रेल्वे मंत्रालय

छोटे व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी महत्वाच्या पार्सल व्यवसायाच्या वृद्धीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक  - केंद्रीय मंत्री पियुष गोयल


नवोन्मेषासह पार्सल व्यवसायात वेगाने वाढ करण्याची रेल्वेची योजना

एलएचबी पार्सल व्हॅनचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि ई-पेमेंट व डिजिटल पेमेंट सुविधा सुरू करण्यासाठी त्वरित पावले उचलणे आवश्यक

ईशान्येकडील प्रदेश आणि डोंगराळ भागातील रहदारी सुलभ करण्यासाठी तसेच बंदरांकडे जाणाऱ्या निर्यात वाहतुकीला आकर्षित करण्यासाठी विशेष लक्ष देणे आवश्यक

Posted On: 22 DEC 2020 7:47PM by PIB Mumbai

 

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेच्या पार्सल व्यवसायाचा आढावा घेतला. यावेळी मंडळाचे सदस्य आणि रेल्वे मंडळ व सीआरआयएसचे इतर अधिकारी उपस्थित होते.

गेल्या काही महिन्यांत भारतीय रेल्वेने पार्सल सेवांकडे अधिक व्यवसाय आकर्षित करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहे. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:

a)  कृषी व शेतीमालाच्या सुलभ वाहतुकीसाठी  किसान रेल्वे चालविणे;

b)  रिक्त परत येणाऱ्या पार्सल व्हॅन आणि पार्सल रेल्वेला सवलत ;

c)  एकाच ट्रेनमध्ये 24 पार्सल व्हॅन लोड करण्यावर सवलत;

d)  सर्व मालासाठी गोदाम व्यवस्था;

e)  खासगी मालवाहतूक टर्मिनल आणि पार्सल वाहतुकीसाठी खासगी साइडिंग

  आणि

f)  बांगलादेशात वाहतुकीसाठी पार्सल ट्रेन सुरू करत आहे.

या उपक्रमांव्यतिरिक्त, भारतीय रेल्वे पार्सल माल हाताळणे सुलभ करण्यासाठी समर्पित पार्सल टर्मिनल विकसित करण्याची योजना आखत असून सांगोला (मध्य रेल्वे), काचेगुडा (दक्षिण मध्य रेल्वे), कोयंबटूर (दक्षिण रेल्वे) आणि कांकरिया (पश्चिम रेल्वे) यांची याआधीच पथदर्शी  प्रकल्प म्हणून निवड करण्यात आली आहे.

मंत्र्यांनी यावेळी रेल्वेच्या प्रयत्नांचे आणि विशेषतः किसान रेल्वे चालविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि सांगितले की छोटे व्यापारी आणि व्यावसायिक ही सेवा वापरत असल्याने पार्सल व्यवसायाची वृद्धी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि पार्सल सेवा अधिकाधिक ग्राहक अनुकूल केल्याने या सगळ्यांना याचा थेट लाभ मिळेल. रेल्वेने पार्सल व्यवसायाच्या वाढीचे लक्ष्य निर्धारित केले असून अपेक्षित वाढ होण्यासाठी अधिक प्रयत्न आणि नाविन्यपूर्ण कल्पना आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

यावेळी मंत्र्यांनी एलएचबी पार्सल व्हॅनचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच ई-पेमेंट व डिजिटल पेमेंट सुविधा सुरू करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले. ईशान्येकडील प्रदेश आणि डोंगराळ भागातील रहदारी सुलभ करण्यासाठी तसेच बंदरांकडे जाणाऱ्या निर्याती वाहतुकीला आकर्षित करण्यासाठी पुरेशी पावले उचलण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले. पार्सल विशेष गाड्या वेळेवर चालवल्या पाहिजेत, जेणेकरुन ग्राहकांचा या सेवेवरील विश्वास वाढेल असे मंत्री म्हणाले. 

 

S.Tupe/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1682764) Visitor Counter : 98