नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

छतावरील सौर योजनेबद्दल मार्गदर्शक सूचना

Posted On: 15 JAN 2021 8:23PM by PIB Mumbai

 

घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवून सौर उर्जा निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारचे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय ग्रीड-संलग्न  रूफटॉप सौर योजना (टप्पा  -II) राबवत आहे. या योजनेंतर्गत मंत्रालय पहिल्या 3 किलोवॅटसाठी 40% अनुदान आणि 3 किलोवॅटच्या पुढे 10 किलोवॅटपर्यंत 20% अनुदान देत आहे. स्थानिक वीज वितरण कंपन्यांमार्फत ही योजना राज्यात राबवली जात आहे.

मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे की काही रूफटॉप सौर कंपन्या / विक्रेते हे आपण मंत्रालयाने अधिकृत केलेले विक्रेते असल्याचा दावा करून रूफटॉप सौर प्रकल्प उभारत  आहेत. मंत्रालयाने कोणत्याही विक्रेत्यास अधिकृत केले नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ही योजना राज्यात केवळ डिसकॉमद्वारे राबवली जात आहे. डिसकॉमने निविदा प्रक्रियेद्वारे विक्रेत्यांची नेमणूक केली असून छतावरील सौर प्रकल्प उभारण्यासाठी दर निश्चित केले आहेत.

यासाठी  जवळपास सर्व डिसकॉमनी ऑनलाइन प्रक्रिया जारी केली आहे. एमएनआरई योजनेंतर्गत छतावर  सौर प्रकल्प उभारण्यास इच्छुक असलेले निवासी ग्राहक ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि सूचीबद्ध विक्रेत्यांकडून छतावर सौर प्रकल्प उभारू शकतात. यासाठी त्यांना विक्रेत्यास विहित दरानुसार मंत्रालयाने दिलेली अनुदानाची रक्कम कमी करून छत सौर संयंत्र किंमत भरावी लागेल. त्याची प्रक्रिया डिसकॉमच्या ऑनलाइन पोर्टलवर देण्यात आली आहे. मंत्रालयाकडून विक्रेत्यांना अनुदानाची रक्कम डिस्कॉमच्या माध्यमातून दिली जाईल. घरगुती ग्राहकांना सांगितले जात आहे  की मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी त्यांनी डिस्कॉम्सकडून मान्यता देण्यात आलेल्या विक्रेत्यांकडूनच छतावर सौर प्रकल्प बसवावेत.

सूचिबद्ध  विक्रेत्यांद्वारे स्थापित केलेली सौर पॅनेल्स आणि इतर उपकरणे मंत्रालयाच्या मानक आणि वैशिष्ट्यांनुसार असावीत  आणि त्यामध्ये विक्रेत्याद्वारे  छतावरील  सौरऊर्जा प्रकल्पाच्या  5 वर्ष देखरेखीचाही समावेश असेल.

हे देखील मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे की काही विक्रेते देशांतर्गत ग्राहकांकडून डिसकॉमने ठरवलेल्या दरापेक्षा अधिक किंमत आकारत आहेत, जे चुकीचे आहे. ग्राहकांनी  डिसकॉमने  ठरवलेल्या दरांनुसारच पैसे द्यावेत अशी सूचना करण्यात येत आहे .  अशा विक्रेत्यांची ओळख पटवून त्यांना शिक्षा करण्याचे निर्देश डिस्कॉमना देण्यात आले आहेत.

अधिक माहितीसाठी संबंधित डिसकॉमशी संपर्क साधा किंवा एमएनआरईचा टोल फ्री क्रमांक 1800-180-3333 डायल करा. आपल्या डिसकॉमचे ऑनलाइन पोर्टल जाणून घेण्यासाठी https://solarrooftop.gov.in/grid_others/discomPortalLinks  वर क्लिक करा.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1688905) Visitor Counter : 346