माहिती आणि प्रसारण मंत्रालय
85 व्या वर्षी देखील शांताबाई रस्त्यावर डोंबऱ्याचा खेळ करत समाजाचा वारसा जिवंत ठेवण्यास मदत करत आहेत : दिग्दर्शक प्रतीक गुप्ता
मी डोंबारी समाजाचा निष्पापपणा आणि निर्भयता सामोरे आणण्याचा निर्धार केला होता
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2021
"शांताबाई या आपल्या चित्रपटातून आम्ही शांताबाई पवार या पदपथावरील कलाकाराच्या जीवन प्रवासाचा मागोवा घेतला आहे, ज्या वयाच्या 85 व्या वर्षी सुध्दा डोंबऱ्याचा खेळ करत आहेत, आणि त्यामुळे महाराष्ट्रातील डोंबारी समाजाचा वारसा जिवंत रहाण्यास मदत झाली आहे. लुप्त होत चाललेल्या कलेवरील हा एक माहितीपट असून त्यातील प्रमुख भूमिका करणाऱ्या शांताबाई आपल्या खऱ्या आयुष्यात तसेच जीवन जगत आहेत." , असे दिग्दर्शक प्रतीक गुप्ता यांनी सांगितले. गोव्यात सुरू असलेल्या 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना ते आज बोलत होते. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या या माहितीपटाचे प्रदर्शन इफ्फीच्या 51व्या भारतीय पॅनोरामा सिनेबाह्य चित्रपट विभागात करण्यात येत आहे.
डोंबारी समाज आपल्या रस्त्यावरील खेळल्या जाणाऱ्या, तोल सांभाळत दोरखंडावरून चालणे आणि डोके खाली करून उडी मारणे अशा सर्कशीप्रमाणे खेळल्या जाणाऱ्या खेळांसाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण भारतभरात डोंबारी विखुरलेले आहेत. त्यांना कोकणात भोरपी, सातारा, सांगली जिल्ह्यांत गोपाळ तर पश्चिम महाराष्ट्रात डोंबारी नावाने ओळखले जाते.
दिग्दर्शक गुप्ता यांनी शांताबाईंच्या वास्तविक जीवनातील संघर्षावर प्रकाश टाकला आहे, ज्यांच्या स्वतःच्या जीवनातील दृष्टीकोनातून ही कथा सांगितली जाते : आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी शांताबाई रस्त्यावर दोरखंडावरून तोल सांभाळत जाण्याचे खेळ करतात जे कधीकधी धोकादायकही असतात.
गुप्ता यांना डोंबारी समाजाचा निष्पापपणा आणि निर्भयता सामोरी आणायची होती. जरी ते रस्त्यावर रहात असले आणि भटकंती करत असले तरी ते निष्पाप आणि धीट आहेत. माझ्याकडे चांगली टीम होती. सुरवातीला कुणालाही आत्मविश्वास नव्हता, पण मी या समाजाच्या निष्पापपणावर आणि निर्भयतेवर जोर देण्याचा निर्धार केला होता.
दिग्दर्शकांनी पुढे सांगितले की आमच्या चमूने दृश्ये वास्तविकपणे चित्रित व्हावीत याची काळजी घेतली. चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान डोंबारी समाजाला कुठलंही दडपण येऊ नये म्हणूनही आम्ही प्रयत्न केले, कॅमेरा समोर वावरताना त्यांना येणारा संकोच दूर करायला मला वेळ लागला. अभिनेते अनेकदा कॅमेरासमोर भांबावून जात आणि म्हणून आम्हाला कॅमेरा बाजूला ठेवून झूम करावा लागत असे, पण मी एकंदरीत प्रक्रियेचा आनंद लुटला आणि सर्व दृश्ये व्यव्यस्थित वास्तविकपणे चित्रित करण्याचे आम्ही प्रयत्न केले.
S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1691252)
Visitor Counter : 376