वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून धण्याची आयात कमी करून निर्यातीला प्रोत्साहन देण्याकरिता आराखडा तयार करण्यासाठी भारतीय मसाला मंडळाने केले वेबिनारचे आयोजन

Posted On: 06 JAN 2021 5:18PM by PIB Mumbai

 

'गुणवत्तापूर्ण उत्पादन, कापणी पश्चात मूल्यवर्धन आणि भारतातून धणे निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीएआर-एनआरसीएसएस, आरएसएएमबी आणि कोटा कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय मसाला मंडळ आणि जैवतंत्रज्ञान विभाग-दक्षिण आशियाई जैवतंत्रज्ञान केंद्र बायोटेक किसान हब यांच्या वतीने विविध राज्यांतील शंभराहून अधिक प्रमुख भागधारकांच्या सहभागासह 4 जानेवारी 2021 रोजी धणे विश्व या वेबिनारचे आयोजन करण्यात आले. दक्षिण-पूर्वेकडील राजस्थानचा हाडोती व मध्य प्रदेशातील गुना जिल्हा हा धणे (कोरीएंड्रम सॅटिव्हम एल.) उत्पादनासाठी ओळखला जातो आणि देशातील धणे निर्यातीत त्याचा मोठा वाटा आहे.

हाडोती-गुना क्षेत्राची अफाट क्षमता लक्षात घेता, भारतीय मसाले मंडळाचे अध्यक्ष तथा सचिव डी सथियान यांनी उद्योजक व निर्यातदारांना धणे तसेच धना डाळ, धने पावडर तसेच अर्क आदी इतर प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीत प्रचंड संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

मसाले मंडळाचे डॉ. श्रीशैल कुलोली यांनी प्रगत प्रक्रिया यंत्रणेद्वारे धण्यापासून व्हिनेगर, सॉस, धने पावडर आणि अर्क यांची उत्पादने घेण्याबरोबरच सुयोग्य साठवण क्षमतेद्वारे उत्पादनांची गुणवत्ता जपून ठेवण्याकडे लक्ष वेधले. मसाले मंडळाचे डॉ दिनेशसिंग बिष्ट यांनी धण्यामधील गुणवत्तेच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला आणि जपान, युरोप आणि अमेरिकेसह विकसित देशांमधून धणे आयातीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कीटकनाशकांचे अवशेष नष्ट करण्याबरोबरच स्वच्छतेच्या समस्येचे निराकरण करण्याची आठवण त्यांनी निर्यातदारांना करून दिली.

भारतातील कढीपत्ता आणि कोथिंबिर यापासून तयार केलेले माउथ फ्रेशनर यासारख्या मूल्यवर्धित उत्पादनांचा आढावा घेताना देशांतर्गत तसेच निर्यात बाजारात धण्याचा वापर वाढविण्याचे सुचविले गेले.

कोटा जिल्ह्यातील रामगंज एपीएमसी मंडी ही आशियातील सर्वात मोठी धणे मंडई आहे आणि अशा प्रकारे रामगंजला धणे शहरम्हणूनही ओळखले जाते. अलीकडेच, भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने (एमओएफपीआय) कोटा जिल्ह्याला एक जिल्हा एक उत्पादनाच्या (ओडीओपी) यादीमध्ये धणेउत्पादनासाठी नियुक्त केले आहे.

 

S.Tupe/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1686562) Visitor Counter : 299