पंतप्रधान कार्यालय

‘प्रारंभ: स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय परिषदेत’ पंतप्रधानांचे अभिभाषण

Posted On: 16 JAN 2021 11:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2021

 

युवा ऊर्जा, तरुणांची स्वप्ने, किती अभेद्य, किती विशाल आहेत, तुम्ही सगळे याचे सर्वोत्तम उदाहरण आहात. आत्ता मी तुमच्या सर्वांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होतो, पाहत होतो. हा आत्मविश्वास नेहमी असाच राहिला पाहिजे. किती विविध स्टार्टअप्स आहेत याचा तुम्ही विचार करा. एक स्टार्ट-अप कार्बन फायबर 3 डी प्रिंटरवर बोलत होता तर दुसरा उपग्रह प्रक्षेपणा संदर्भात बोलत होता. ई-टॉयलेटपासून बायोडिग्रेडेबल पीपीई किटपर्यंत आणि मधुमेहावरील औषधांपासून ते विटांसाठी मशीन आणि दिव्यांगांसाठी एआर तंत्रज्ञाना पर्यंत, तुम्ही तुमच्या स्टार्ट-अप बद्दल जे काही सांगितले त्यावरून हे लक्षात येते की भविष्य बदलण्याची मोठी शक्ती तुमच्यामध्ये आहे. 

आता आणखी एक बदल दिसत आहे तो म्हणजे, यापूर्वी जर एखाद्या तरुणांने स्टार्ट-अप सुरू केले तर लोक म्हणायचे 'तू नोकरी का करत नाही?' स्टार्ट-अप का? परंतु आता लोक म्हणतात- नोकरी ठीक आहे, पण स्वतःचे स्टार्ट-अप का सुरु करत नाही ! आणि जे तरुण आधीच स्टार्ट-अपमध्ये आहेत, त्यांना पाहिल्यावर पहिली प्रतिक्रिया येते - 'व्वा, तुमच्याकडे स्टार्ट-अप आहे'! हे बदल बिम्सटेक देशांची म्हणजे बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड यांची प्रमुख शक्ती आहेत . भारताचे स्टार्टअप्स असोत किंवा बिम्सटेक देशांचे स्टार्ट अप्स दोघांची ऊर्जा सारखीच आहे.  या कार्यक्रमात बिमस्टेक देशांचे सन्माननीय मंत्री, बांगलादेशचे  जुनैद अहमद पलक जी, भूतानचे लिंपो श्री लोकनाथ शर्मा जी, म्यानमारचे ऊ थाऊँग तुन जी, नेपाळचे लेखराज भट्ट जी, श्रीलंकाचे नमाल राजपक्षे, आणि बिमस्टेकचे महासचिव तेन्झिन लेकफेल, मंत्रिमंडळातील माझे सहकारी पियुष गोयल,  प्रकाश जावडेकर, हरदीप पुरी,  सोमप्रकाश, फिक्कीचे अध्यक्ष उदय शंकर, उदय कोटक, संजीव मेहता, डॉ. संगीता रेड्डी,  सुब्रकांत पांडा, संदीप सोमाणी, हर्ष मारिवाला जी,  सिंघानिया, इतर मान्यवर आणि माझे स्टार्ट-अप जगातील तरुण सहकारी!

आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी एकाचवेळी अनेक ‘प्रारंभ’ चा दिवस आहे. आज, बिम्सटेक देशांची पहिली स्टार्ट-अप परिषद आयोजित केली आहे, आज 'स्टार्ट-अप इंडिया' चळवळीची यशस्वी पाच वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आजच भारताने कोरोनाविरूद्ध सर्वात ऐतिहासिक, सर्वात मोठी लस मोहीम सुरू केली आहे. हा दिवस आमचे वैज्ञानिक, आमचे तरुण आणि आमच्या उद्योजकांची क्षमता आणि आमचे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य क्षेत्रातील लोकांच्या कठोर परिश्रम आणि सेवा यांचा साक्षीदार आहे. कोरोनाविरूद्ध लढा सुरु करण्यापासून ते लस तयार करण्यापर्यंत,  जे काही अनुभव आपल्या सर्वांना आले आहेत, त्याच अनुभवांसह बिम्सटेक देशांमधील तरुण आणि उद्योजक आज या प्रारंभ परिषदेत सहभागी झाले आहेत. म्हणून, ही परिषद अधिक महत्वपूर्ण आहे.  मला सांगितले की या दोन दिवसात आपण अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा केल्या, आपल्या स्टार्ट-अप यशोगाथा सामायिक केल्या आणि परस्पर सहकार्याच्या नवीन संधी निर्माण केल्या आहेत. देशाने ज्या 12 क्षेत्रांत स्टार्ट-अप पुरस्कार सुरू केले त्या 12 क्षेत्रातील विजेत्यांची घोषणा देखील करण्यात आली आहे. या पुरस्कारांबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

