पंतप्रधान कार्यालय
संशोधनाचा विविधांगी उपयोग आणि नवोन्मेशाच्या संस्थात्मकतेचे पंतप्रधानांचे आवाहन
Posted On:
04 JAN 2021 8:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2021
मानवाच्या आत्म्याप्रमाणे संशोधन म्हणजे चिरंतन उपक्रम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. संशोधनाचा विविधांगी वापर आणि नवोन्मेश संस्थात्मकता अशा दुहेरी उद्दिष्टांच्या दिशेने सरकार काम करत असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय मापनशास्त्र परिषद 2021 मध्ये ते बोलत होते. पंतप्रधानांनी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे राष्ट्रीय आण्विक कालदर्शिका आणि भारतीय निर्देशक द्रव्य प्रणाली राष्ट्राला अर्पण केली तसेच राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळेची पायाभरणीही केली.
ज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये संशोधनाची भूमिका त्यांनी तपशीलवार विशद केली. कोणत्याही प्रगतीशील समाजात संशोधन ही केवळ नैसर्गिक सवय नव्हे तर नैसर्गिक प्रक्रियाही असते. संशोधनाचा प्रभाव हा वाणिज्यिक किंवा सामाजिक असतो असे सांगून आपले ज्ञान आणि आकलन यांची क्षितिजे विस्तारण्यासाठी संशोधन मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.संशोधनाची भविष्यातली दिशा आणि त्याचा उपयोग याचा अंदाज आधीच बांधणे दरवेळी शक्य नसते. संशोधन हे नेहमीच ज्ञानाच्या नव्या अध्यायाकडे नेते आणि ते कधीच व्यर्थ जात नाही हे निश्चित असल्याचे ते म्हणाले. जेनेटिक्सचे जनक मेंडल आणि निकोलस टेस्ला यांचे उदाहरण देत त्यांच्या कार्याची दखल खूप उशिराने घेतली गेल्याचे ते म्हणाले.
अनेकदा ज्या उद्देशाने संशोधन केले जाते तो उद्देश पूर्ण होत नाही मात्र इतर क्षेत्रासाठी ते संशोधन महत्वाचे ठरते. यासाठी त्यांनी जगदीशचंद्र बोस यांचे उदाहरण दिले. जगदीशचंद्र बोस यांचा सूक्ष्म तरंग सिद्धांत वाणिज्यिक दृष्ट्या पुढे गेला नाही मात्र आज संपूर्ण रेडीओ कम्युनिकेशन त्यावर आधारलेले आहे.जागतिक महायुद्धा दरम्यान केलेल्या संशोधनाने नंतरच्या काळात विविध क्षेत्रात क्रांती घडवल्याचे पंतप्रधान म्हणाले. ड्रोनची निर्मिती युद्धासाठी केली गेली मात्र आजच्या काळात त्याचा उपयोग छायाचित्रण आणि सामान पोहोचवण्यासाठीही त्याचा उपयोग होत आहे. म्हणूनच आपल्या वैज्ञानिकांनी विशेष करून युवा वैज्ञानिकांनी संशोधनाच्या विविधांगी उपयोगाच्या शक्यता शोधायला हव्यात असे आवाहन त्यानी केले. त्यांच्या संशोधनाचा, त्यांच्या क्षेत्रा बाहेर उपयोग करण्याची शक्यता यामध्ये नेहमीच अग्रेसर हवी.
एखादे छोटे संशोधनही जगाचा चेहरा मोहरा कसे बदलू शकते असे सांगत त्यांनी विजेचे उदाहरण दिले.आजच्या काळात परिवहन, दळणवळण, उद्योग आणि दैनंदिन जीवनातली प्रत्येक बाब त्यावर अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे सेमी कंडक्टर सारख्या शोधाने, डिजिटल क्रांतीसह आपले जीवन समृध्द केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या युवा संशोधकासमोर अशा अनेक शक्यता असून त्यांचे संशोधन आणि शोध यामुळे भविष्य अगदी वेगळे असेल असे पंतप्रधान म्हणाले.
भविष्यासाठी सज्ज अशी परिसंस्था उभारण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचा तपशील त्यांनी दिला. जागतिक नवोन्मेश क्रमवारीत भारताने पहिल्या 50 मध्ये स्थान प्राप्त केले आहे. विज्ञान आणि अभियांत्रिकी प्रकाशन पिअर रिव्ह्यूमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर असून यातून मुलभूत संशोधनावरचा भर दिसत आहे. उद्योग आणि संस्था यांच्यातला सहयोग वाढवण्यात येत आहे. जगातल्या सर्व मोठ्या कंपन्या आपल्या संशोधन सुविधा भारतात उभारत आहेत. मागच्या काही वर्षात अशा सुविधांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
संशोधन आणि नवोन्मेश यासाठी भारतीय युवा वर्गाला अमर्याद संधी आहेत. म्हणूनच नवोन्मेशासाठी संस्थाकरण हे नवोन्मेशाइतकेच महत्वाचे असल्याचे पंतप्रधान म्हणाले. बौद्धिक संपत्तीचे संरक्षण कसे करायचे हे आपल्या युवा वर्गाला ज्ञात असले पाहिजे. जितके आपले स्वामित्व हक्क जास्त तितका त्यांचा उपयोग जास्त हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपले संशोधन जितके बळकट तितकीच आपली ओळख दृढ होईल. यामुळे ब्रान्ड इंडिया अधिक बळकट होईल असे पंतप्रधान म्हणाले.
वैज्ञानिकांना कर्मयोगी असे संबोधत प्रयोगशाळेत ते ऋषीच्या तपस्येप्रमाणे प्रयत्न करतात अशा शब्दात त्यांनी वैज्ञानिकांची प्रशंसा केली. 130 कोटी भारतीयांच्या आशा- आकांक्षांच्या पूर्ततेचे ते माध्यम आहेत असे त्यांनी सांगितले.
M.Iyengar/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1686077)
Visitor Counter : 926
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam