गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते मणिपूरमध्ये अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ

Posted On: 27 DEC 2020 8:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 डिसेंबर 2020


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज मणिपूरमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. अमित शाह यांनी ई-ऑफीस आणि थोबल बहुउद्देशीय प्रकल्पाचे इम्फाळमध्ये आभासी पद्धतीने उद्घाटन केले. तसेच त्यांनी सात प्रमुख प्रकल्पांची पायाभरणी केली. यात चुराचंदपूर वैद्यकीय महाविद्यालय, मंत्रीपुखरी येथील आयटी-सेझ, द्वारका नवी दिल्ली येथील मणिपूर भवन आणि इम्फाळ येथील एकात्मित नेतृत्व व नियंत्रण केंद्र यांचा समावेश आहे.  

याप्रसंगी बोलताना अमित शाह म्हणाले, इम्फाळमधील राज्य पोलीस मुख्यालय आणि स्मार्ट सिटी एकात्मिक केंद्र यामुळे स्मार्ट गव्हर्नन्सला चालना मिळेल. शाह म्हणाले की आयआयटी आणि आयटी-सेझमुळे मणिपूरचा युवक जगाशी जोडला जाईल. आयटी-सेझच्या निर्मितीनंतर, मणिपूरच्या जीडीपीमध्ये वार्षिक 4,600 कोटी रुपयांनी वाढ होणार आहे आणि यामुळे 44,000 जणांना रोजगार मिळेल. वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीमुळे, मणिपूरचा युवक डॉक्टर बनेल आणि राज्याची आरोग्य व्यवस्था मजबूत होईल.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मणिपूरला बंद आणि नाकेबंदीतून बाहेर काढून विकासाच्या मार्गावर आणले आहे. ईशान्येकडील प्रदेश पूर्वी फुटीरता आणि विविध बंडखोर चळवळींसाठी ओळखला जात होता, मात्र गेल्या साडेसहा वर्षात अनेक संघटनांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत तसेच राहिलेल्या संघटनाही मुख्य प्रवाहात येतील.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, पंतप्रधानांनी मणिपूरला इनर लाईन परमीट मंजूर केले आहे. मणिपूरची निर्मिती झाल्यापासूनची ही केंद्र सरकारची सर्वात मोठी उपलब्धी आहे.

थोबल बहुउद्देशीय प्रकल्पाविषयी बोलताना अमित शाह म्हणाले, या योजनेमुळे 35,104 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल आणि लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल.

अमित शाह पुढे म्हणाले, पूर्वी राज्यातील केवळ 6 टक्के जनतेला पिण्याचे पाणी मिळत होते, पण जल जीवन मिशनमुळे गेल्या 3 वर्षांत राज्यातील 33 टक्के घरांना नळाव्दारे  पाणीपुरवठा केला जात आहे. परदेशी पर्यटकांच्या संख्येत 222 पटीने वाढ झाली आहे. शाह म्हणाले, मणिपूरसारख्या भूप्रदेशात स्टार्टअप योजना फार महत्त्वाची आहे. 14 व्या वित्त आयोगाच्या तुलनेत ईशान्येकडील राज्यांना 15 व्या वित्त आयोगात 251 टक्के अधिक वाटा देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. राज्यात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात येत आहे. त्यांनी सुचवले की, राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये राज्यात सुरु करावीत.त्यामुळे ईशान्ये कडील मुले या क्षेत्रात प्रगती करतील.   

 

* * *

G.Chippalkatti/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1684024) Visitor Counter : 250