राष्ट्रपती कार्यालय
किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठासारख्या सरकारी रुग्णालयांनी कोविड-19 संसर्गाविरुद्धच्या लढ्यात प्रमुख भूमिका निभावली आहे: राष्ट्रपती कोविंद
किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात राष्ट्रपतींनी व्हिडीओ संदेशाद्वारे केले भाषण
Posted On:
21 DEC 2020 4:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2020
किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठासारख्या सरकारी रुग्णालयांनी कोविड-19 संसर्गाविरुद्धच्या लढ्यात प्रमुख भूमिका पार पाडली आहे, त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे दाट लोकसंख्या आणि मर्यादित उत्पन्न यासारख्या अडचणींमध्ये देखील लाखो देशवासियांना कोविड-19 च्या आपत्तीला तोंड देणे शक्य झाले असे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी म्हटले आहे. लखनौच्या किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठात 21 डिसेंबर 2020 ला झालेल्या पदवीदान समारंभाला ते व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित करत होते. कोरोना आजाराशी लढा देताना अग्रभागी राहून काम करणाऱ्या, किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठासारख्या सरकारी आरोग्य संस्थांमधील डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांसारख्या योद्ध्यांचे त्यांनी विशेष आभार मानले.
या कोरोना योद्ध्यांचे आभार मानण्यास कोणतेही शब्द अपुरे आहेत असे ते म्हणाले. कोविड विरुद्धच्या लढाईत अनेक कोरोना योद्ध्यांनी त्यांचे प्राण गमावले आहेत. त्यांच्या त्यागाचे ऋण आपल्या देशावर कायम राहील असे त्यांनी सांगितले. एकविसाव्या शतकात आरोग्य सुविधेमध्ये दूरसंचार तंत्रज्ञान आणि व्यक्तिगत बुद्धिमत्ता यांच्या एकात्मिक वापराचे प्रयत्न जगभर सुरू आहेत. मोठ्या प्रमाणावर एकत्र केलेली माहिती, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि संपर्क जाळे यांच्यातील योग्य समन्वयातून आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती घडून येत आहे. किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठातील 58 विशेष विभागांमधील सोयींमुळे अशा रुग्णालयांकडे विद्याशाखेअंतर्गत किंवा अनेक विद्याशाखांची मिळून अशी संशोधनाची अमर्याद क्षमता असते. किंग जॉर्जसारख्या प्रमुख संस्थांनी पायाभूत संशोधनासाठी उच्च पातळीवर उपक्रम राबवायला हवे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी गेली अनेक दशके आरोग्य क्षेत्रात लक्षणीय योगदान दिले आहे, देश तसेच परदेशातील मुख्य वैद्यकीय संस्थांमध्ये यापैकी अनेक जण उच्चपदावर कार्यरत आहेत असे निरीक्षण यांनी नोंदविले.
अनेक गंभीर आजारांवर उपचार घेण्याकरिता जगातील विविध देशांमधून रुग्ण भारतात येत असतात कारण त्यांना इथे अत्यंत कमी खर्चात जागतिक दर्जाचे उपचार मिळतात. डॉक्टरांची जुनी आणि नवी पिढी एकत्र येऊन देशातील आरोग्य सुविधा आणि औषध निर्माण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपले डॉक्टर आणि परिचारिका यांची प्रतिभा आणि सेवाभावी वृत्ती साऱ्या विश्वात सुप्रसिध्द आहे असे ते म्हणाले. संपूर्ण जगात ‘भारतातील उपचार’ ही एक विशेष ओळख निर्माण व्हावी असे कार्य आपल्या देशातील आरोग्य क्षेत्राकडून होईल अशी इच्छा राष्ट्रपतींनी व्यक्त केली.
राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
M.Chopade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1682398)
Visitor Counter : 189