हे शतक डिजिटल क्रांती आणि नवीन युगातील नवोन्मेषाचे आहे आणि या शतकाला आशियाचे शतक देखील म्हटले जाते आणि म्हणूनच भविष्यातील तंत्रज्ञान आशियाच्या प्रयोगशाळेतून, भविष्यातील उद्योजक आमच्याकडे तयार झाले पाहिजेत ही काळाची गरज आहे. यासाठी एकत्र काम करू शकतात, एकमेकांसाठी काम करू शकतात. आशियातील अशा देशांनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारली पाहिजे ज्यांच्याकडे साधनसंपत्ती आहे आणि सहकार्याची भावना देखील आहे. म्हणून ही जबाबदारी नैसर्गिकरित्या आपल्या सर्व बिम्सटेक देशांवर येते. आमची शतकानुशतके जुनी नाती, आपली संस्कृती, सभ्यता आणि नात्यातील समान वारसा या सर्वांनी आपल्याला एकत्र ठेवले आहे. आम्ही आमचे विचार सामायिक करतो, जेणेकरून आम्ही आमच्या कल्पना आणखी सामायिक करू. आम्ही एकमेकांचा आनंद आणि दुःख सामायिक करतो, म्हणून आमचे यश देखील सामायिक केले जाईल. याव्यतिरिक्त, आम्ही जगातील एक पंचमांश लोकसंख्येसाठी एकत्र काम करीत आहोत. आपल्याकडे सामूहिकपणे 3.8 ट्रिलियन डॉलरचे जीडीपी सामर्थ्य आहे. आपल्या युवकांकडे जी उर्जा आहे, स्वतःचे भविष्य स्वतः लिहिण्याची जी ताकद आहे, या सगळ्यात मला संपूर्ण जगासाठी नवीन शक्यता दिसतात.

मित्रांनो,

म्हणूनच मी 2018 मध्ये बिम्सटेक शिखर परिषदेत म्हणालो होतो की आम्ही सर्व देश तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात एकत्र प्रवेश करू. मी बिम्सटेक स्टार्ट अप परिषदे बद्दल देखील बोललो होतो. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आज आपण सर्व देश स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय परिषदेच्या या व्यासपीठावर एकत्र जमलो आहेत. सर्व बिमस्टेक देश आधीपासूनच परस्पर संपर्क आणि व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. 2018 मध्ये, बिमस्टेकच्या मंत्र्यांनी डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी इंडिया मोबाइल परिषदेत भाग घेतला होता. त्याचप्रमाणे आपण संरक्षण क्षेत्रात, आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात, अवकाश क्षेत्रात, पर्यावरण क्षेत्रात आणि कृषी, व्यापार या क्षेत्रातही एकत्र काम करत आहोत. आमची या सर्व क्षेत्रे जितकी  बळकट असतील, जितकी अधिक आधुनिक असतीलतितकाच अधिक फायदा आपल्या स्टार्टअप्सना होईल. हे मूल्य निर्माण चक्र आहे. याचाच अर्थ आम्ही पायाभूत सुविधा, शेती आणि व्यवसाय यासारख्या क्षेत्रात आपले संबंध दृढ करीत आहोत, यामुळे आमच्या स्टार्टअप्ससाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. आणि आमची स्टार्टअप जितके मजबूत असतील , आमच्या सर्व क्षेत्रातील विकास त्याच वेगाने होईल. 

