उपराष्ट्रपती कार्यालय

फोंडा इथल्या मातृछाया या मुलींच्या अनाथाश्रमाला उपराष्ट्रपतींची सपत्नीक भेट


सामाजिक उत्तरदायित्व निभावत स्वयंसेवी संस्थाना सहाय्य करण्याचे उपराष्ट्रपतींचे खाजगी कंपन्यांना आवाहन

लोकांच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी निःस्वार्थी भावनेने अथक काम करणाऱ्या आघाडीच्या कोविड योद्ध्यांची श्री नायडू यांनी केली प्रशंसा

Posted On: 16 JAN 2021 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2021

उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू आणि त्यांच्या पत्नी उषा नायडू यांनी आज गोव्यातल्या पणजी पासून 40 किलोमीटरवर असलेल्या फोंडा इथल्या मातृछाया या मुलींच्या अनाथाश्रमाला भेट देत तिथला कर्मचारी वर्ग आणि या आश्रमातील मुलींशी  संवाद साधला. यावेळी उपराष्ट्रपतींसमवेत त्यांची कन्या आणि स्वर्ण भारत ट्रस्टच्या व्यवस्थापकीय विश्वस्त दीपा वेंकट  आणि इतर कुटुंबीय होते. 

अनाथ मुलींच्या विकासासाठी संस्थेच्या कार्याची माहिती यावेळी उपराष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी यांना देण्यात आली. मातृछाया ट्रस्ट सदस्यांच्या निष्ठापूर्वक कार्याने आपण प्रभावित झालो असून,समाजातल्या घटकांची काळजी घेण्याबाबत  भारताच्या प्राचीन तत्वज्ञानाला  अनुसरत हे सदस्य समाजाची सेवा करत असल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी त्यांची  प्रशंसा केली. सेवा भाव अनुसरल्याने  मोठे समाधान लाभू शकते असे ते म्हणाले.

आश्रमातील 800 पेक्षा जास्त मुलीना दत्तक देऊन त्यांना घर मिळवून दिले  आहे आणि 30 हून अधिक मुलींचा विवाह झाला आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. इथे दाखल झालेल्यापैकी अनेक जणींनी शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट  कामगिरी केल्याबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले.

अनाथाश्रम आणि या सारख्या  कार्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या  प्रयत्नांना अनेक स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभत असल्याचे ते म्हणाले. सामाजिक उत्तरदायित्व निभावत खाजगी कंपन्यांनी अशा निष्ठेने समाज सेवा करणाऱ्या  स्वयंसेवी संस्थाना सहाय्य करण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.

मातृछाया ट्रस्टने हाती घेतलेल्या इतर सामाजिक उपक्रमांची माहिती उपराष्ट्रपतींना देण्यात  आली. त्यामध्ये तळोली इथे मुलांसाठी बाल कल्याण आश्रम, मडगाव इथे मुलींसाठी घर, गरजू रुग्णासाठी अल्प काळासाठी निवाऱ्याची सोय यांचा समावेश होता. सामाजिक कार्यकर्त्यांच्या एका गटाने 1976 मध्ये एकत्र येऊन मातृछाया स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.

आज सुरु करण्यात आलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरण अभियानाची प्रशंसा करत देशासाठी ही अभिमानाची बाब  असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. आपल्या वाढत्या निर्भरतेचे हे द्योतक आहे असे त्यांनी सांगितले. लोकांच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी निःस्वार्थी भावनेने अथक काम करणाऱ्या आघाडीच्या कोविड योद्ध्यांची आणि वैज्ञानिकांची त्यांनी प्रशंसा केली.

 

Jaydevi P.S /N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1689175) Visitor Counter : 123