आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

एनएसीओ आणि आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या रेड-रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या अंतिम फेरीचे डॉ हर्षवर्धन यांच्या हस्ते उद्घाटन

“कार्यक्षम युवाशक्तीच्या निर्मितीसाठी उत्तम आरोग्य ही पहिली अट”

Posted On: 12 JAN 2021 9:19PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आयोजित केलेल्या रेड-रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे हे ही यावेळी उपस्थित होते.

आज आपण राष्ट्रीय युवा दिन 2021 साजरा करत असताना, आज इथे उपस्थित राहण्याची संधी मिळणे हे माझे सौभाग्य आहे, असे डॉ. हर्ष वर्धन यावेळी म्हणाले.

भारताचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश देशासाठी अनुकूल असल्याचे नमूद करत, डॉ हर्षवर्धन म्हणाले की भारताची लोकसंख्या आज जगातली सर्वात युवा लोकसंख्या समजली जाते.

या लाभांशाचा अधिकाधिक लाभ घेण्याच्या दृष्टीने सर्वांना नोकरी किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत आहे. एका विश्लेषणानुसार, उत्तम आरोग्य, उत्तम शिक्षण, रोजगाराच्या संधी आणि निर्णय प्रक्रियेत अधिकाधिक सहभाग या घटकांमुळे देशवासियांचे जीवनमान उंचावू शकेल, आणि या लोकसांख्यिक लाभांशाचा भारताला पुरेपूर उपयोग होऊ शकेल.

देशात पहिली वाहिली  रेड रिबन क्लब प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केल्याबद्दल डॉ हर्ष वर्धन यांनी एनएएसओचे आणि राज्य पातळीवरील एड्स नियंत्रण संस्थांचे अभिनंदन केले. जिल्हा, राज्य आणि प्रादेशिक पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत देशभरातील 5000 पेक्षा जास्त महाविद्यालये सहभागी झाली होती.

एनएएसओ, एनसीईआरटी सोबत देशात 2005 पासून 50,000  पेक्षा जास्त शाळांमध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबवत आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एनएएसओ ने 12,500 रेड रिबन क्लब सुरु केले आहेत, असे हर्ष वर्धन यांनी सांगितले. एचआयव्ही ला प्रतिबंध करणे, काळजी घेणे, रुग्णांवर उपचार आणि त्यांना मदत करणे तसेच स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणे या उद्दिष्टांसाठी हा क्लब काम करतो.

निरोगी, निरामय आयुष्यावर भर देत डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, देशात जर कार्यक्षम युवाशक्तीची निर्मिती करायची असेल, तर त्यासाठीची पूर्व अट उत्तम आरोग्य ही आहे. त्यामुळे निरोगी आयुष्य काय असते याची पूर्ण जाणीव आमच्या युवकांना असणे आवश्यक आहे, तरच ते उत्तम सवयींसाठी योग्य निर्णय घेऊ शकतील, असे ते म्हणाले.

राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी यावेळी स्वामी विवेकानंद यांचे स्मरण केले आणि आजचे युवा त्यांच्या आदर्शांनुसार वाटचाल करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

आरोग्य सहसचिव आलोक सक्सेना आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

S.Tupe/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1688083) Visitor Counter : 6