मित्रांनो,

सर्व स्टार्टअप्स येथे व्यक्तीश: आपले अनुभव एकमेकांशी सामायिक करीत आहेत. पण परिवर्तनाच्या एवढ्या मोठ्या प्रवासात प्रत्येक देशाचे स्वतःचे अनुभव असतात. भारताने आपले 5 वर्षांचे अनुभव सगळ्यांसोबत सामायिक करण्यासाठी 'इव्होल्यूशन ऑफ स्टार्टअप इंडिया' नावाची पुस्तिका आज प्रकाशित केली आहे. प्रत्येक बिम्सटेक देशाने आपले अनुभव वेळोवेळी एकमेकांना सांगावेत अशी माझी इच्छा आहे. आपल्या अनुभवांमधून आम्हाला शिकण्यास मदत होईल. उदाहरणार्थ, भारताचा 5 वर्षाचा स्टार्ट अप प्रवास पहा. जेव्हा स्टार्टअप इंडिया मिशन सुरू केले तेव्हा आमच्यासमोरही अनेक आव्हाने होती. पण आज भारत हा जगातील सर्वात मोठी स्टार्टअप पारीस्थितिक व्यवस्था आहे. आज आपल्या देशातील 41 हजाराहून अधिक स्टार्टअप्स कोणत्या न कोणत्या मोहिमेमध्ये सहभागी आहेत.  यापैकी 5700 हून अधिक स्टार्टअप्स आयटी क्षेत्रातील आहेत, आरोग्य क्षेत्रात 3600 हून अधिक स्टार्टअप्स आहेत, तर सुमारे 1700 स्टार्टअप शेती क्षेत्रातील आहेत.

मित्रांनो,

हे  स्टार्टअप्स आज व्यवसायाची लोकसंख्याशास्त्रीय वैशिष्ट्ये देखील बदलत आहेत. आज भारतात 45 टक्के मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत ज्यांच्या संचालिका महिला आहेत आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने महिला कार्यरत आहेत. आज सर्वसाधारण आर्थिक पार्श्वभूमी असलेले  तरुणसुद्धा आपले कौशल्य आणि आपली विचारधारा सत्यात उतरवत आहेत. त्याचे निकालही आज आपल्या समोर आहेत.  2014 मध्ये भारतात युनिकॉर्न क्लबमध्ये केवळ 4 स्टार्टअप्स होते, परंतु आज 30 हून अधिक स्टार्टअप्सने 1 अब्जचा टप्पा ओलांडला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल यातील 11 स्टार्ट अप्स 2020 मध्ये युनिकोर्न क्लबमध्ये सामील झाल्या. म्हणजे, कोरोनाच्या या कठीण वर्षात!

मित्रांनो,

साथीच्या रोगाच्या या कठीण काळातच भारताने 'आत्मनिर्भर भारत’ अभियान सुरु केले.  आमचे स्टार्टअपसुद्धा यात मोठी भूमिका बजावत आहेत. साथीच्या रोगाच्या काळात मोठमोठ्या कंपन्या जेव्हा आपले अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करत होत्या, तेव्हा भारतात  स्टार्टअपची एक नवीन फौज उभी राहत होती. देशात सॅनिटायझरपासून ते पीपीई किटपर्यंत, सगळ्याची आवश्यकता होती, पुरवठा साखळीची गरज होती, यासगळ्यात आमच्या स्टार्टअप्सनी मोठी भूमिका बजावली आहे. स्थानिक गरजांकरिता स्थानिक स्टार्ट अप उभ्या राहिल्या. एका स्टार्ट-अपने ग्राहकांना स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तू पोहोचविल्या तर एखाद्याने लोकांना त्यांच्या घरी औषधे पोहोचविली. एका स्टार्टअपने अग्रणी कामगारांसाठी वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करुन दिली, तर दुसर्याने ऑनलाइन अभ्यास साहित्य तयार केले. म्हणजेच, या स्टार्टअप्सनी 'आपत्तीमध्ये संधी' देखील शोधली आणि आपत्तीमध्ये विश्वास देखील वाढविला. 

