संरक्षण मंत्रालय

जबाबदार नागरिक म्हणून युवकांना घडवण्यासाठी एनसीसी कटीबद्ध, भविष्यातल्या आव्हानांसाठी युवकांना सज्ज करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण: महासंचालक एनसीसी

Posted On: 08 JAN 2021 10:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जानेवारी 2021


राष्ट्र उभारणीच्या कार्यात भरीव योगदान देणारे जबाबदार नागरिक म्हणून युवकांना घडवण्यासाठी एनसीसी कटीबद्ध असल्याचे राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक  लेफ्टनंट जनरल तरुण कुमार आईच यांनी म्हटले आहे. 26 जानेवारीला होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनात एनसीसी छात्रांची दोन पथके सहभागी होणार असून मुलांचे एक आणि मुलींचे एक पथक असेल अशी माहिती त्यांनी आज नवी दिल्लीत प्रसार माध्यमांना दिली. प्रजासत्ताक दिन शिबीर, आरडीसी-2021 मध्ये सहभागी होणाऱ्या छात्रांमधून यासाठी निवड करण्यात येणार आहे. 4 जानेवारी 2021 पासून दिल्लीत करिअप्पा परेड मैदानात हे शिबीर सुरु झाले आहे. एक महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात 28 राज्ये आणि 9 केंद्र शासित प्रदेशातल्या 380 महिला छात्रांसह 1000 छात्र सहभागी झाले आहेत. आपल्या देशाची समृध्द संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून घडवण्याचा प्रजासत्ताक दिन शिबिराचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान 28 जानेवारीला पीएम रॅलीसाठी एनसीसी शिबिराचा दौरा करणार आहेत. 

कोविड -19 महामारीदरम्यान 1,39,961 एनसीसी छात्र आणि 21,380 कर्मचाऱ्यांच्या  योगदानाची त्यांनी प्रशंसा केली.    

'एनसीसी योगदान' या माध्यमातून वाहतूक व्यवस्था, अन्नधान्य आणि आवश्यक वस्तुचे वितरण, रांगेचे व्यवस्थापन, सोशल डीस्टन्स, ज्येष्ठ नागरिकांना मदत, सीसीटीवी नियंत्रण कक्ष, भोजनाची  पैकेट तयार करून त्याचे वितरण, मास्क तयार करून गरजूंना त्याचे वाटप यासारख्या उपक्रमात एनसीसी छांत्रानी आघाडीचे कोरोना योद्धे म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे.

 

* * *

M.Chopade/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1687224) Visitor Counter : 132