माहिती आणि प्रसारण मंत्रालय

ओटीटी आणि टीव्ही चॅनेल असूनही चित्रपटगृह उद्योग कायम राहीलः जी पी विजयकुमार


कमी बजेटच्या चित्रपटांना जागतिक प्रेक्षक मिळवून देण्यासाठी ओटीटी सहाय्य करते

Posted On: 20 JAN 2021 4:19PM by PIB Mumbai

पणजी, 20 जानेवारी 2021


“ओटीटी (ओव्हर द टॉप) च्या पदार्पणावेळी चित्रपटगृह व्यवसाय बंद होईल या भीतीने मोठा विरोध झाला होता. ओटीटी आणि टीव्ही चॅनेल असूनही पारंपारिक चित्रपट-उद्योग आपले स्थान कायम राखून आहेत. ते चित्रपटाच्या मनोरंजन व्यवसायाला आर्थिकदृष्ट्या पूरक असल्यामुळे ते अधिक फायदेशीर ठरतात. ओटीटीच्या प्रेक्षकवर्गात झपाट्याने वाढ होत असून सध्या ही संख्या 20 टक्के आहे. कमी बजेटच्या चित्रपटांना जागतिक प्रेक्षक मिळवून देण्यासाठी ओटीटी सहाय्य करते. त्याचवेळी, चित्रपट उद्योगातील काही सृजनशील व्यक्तींना त्यांचे चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित व्हावेत अशी इच्छा आहे.” मल्याळम चित्रपटसृष्टीतील चित्रपट निर्माता आणि वितरक जी पी विजयकुमार यांनी आपले मत व्यक्त केले.

गोवा येथे आयोजित 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा दरम्यान आज (20 जानेवारी 2021) आभासी पद्धतीने आयोजित केलेल्या ‘भारतीय चित्रपट निर्मिती मधील बदलती परिस्थिती’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

ओटीटी इथेच असेल, असे ते म्हणाले. “कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये ओटीटीमुळे चित्रपट निर्मात्यांना या कठीण काळात काही प्रमाणत उत्पन मिळविण्याचे साधन मिळाले. दुसरीकडे, मागील काही वर्षांमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन आणि जाहिरातीचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सॅटेलाईट मार्केट तेजीत असताना, 90 च्या दशकात उत्पादन खर्च वाढला, तर मल्टिप्लेक्सच्या संख्येमध्ये अनेक पटींनी वाढ झाली, ज्यामुळे 2010 मध्ये या उद्योगाचा बऱ्याच प्रमाणात ऱ्हास झाला."

प्रेक्षकांचा चित्रपट पाहण्याचा दृष्टीकोन सध्या बदलत आहे यावर प्रकाश टाकताना ते म्हणाले: “चित्रपटाच्या प्रेक्षकांची अभिरुची आणि निवडी बर्‍यापैकी बदलल्या आहेत, ते अधिक निवडक होत आहेत.”

ते म्हणाले, “ या उद्योगात आता गुणवत्तेवर आणि व्यावसायिक विचारांवर आधारित अर्थपूर्ण चित्रपट निर्मितीसाठी अधिकाधिक निर्माते पुढे येण्याची गरज आहे; आणि निर्मात्यांनी केवळ प्रसिध्दी आणि पैसा मिळविण्याच्या उद्देशाने या चित्रपटांना आर्थिक मदत करू नये.”
आर्थिक नियोजनावर जोर देताना ते म्हणाले की चित्रपट व्यवसाय व्यावसायिकदृष्ट्या सक्षम असेपर्यंत हा व्यवसाय टिकून राहील. “उद्योगाला टिकून राहण्यासाठी स्वतःला प्रयत्न करावे लागतील आणि सुरक्षितता आणि संधी लक्षात घेत आपल्या कार्य पथकाची काळजी घ्यावी लागेल.

चित्रपट उद्योगा समोर अनेक आव्हाने असून देखील या उद्योगाचे भविष्य उज्वल असल्याचे त्यांनी सांगितले. 


* * *

M.Chopade/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1690397) Visitor Counter : 246