मित्रांनो,

आज, स्टार्टअपच्या यशोगाथा केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाहीत. आजच्या पुरस्कार प्राप्त स्टार्ट अपपैकी तुम्ही पहा, मेट्रो शहरांमध्ये नव्हे तर छोट्या शहरांमध्ये उभे राहिलेल्या अशा स्टार्टअप्सना आज 8 पुरस्कार देण्यात आले आहेत. काही लखनौचे आहेत, काही भोपाळचे आहेत, काही सोनपटचे आहेत, काही कोची आणि तिरुवनंतपुरममधील आहेत. कारण आज भारतातील प्रत्येक राज्य स्टार्टअप इंडिया मिशनमध्ये भागीदार आहे. प्रत्येक राज्य त्यांच्या स्थानिक संभाव्यतेनुसार समर्थन आणि इनक्यूबेटिंग स्टार्टअप्स देत आहे. आणि याचा परिणाम म्हणून, आज भारतातील 80 टक्के जिल्हे स्टार्टअप चळवळीत सामील झाले आहेत. आमच्या 45 टक्के स्टार्टअप्स टियर -2 आणि टियर -3 शहरांमध्ये येतात आणि स्थानिक उत्पादनांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करतात.

मित्रांनो,

आज लोकं आरोग्य आणि आहाराविषयी अधिक सजग झाली आहेत, या निरोगी बदलांमुळे, स्टार्टअप्ससाठीही नवीन संधी निर्माण होत आहेत. एक प्रकारे, आज अन्न व कृषी क्षेत्र हे सदाहरित क्षेत्र आहे. भारतामध्ये या क्षेत्रांच्या वृद्धीसाठी अधिक जोर दिला जात आहे.  कृषी क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी देशाने एक लाख कोटींचा कृषी पायाभूत सुविधा निधी देखील उभा केला आहे.  यामुळे आमच्या स्टार्ट अप्ससाठी नवीन मार्ग खुले झाले आहेत. आज स्टार्टअप्स शेतकर्यांशी समन्वय साधत आहेत. शेतीतून थेट आपल्या स्वयंपाक घरात चांगला दर्जेदार कृषिमाल सहज पोहोचविण्यामध्ये स्टार्ट अप मोलाची भूमिका बजावत आहेत.

मित्रांनो,

आमचे स्टार्ट-अप ही जगातील सर्वात मोठी यूएसपी आहे–त्यांची विदारण आणि विविधी क्षमता. हे स्टार्ट-अप्स आज नवीन दृष्टीकोन, नवीन तंत्रज्ञान आणि नवीन पद्धतींना जन्म देत आहेत म्हणून विदारण. आमचे स्टार्ट अप एकाच मार्गावर चालण्याचे विचार बदलत आहे. आणि दुसरे आहे विविधता. तुम्ही बघतच आहात आज वेगवेगळ्या कल्पनांसह किती स्टार्ट-अप येत आहेत. हे स्टार्टअप्स प्रत्येक क्षेत्रात आहेत आणि प्रत्येक क्षेत्रात नवीन क्रांती घडवत आहेत. आज आपल्या स्टार्टअपची श्रेणी अभूतपूर्व आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे  या स्टार्टअप्सला व्यवहारवादापेक्षा पॅशन (झपाटलेली इच्छाशक्ती) अधिक मार्गदर्शन करीत आहे.  जेव्हा कोणत्याही क्षेत्रात नवीन आव्हान येते तेव्हा कोणतेतरी स्टार्टअप्स समोर येते आणि म्हणतात की आम्ही या गोष्टी करू. भारत देखील आज या स्टार्टअप स्पिरिटसह काम करत आहे. यापूर्वी जेव्हा एखादी नवीन परिस्थिती समोर यायची, जेव्हा काही नवीन करायचे असायचे तेव्हा लोकं विचारायची हे कोण करणार? पण आज देश स्वतःच म्हणतो की आम्ही ते करू. डिजिटल पेमेंट्स असो, सौर क्षेत्राची निर्मिती असो वा एआय क्रांती असो, देशाने 'हे कोण करेल' असे विचारले नाही. देशाने ठरविले - 'आम्ही ते करू'. आणि त्याचे परिणाम आज आपल्यासमोर आहेत. आज भीम यूपीआयने पेमेंट सिस्टममध्ये बदल केला आहे. भारतात डिसेंबरमध्येच यूपीआयमार्फत 4 लाख कोटींपेक्षा जास्त रुपयांचे व्यवहार झाले. भारत सौर क्षेत्रात नेतृत्व करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, जगातील मोठ्या देशांच्या तुलनेत भारतात एआय चा वापरही खूप वेगवान झाला आहे.

