जलशक्ती मंत्रालय

राष्ट्रीय जल जीवन मिशन पथकाने दिली मणीपूरला भेट

Posted On: 12 JAN 2021 6:54PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय जल जीवन मिशनच्या सहा सदस्यांचे पथक  दिनांक 10 ते 13 जानेवारी 2021 दरम्यान मणिपूरच्या दौऱ्यावर आहे. जल जीवन मिशनच्या 'हर घर जल' या महत्वाकांक्षी  मोहिमेचे महत्त्व या राज्याला समजावून देऊन, ते लक्ष्य गाठण्यासाठी राज्याला तांत्रिक साहाय्य देणे, हे या पथकाचे उद्दिष्ट आहे. 'जल जीवन मिशन' या मोहीमेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या समस्या आणि अडचणी ओळखणे तसेच देशाच्या इतर भागांत या मोहिमेसाठी राबविण्यात आलेल्या उत्तम कार्यपद्धतींचे दस्तावेजीकरण आणि त्यांच्या प्रतिकृती तयार करणे हे या पथकाचे उद्दिष्ट आहे.

हे पथक आपल्या चार दिवसांच्या दौऱ्यात काक्चिंग, थाउबल, विष्णुपुर आणि नोनी या जिल्ह्यांना भेट देईल. ते यावेळी पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीत सामील असलेले विभागीय पातळीवरील अधिकारी, तसेच ग्रामप्रधान, आणि या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या पायाभूत सुविधांची देखभाल घेणारे ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी चर्चा करणार आहेत. या कामाच्या प्रगतीची  माहिती देण्यासाठी आणि कार्यक्रम जलदगतीने कार्यान्वित करण्यात मध्यस्थ म्हणून काम करण्यासाठी हे पथक जिल्हा जल आणि स्वच्छता मिशनचे अध्यक्ष/उपायुक्त यांच्यासोबत बैठका घेतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी या सत्रांचा आढावा घेण्याचे या पथकाने ठरविले आहे.

मणीपूर राज्यात सुमारे 4.51 लाख ग्रामीण कुटुंब आहेत,त्यापैकी 1.67 लाख (37%) कुटुंबांना नळाने पाणीपुरवठा केला जात आहे. 2020-21 या कालावधीत सुमारे 2 लाख घरांना घरगुती नळजोडणी देण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. 2021-22 या वर्षापर्यंत जल जीवन मोहिमेअंतर्गत सर्व ग्रामीण कुटुंबांना 100% नळजोडणी देण्याचे राज्याने सुनिश्चित केले आहे. 'जल जीवन मिशन' हा ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधानांनी जाहीर केलेला महत्वाकांक्षी उपक्रम असून त्याचे उद्दिष्ट 2024 पर्यंत सर्व ग्रामीण कुटुंबांना आवश्यकतेनुसार आणि विहित गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा करणे हे आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सर्व लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी देणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. केंद्र सरकार राज्य सरकारांना सर्वतोपरी मदत करण्यास वचनबद्ध आहे. मणिपूर राज्याला 2020-21 या वर्षासाठी 131.80 कोटी रुपये निधीवाटप झाले आहे.

 

 

***

S.Tupe/Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1688019) Visitor Counter : 156