा जास्त वास्तू प्रकाशमान केल्या जाणार आहेत. या रोगांच्या विरोधात एकत्रित लढा देण्यासाठी सिद्ध असलेले देश परस्परांशी एकजुटीचे प्रतीक म्हणून या वास्तू प्रकाशमान करणार आहेत. भारतातल्या कुतुब मीनारला जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने मान्यता दिली आहे. जागतिक स्तरावर सुरू झालेल्या या मोहिमेत भारतही सहभागी होत असून 30 जानेवारीला कुतुब मीनार प्रकाशमान करण्यात येणार आहे.
दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजारांमुळे जगभरात पाचपैकी एकजण ग्रासलेला आहे. अशा विविध आजारांपैकी भारतामध्ये किमान 11 आजारांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर आहे. या आजारांमुळे माणसे दुर्बल, अशक्त होतात तसेच अनेकांमध्ये शारीरिक व्यंग उत्पन्न होते, तर काही आजारांमुळे रूग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. अशा आजारांच्या विरोधात जगातील अनेक देश एकत्रित लढा देणार आहेत.
* * *
M.Pange/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1693125)
Visitor Counter : 172