मित्रांनो,

ज्याप्रमाणे स्टार्टअप्स कोणत्याही क्षेत्रातील अडथळे मोडून त्याचे निराकरण करतात त्याचप्रमाणे आज भारत प्रत्येक क्षेत्रातील जुने अडथळे मोडून काढत आहे. आज गरीब, शेतकरी, विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण अर्थात डीबीटी च्या माध्यमातून त्यांना थेट आर्थिक मदत मिळत आहे. यामुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या अडचणींपासून त्यांची सुटका झाली आहे. आणि देशभरातील सुमारे दोन लाख कोटी रुपयांची गळती देखील रोखली आहे. त्याचप्रमाणे आज डिजिटल इंडियाने थेट मोबाइलमध्ये सरकार, बँकिंग क्षेत्राशी संबंधित अधिक सेवा दिल्या आहेत. आमचे स्टार्टअप्स देखील देशात हे बदल अनुभवत आहेत.

आज GeM  पोर्टल द्वारे सरकारी निविदांमध्ये स्टार्टअपला देखील मोठ्या कंपनीइतकीच संधी मिळत आहे. आतापर्यंत सुमारे 8,000 स्टार्टअप्सची  ' GeM  पोर्टल' वर नोंदणी झाली असून त्यांनी सुमारे 2300 कोटी रुपयांचा व्यवसायही केला आहे. आज GeM   पोर्टलवरील एकूण व्यवसाय सुमारे 80 हजार कोटींवर पोहोचला आहे. आगामी काळात स्टार्टअपचा वाटा आणखीन वाढेल. जर हा पैसा आमच्या स्टार्टअपपर्यंत पोहोचला तर स्थानिक उत्पादन  देखील वाढेल, मोठ्या संख्येने तरुणांना रोजगारही मिळेल आणि स्टार्टअप्स संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रातही अधिक गुंतवणूक करतील.

मित्रांनो,

आमच्या स्टार्टअपन भांडवलाची कमतरता भासू नये यासाठी देशाने अनेक पावले उचलली आहेत. त्यालाच अनुसरून मी आज या कार्यक्रमात आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा करत आहे. स्टार्टअप्सला प्रारंभिक भांडवल देण्यासाठी देश एक हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप इंडिया बीज भांडवल योजनेची घोषणा करतो. हे नवीन स्टार्टअप्स सुरू होण्यास आणि त्यांची वाढ होण्यास मदत होईल. फंड ऑफ फंड योजनेच्या माध्यमातून भाग भांडवल वाढविण्यासाठी आधीपासूनच स्टार्टअपना मदत केली जात आहे. याशिवाय सरकार हमी देऊन भांडवल उभे करण्यासाठी देखील मदत करेल.

मित्रांनो,

‘युवकांचे, युवकां करवी, युवकांसाठी’ या मंत्रावर आधारीत स्टार्टअप व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने भारत प्रयत्न करत आहे. स्टार्टअप इंडिया अभियानाच्या माध्यमातून आमच्या युवकांनी या पाच वर्षात याचा पाया मजबूत केला आहे. आम्हाला पुढच्या पाच वर्षांसाठी ध्येय निश्चित केले पाहिजे, आणि हे ध्येय, आपले स्टार्टअप्स, आपले युनिकॉर्न जगात सर्वात मोठे म्हणून उदयास आले पाहिजेत आणि भविष्यातील तंत्रज्ञानात अग्रणी असले पाहिजेत, हे असायला हवे. सर्व बिम्सटेक देशांनी एकत्रित हा संकल्प केला तर   मोठ्या लोकसंख्येला याचा फायदा होईल, सर्व देशातील लोकांचे जीवन अधिक सुकर होईल.  जेव्हा मी बिम्सटेकशी संबंधित देशांच्या स्टार्ट अप्सच्या यशोगाथा पाहतो आणि ऐकतो तेव्हा माझा आनंद द्विगुणीत होतो.  बिम्सटेक देशांमधील सर्व स्टार्ट अप्सना शुभेच्छा. मला विश्वास आहे की या नवीन दशकात आपण एकत्र येऊन या संपूर्ण क्षेत्रात  स्टार्ट अपची एक नवीन ओळख निर्माण करू,  बिम्स्टेक देशांच्या स्टार्ट-अपची शक्ती संपूर्ण जगाला दाखवून देवू. या शुभेच्छांसह, तुमचे मनःपूर्वक आभार आणि तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा.

 

* * *

M.Chopade/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1689395) Visitor Counter : 823