माहिती आणि प्रसारण मंत्रालय
“ आपण प्रेम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या फायद्यासाठी जाऊ देण्याची कल्पना मला नेहमीच आश्चर्यकारक वाटते”- राधाचे दिग्दर्शक बिमल पोद्दार
पणजी, 22 जानेवारी 2021
“तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करत असता त्याच्या किंवा तिच्या फायद्यासाठी तुमच्यापासून दूर जाऊ देण्याची कल्पना मला नेहमीच आश्चर्यकारक वाटते.” त्यातूनच ही कथा आकाराला आली, असे राधा या ऍनिमेटेड कार्टून फिल्मचे दिग्दर्शक बिमल पोद्दार यांनी सांगितले आहे. ते आज गोव्यामध्ये पणजी येथे 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. कोलकात्यामध्ये राहात असलेली राधा नावाची मुलगी दोन व्यक्तींदरम्यान एक अदृश्य धागा विणत असते, वृंदावनामध्ये जेव्हा राधेला सोडून कृष्ण निघून जातो तेव्हा ज्या प्रकारे राधा त्याची प्रतीक्षा करते अगदी तशाच प्रकारे ही राधा हा बंध विणत असते. प्रेम आणि त्याग यांचा हा भावनिक प्रवास आहे. एका वयस्क अनामिक पात्राची आणि एका लहान मुलाची ही कहाणी आहे ज्याला तिने अतिशय हळुवारपणे वाढवले आहे आणि काळानुरूप तो मोठा होतो. त्याच्यावर ती अगदी मनापासून प्रेम करत असते आणि तो लहान मुलगा देखील प्रत्येक गोष्टीसाठी तिचा आधार घेत असतो. राधा त्याची मार्गदर्शक, मैत्रीण आणि आदर्श असते. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जीवनात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ती त्याचे प्रेरणास्थान असते. दुसरीकडे तो तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलवत राहातो आणि तिला हसवत राहातो. पण काळाच्या ओघात ते दोघे वेगळे होतात, दोन वेगळ्या शहरात राहू लागतात आणि त्यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी ती आतुर झालेली असते. या दोन मध्यवर्ती पात्रांविषयी बोलताना पोद्दार म्हणाले की तुमच्या स्वतःच्या आयुष्यातून पात्रांची निवड करणे नेहमीच सोपे असते ज्यांच्याशी तुम्ही राधा आणि तो लहान मुलगा यांचा संबंध जोडू शकता. राधा म्हणजे घरात एकाकी राहणाऱ्या वृद्ध महिलेचे प्रतीक आहे, ज्या महिला सध्याच्या काळात बऱ्याच घरांमध्ये आढळतात. त्यांची मुले चांगल्या भवितव्यासाठी, करियरसाठी आणि जीवनशैलीसाठी त्यांना सोडून जातात. यामध्ये काही चुकीचे असण्याचे कारण नाही. पण कुटुंबातील ज्येष्ठांना एकटे सोडले जाते आणि त्यांच्याकडे उर्वरित आयुष्य काढण्यासाठी जुन्या आठवणींशिवाय काहीच नसते.

पोद्दार या ऍनिमेशनपटाचे निर्माते, संकलक आणि छायाचित्र दिग्दर्शक देखील आहेत. ऍनिमेशनपट केवळ लहान मुलांपुरते मर्यादित असू नयेत, असे त्यांचे मत आहे. भारतातील ऍनिमेशन फिल्म उद्योगाबद्दल बोलताना ते म्हणाले की या उद्योगात अद्यापही अर्थपूर्ण कथानकांचा विचार केला जात नाही. भारतातील फिचर फिल्म उद्योग बऱ्यापैकी विकसित झाला असला तरी ऍनिमेशन उद्योग अद्यापही मागे आहे, असे ते म्हणाले.

ही परिस्थिती बदलण्यासाठी आणखी जास्त प्रमाणात साधनसंपत्तीच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. ऍनिमेशन फीचर फिल्म बनवणे वेळखाऊ आहे आणि त्यासाठी अधिक निधीची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
Jaydevi P.S/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1691396)