रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

जुन्या वाहनांवर हरित कर लावला जाणार, जेणेकरून अकार्यक्षम आणि प्रदूषणकारी वाहने मोडीत काढून पर्यावरण स्वच्छ राखता येईल


या कराद्वारे मिळणारा महसूल प्रदूषणाशी दोन हात करण्यास वापरणार

Posted On: 25 JAN 2021 7:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2021

 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  वातावरण प्रदूषित करणाऱ्या जुन्या वाहनांवर हरित कर आकारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. हा प्रस्ताव आता सल्लामसलतीसाठी राज्यांना पाठवल्यानंतर त्याची औपचारिक अधिसूचना काढली जाईल. हरित कर आकारण्यासाठी पुढील मुद्दे या प्रस्तावात आहेत.

  • व्यवसायिक वाहने आठ वर्षांपेक्षा जुनी असतील तर त्यांना सक्षमता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या वेळेस रस्ते कराच्या दहा ते पंचवीस टक्के दराने हरित कर आकारला जाईल.
  • खाजगी वाहनांना नोंदणी प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाच्या वेळेस म्हणजेच पंधरा वर्षांनी हरित कर आकारला जाईल.
  • सिटीबस सारख्या सार्वजनिक वाहतूक सेवेतील वाहनांना हरित कर कमी दराने आकारला जाईल.
  • अति प्रदूषित शहरांमध्ये वाहनांवर जास्त हरित कर (रस्ते कराच्या सुमारे पन्नास टक्के एवढा) आकारला जाईल.
  • वाहन प्रकार तसेच इंधन म्हणजे पेट्रोल/ डिझेल यानुसार वेगवेगळ्या दराने कर आकारला जाईल.
  • मिश्र प्रकारातील मजबूत वाहने, इलेक्ट्रॉनिक वाहने आणि सीएनजी इथेनॉल एलपीजी यासारख्या पर्यायी इंधन वापरणाऱ्या वाहनांना करातून सूट मिळेल.
  • ट्रॅक्टर, हार्वेस्टर यासारख्या  शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना करात सूट असेल.

हरित कराद्वारे जमा झालेल्या महसुलाचा हिशोब वेगळा ठेवला जाईल आणि प्रदूषणाशी दोन हात करण्यासाठी तसेच राज्यांमध्ये  प्रदूषण मापनाच्या अत्याधुनिक सुविधा बसवण्यासाठी वापरण्यात येईल. 

हरित कराचे लाभ

  • पर्यावरणाला हानी पोचवणारी वाहने वापरण्यापासून लोकांना परावृत्त करणे.
  • नवीन आणि कमी प्रदूषण करणाऱ्या वाहनांकडे लोकांना वळवणे.
  • हरित करामुळे प्रदूषणाची तीव्रता कमी होण्यास मदत होईल आणि प्रदूषणकर्त्याला प्रदुषणाची भरपाई द्यावी लागेल.

मंत्री महोदयांनी सरकारी विभागातील तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतील 15 वर्षांपेक्षा जुन्या  वाहनांची नोंदणी रद्द करणे आणि ती निकाली काढणे यासंबंधीच्या धोरणास ही मंजुरी दिली. याची अधिसूचना निघून हे धोरण 1 एप्रिल 2022 पासून अमलात येईल.

एकूण वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणापैकी सर्व वाहनांच्या तुलनेत पाच टक्के असणाऱ्या व्यापारी तत्त्वावर चालणाऱ्या वाहनांचे प्रदूषण हे 65 ते 70 टक्के असल्याचा अंदाज आहे. 2000 या वर्षांपूर्वी उत्पादन झालेल्या वाहनांचे प्रमाण एकूण वाहतुकीच्या 1 टक्के एवढे आहे, परंतु त्यांच्यामुळे एकूण वाहनांच्या प्रदुषणात 15 टक्के भर घातली जाते. आधुनिक वाहनांपेक्षा जुनी वाहने 10 ते 25 पट जास्त प्रदूषण करतात.

 

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

                                   

                                                                       

                                   

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1692300) Visitor Counter : 417