पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरच्या सर्व नागरिकांपर्यंत लाभ पोचवण्याच्या हेतूने आयुष्मान भारत पीएम-जय सेहत योजनेचा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केला प्रारंभ


डीडीसी निवडणुकांमुळे आपल्या लोकशाहीची शक्ती दिसली : पंतप्रधान

जम्मू-काश्मीरचा विकास आपल्या सरकारच्या प्राधान्यक्रमातील एक महत्वाची बाब : पंतप्रधान

Posted On: 26 DEC 2020 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीरच्या सर्व नागरिकांपर्यंत लाभ पोचवण्याच्या हेतूने, आयुष्मान भारत पीएम-जय सेहत योजनेचा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रारंभ केला. केंद्रीय मंत्री अमित शाह, डॉ. हर्षवर्धन, जितेंद्र सिंग व जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा याप्रसंगी उपस्थित होते. पंतप्रधानांनी या विभागातील लाभार्थ्यांशीही संवाद साधला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जम्मू-काश्मीरशी खास बंध होता असे सांगत त्यांची ‘इन्सानियत, जमुरियत, काश्मीरियत’ ही घोषणा आपल्याला मार्गदर्शनपर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीर आयुष्मान भारत पीएम-जय सेहत योजनेबद्दल बोलताना पंतप्रधानांनी या योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंतचे उपचार विनाशुल्क असल्यामुळे जीवन सुलभ झाल्याचे सांगितले. सध्या आयुष्मान भारत योजनेचा लाभ राज्यातील 6 लाख कुटुंबांना मिळत आहे. सेहत योजनेनंतर 21 लाख कुटुंबांना याचा लाभ मिळेल. या योजनेचा अजून एक फायदा विशद करताना त्यांनी सांगितले की या अंतर्गत फक्त जम्मू-काश्मीरमधीलच सरकारी वा खाजगी रुग्णालयातूनच उपचार घेण्याचे बंधन नाही. उलट, या योजनेअंतर्गत देशातील हजारो रुग्णालयातून उपचार घेता येतील.

आयुष्मान योजनेचे विस्तारित स्वरूपाचे लाभ सर्व नागरिकांपर्यंत पोचणे हे ऐतिहासिक महत्वाचे असून जम्मू- काश्मीरच्या नागरिकांच्या विकासासाठी जी पावले उचलली जात आहेत त्यावर पंतप्रधानांनी संतोष व्यक्त केला. जम्मू-काश्मीरच्या नागरिकांचा विकास ही आपल्या सरकारच्या प्राधान्यक्रमातील एक महत्वाची बाब आहे, असं सांगून पंतप्रधानांनी, “ मग तो महिला विकास असो, युवावर्गाला संधींची उपलब्धता, दलित उत्थान, पिडीत वंचितांची दखल वा नागरिकांचे घटनात्मक वा मुलभूत अधिकार राखणे, आपले सरकार जनकल्याणाचे निर्णय घेत आहे”, असे नमूद केले.

लोकशाही बळकट केल्याबद्द्ल पंतप्रधानांनी जम्मूकाश्मीरच्या नागरिकांचे अभिनंदन केले. जिल्हा विकास महामंडळांच्या (DDC) निवडणूकांनी नवा अध्याय लिहील्याचे सांगत, कोरोना आणि थंडी या दोहोंनाही दाद न देता मतदान केंद्रांपर्यंत गेल्याबद्दल त्यांनी लोकांचे कौतुक केले. मोदी म्हणाले की जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक मतदात्याच्या चेहऱ्यावर विकासाची आस होती. जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक मतदाराच्या डोळ्यांमध्ये आपल्याला विकासावरचा विश्वास बघायला मिळाला. जम्मू-काश्मीरमधील या निवडणूकांमुळे आपल्या देशातील लोकशाहीची शक्ती दिसून आली. त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असूनही, पुद्दुचेरीत पंचायत आणि नगरपालिका निवडणूका होत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. निवडून आलेल्यांची मुदत 2011 या वर्षीच संपुष्टात आली आहे.

महामारीच्या कालखंडात 18 लाख एलपीजी सिलेंडर्स जम्मुकाश्मीरमध्ये रिफील करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत 10 लाख शौचालये बांधण्यात आली, असे पंतप्रधानांनी नमूद केले. याचा उद्देश फक्त शौचालयाच्या बांधकामापुरता मर्य़ादित नाही तर लोकांचे आरोग्य सुधारण्याचा तो एक प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्यांबरोबर येत्या 2-3 वर्षांत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीरमध्या आयआयटी व आयआयएम स्थापन करण्याबाबत ही पंतप्रधान बोलले. यामुळे इकडील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे उच्च शिक्षण मिळेल, असे सांगून जम्मूकाश्मीरमध्ये दोन एम्स आणि दोन कर्करोग संस्था उभारल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या संस्थांमध्ये निम-वैद्यकिय शिक्षणही मिळेल असे त्यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरमधील युवकांना सहजपणे कर्ज उपलब्ध होत आहे आणि ते शांततेच्या मार्गावर मार्गक्रमण करत आहेत असे पंतप्रधानांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये वर्षानुवर्षे रहात असलेल्यांना डोमिसाईल (अधिवास) प्रमाणपत्रे मिळत आहेत. सर्वसाधारण श्रेणीतील गरजूंप्रमाणे आत डोंगराळ व सीमा भागातील नागरिकांनाही आता आरक्षण मिळत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

 

* * *

S.Tupe/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1683806) Visitor Counter : 199