माहिती आणि प्रसारण मंत्रालय

दादासाहेब फाळके द्रष्टे असल्याने त्यांनी भारतीय चित्रपट उद्योगात आत्मनिर्भरता आणली- दादासाहेबांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांचे मत

Posted On: 19 JAN 2021 11:30PM by PIB Mumbai

पणजी, 19 जानेवारी 2021

 

“दादासाहेब फाळके भविष्यवेधी होते आणि त्यांनी भारतीय चित्रपट उद्योगात ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भरता’ या संकल्पनांचा प्रसार केला. त्यांच्या चित्रपटात त्यांनी नेहमीच स्थानिक कलाकारांना वाव दिला आणि स्वदेशी चित्रिकरण स्थळे आणि देशातच उपलब्ध असलेले तांत्रिक पाठबळ यांचा वापर करण्यावर भर दिला. दादासाहेबांची चिकाटी, दूरदृष्टी आणि देशभक्ती यांच्या परिणामामुळे भारतीय चित्रपट उद्योगाने आज ही उंची गाठली आहे.” भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक दादासाहेब फाळके उर्फ धुंडीराज गोविंद फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांनी पत्र सूचना कार्यालयाच्या शमिला यांच्याशी मुक्त संवाद साधताना दादासाहेबांच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल बोलताना ही माहिती दिली. दादासाहेबांची कन्या मालती यांचे चंद्रशेखर हे पुत्र आहेत.

इफ्फी 51 मध्ये चंद्रशेखर पुसाळकर

गोव्यामध्ये पणजी येथे सुरु असलेल्या 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) दादासाहेबांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांना या महोत्सवात अभिवादन करण्यात येत आहे. त्यावेळी चंद्रशेखर पुसाळकर बोलत होते. दादासाहेबांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याबद्दल भारत सरकार आणि इफ्फी यांच्याविषयी फाळके कुटुंबीय कृतज्ञता व्यक्त करत आहे, असे ते म्हणाले.

एका माणसाने कशा प्रकारे शून्यातून चित्रपट निर्मितीचा प्रवास सुरू केला याची माहिती आता युवा पिढीला मिळू लागली असल्याने सरकारचे हे प्रयत्न फलदायी सिद्ध झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

सरकारचे प्रयत्न हे सर्वात मोठे अभिवादन

1969 मध्ये भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कारांची सुरुवात केली. जर सरकारने यासाठी पुढाकार घेतला नसता तर माझ्या आजोबांचे कार्य किंवा त्यांच्या जीवनाची माहिती केवळ दोन पानांमध्ये संपली असती, पण आता लोक त्यांना ओळखतात आणि भारतीय चित्रपट क्षेत्रात त्यांनी दिलेल्या असामान्य योगदानाबद्दल त्यांचा आदर करतात, असे सांगत पुसाळकर यांनी भारत सरकारचे याबद्दल आभार मानले. आपल्या आजोबांनी केलेल्या त्यागाविषयी त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे पैसे नव्हते, विम्याची पॉलिसी नव्हती, मग त्यांनी माझ्या आजीचे दागिने विकले आणि त्यांच्या चित्रपटासाठी सर्व काही त्या पैशातून खरेदी केले. माझी आजी आणि संपूर्ण कुटुंबाने त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर पाठबळ दिले.

दादा साहेब, एक महान देशभक्त

आपले आजोबा केवळ एक महान द्रष्टे नव्हते तर एक महान देशभक्त देखील होते, असे पुसाळकर म्हणाले.

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय जागरुकता मिशन

दादासाहेबांच्या योगदानाबाबत अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या कुटुंबाकडून होत असलेल्या प्रयत्नांबद्दल बोलताना पुसाळकर यांनी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय जागरुकता मिशनची माहिती दिली. पूर्णपणे या विषयाशी संबंधित असलेली http://www.dpiam.org.in ही वेबसाईट असून माझ्या आजोबांची संपूर्ण माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे, असे ते म्हणाले.

फाळके यांच्याकडून चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी होणाऱ्या प्रयत्नांबाबत त्यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला. पुण्यामध्ये एका चित्रपटगृह मालकाची चित्रपटगृहाला लागूनच पिठाची गिरणी होती. त्याच्यासोबत त्यांनी एक करार केला. त्यानुसार जे चित्रपटाचे तिकिट खरेदी करतील त्यांना एका तिकिटावर एक किलो पीठ मोफत दिले जायचे आणि जे त्या गिरणीत एक किलो पीठ खरेदी करायचे त्यांना देखील चित्रपटाचे तिकिट मोफत दिले जायचे, असे ते म्हणाले.

आपल्या आजोबांच्या कार्याचा उचित गौरव होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. माझ्या आजोबांची 150 वी जयंती ही त्यासाठी अगदी योग्य वेळ आहे आणि त्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे त्यांनी सांगितले. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार चित्रपट उद्योगाने गांभीर्याने करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 


* * *

M.Chopade/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1690297) Visitor Counter : 225