मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

एव्हियन एनफ्लूएन्झाबाबतची देशातली स्थिती

Posted On: 28 JAN 2021 8:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2021

 

दि. 28 जानेवारी, 2021 पर्यंत देशातल्या नऊ राज्यांमधल्या विविध कुक्कुटपालन केंद्रांमधील पक्ष्यांना एव्हियन एनफ्लूएन्झा (बर्ड फ्लू) झाला असल्याची पुष्टी करण्‍यात आली आहे. यामध्ये केरळ, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तराखंड, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांमधल्या कुक्कुटपालन केंद्रांचा समावेश आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान, जम्मू आणि काश्मिर आणि पंजाब या 12 राज्यांमध्ये कावळ्यांना तसेच स्थलांतरित पक्षी, वन्यपक्षी यांनाही एव्हियन एनफ्लूएन्झा झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. पंजाबमधल्या एसएएस नगर जिल्ह्यातल्या डेराबस्सी कुक्कुटपालन केंद्रातल्या प्राण्‍यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे नमुन्यांच्या तपासणीनंतर स्पष्ट झाले आहे.

जम्मू आणि का‍श्मिर या केंद्रशासित प्रदेशात सोपोर येथेही कावळ्यांना बर्ड फ्लूची बाधा झाल्याचे दिसून आले आहे; तसेच महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यात मोरांना आणि नांदेड जिल्ह्यात घुबडांना या रोगाची लागण झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांमधल्या बाधित केंद्रावर आणि भागांमध्ये रोग नियंत्रण, संक्रमण तसेच प्रसार रोखण्याचे काम सुरू केले आहे. यामध्‍ये  स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केले जात आहे. 

कुक्कुटपालन केंद्रांव्यतिरिक्त इतर प्रजातीच्या पक्ष्यांमध्ये ज्या ठिकाणी संक्रमण दिसून आले आहे त्या ‍भागामध्ये या रोगाचा प्रसार होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

राज्याच्या कृती दलाने केलेल्या कारवाईनुसार ज्या कुक्कुटपालन केंद्रांमधल्या प्राण्यांची, अंड्याची विल्हेवाट लावण्यात आली, त्यांचे झालेले नुकसान लक्षात घेवून केंद्र चालकांना, शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्यावतीने नुकसान भरपाई देण्यासाठी प्रत्येकी 50:50 विभागणी तत्वावर एलएच आणि डीसी’ योजनेखाली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निधी दिला जात आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, एव्हियन फ्लू 2021 च्या प्रतिबंधासाठी, नियंत्रण आणि संक्रमण रोखण्‍यासाठी करीत असलेल्या उपाययोजना तसेच सुधारित कृती आराखडा यांच्या माहितीचा अहवाल विभागाला नियमित पाठवित आहेत. एव्हियन फ्लूविषयी जनजागृती करण्यासाठी विभागाच्या वतीनेही प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी व्टिटर, फेसबुक यासारख्या समाज माध्यमांचा वापर करण्यात येत आहे.

 

 

M.Pange/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1693031) Visitor Counter : 93