कृषी मंत्रालय
प्रधानमंत्री फसल बिमा योजनेला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली विविध संबंधितांची बैठक
योजनेसमोरची आव्हाने आणि पुढील अंमलबजावणीबाबत राज्य सरकारे, बँका आणि विमा कंपन्यांशी चर्चा
प्रधानमंत्री फसल बिमा योजना शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच - केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर
Posted On:
13 JAN 2021 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2021

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेला आज पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी देशभरातील या योजनेशी संबंधितांशी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी योजनेविषयी जागृती आणि प्रसार करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
शेतकऱ्यांना अगदी कमी आणि समान हप्त्यांमध्ये त्यांच्या पिकाबाबत व्यापक तसेच सर्वंकष सुरक्षा मिळावी या हेतूने 13 जानेवारी 2016 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली होती.
या योजनेची देशभरात प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल तोमर यांनी यावेळी राज्य सरकारे, बँका आणि विमा कंपन्यांचे अभिनंदन केले. या योजनेमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याची काही ठळक उदाहरणे त्यांनी यावेळी सांगितली. यात आंध्रप्रदेश आणी कर्नाटकातील दुष्काळ, हरियाणातील गारपीट आणि राजस्थानात झालेल्या टोळधाडीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
ही योजना, पीक विमा योजनांमधील मैलाचा दगड असून या अंतर्गत संपूर्ण पीकचक्रादरम्यान, नैसर्गिक संकटांमुळे काहीही नुकसान झाले, तर त्याची भरपाई शासनाकडून मिळू शकते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 90,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. कोविड -19 च्या संक्रमण काळातही योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे सुरु होती. या काळात 69.70 लाख शेतकऱ्यांना विम्यापोटी एकूण 8741.3 कोटी रुपयांची मदत देण्यात आली, असे तोमर यांनी सांगितले.
या बैठकीत राज्य सरकारांचे अधिकारी, बँक आणि विमा कंपन्यांचे अधिकारी असे 150 प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी सर्व संबंधितांनी योजनेच्या महत्वाच्या वैशिष्ट्यांविषयी चर्चा केली. ज्यात, जमिनीचे दस्तऐवज PMFBY पोर्टलशी संलग्न करणे, पीक विमा मोबाईल अॅप, उपग्रह छायाचित्रांची मदत, रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान यामुळे देशभरात योजनेची अंमलबजावणी करणे सोपे झाले आहे.
या योजनेत आणखी सुधारणा करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून फेब्रुवारी 2020 मध्ये ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत दरवर्षी साडेपाच कोटी शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारले जातात. गेल्या पाच वर्षात 28 कोटी शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.
यावेळी बोलतांना कृषी सचिव संजय अग्रवाल यांनी सांगितले की PFMBY ही जगातील सर्वात मोठी पीक विमा योजना आहे. तसेच कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराचेही हे उत्तम उदाहरण आहे.
यावेळी PFMBY योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भूतानी यांनी सादरीकरण केले. (सादरीकरणासाठी येथे क्लिक करा)
या योजनेअंतर्गत मोठ्या संख्येने नोंदणी केल्याबद्दल, तोमर यांच्यासह कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि कैलाश चौधरी यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
S.Tupe/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1688365)
Visitor Counter : 179