वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

पियुष गोयल यांच्या हस्ते भारत-ऑस्ट्रेलिया वित्तीय धोरण अहवालाचे प्रकाशन


ऑस्ट्रेलियाला भारतात गुंतवणूक करण्यासाठी मोठा वाव

Posted On: 18 DEC 2020 6:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर 2020

 

ऑस्ट्रेलियातील उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी अद्याप बरच वाव असून सरकारने थेट परदेशी गुंतवणूकीचे नियम शिथिल करत अनेक क्षेत्रे खुली केल्यामुळे, गुंतवणूक प्रक्रिया सुलभ झाली आहे, असे मत केंद्रीय रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केले. भारत-ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय वित्तीय आणि व्यापारी संबंध अधिक वृद्धिंगत करण्याबाबत सीआयआय ने आयोजित केलेल्या विशेष सत्रात ते आज बोलत होते. आम्ही कृषी क्षेत्रही व्यापारासाठी खुले केले असून त्यात अन्नप्रक्रिया आणि मूल्यवर्धनात गुंतवणूक करता येईल, असे ते म्हणाले. गोयल यांच्या हस्ते यावेळी भारत-ऑस्टेलिया वित्तीय धोरण अहवालाचेही प्रकाशन झाले.

आमची गुंतवणूक विषयक धोरणे अधिकाधिक सुविधाजनक, हितकारक आणि परदेशी गुंतवणुकीला पूरक करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहोत. अवकाश, अणुविज्ञान आणि संरक्षण उत्पादन अशा नव्या क्षेत्रातही आम्ही गुंतवणूकीच्या संधी खुल्या केल्या आहेत, असे गोयल म्हणाले. संरक्षण, क्रीडा, वस्त्रोद्योग, वस्त्रोद्योग डिजाईनिंग, डिजिटल गेमिंग, अॅनिमेशन, जलव्यवस्थापन, व्यावसायिक जहाज बांधणी, अवकाश सहकार्य, आणि शिक्षणक्षेत्रात डिजिटल सुविधा अशा सर्व क्षेत्रात दोन्ही देशांमधले व्यापारी संबंध संतुलित ठेवण्यास विशेष संधी आणि वाव आहे, असेही ते म्हणाले.  

अलीकडेच केलेल्या कामगार सुधारणांमुळे देशात श्रम नियमन आणि रोजगारातील लवाचिकतेची नवी व्यवस्था तयार होईल. नव्या आराखड्यात देशात पर्यटनासारख्या क्षेत्रात अनेक रोजगार तयार होतील आणि देशात पर्यटन प्रकल्प उभारणे अधिक व्यवहार्य ठरेल. देशातल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न आणखी वाढावे अशी आमची इच्छा असून त्यासाठी कृषीमालाचे मूल्यवर्धन होणे आणि जागतिक बाजाराची त्यात गुंतवणूक असणे आवश्यक आहे, असे गोयल म्हणाले.

यावेळी द्विपक्षीय व्यापारी सबंध मजबूट करण्यासाठीची तीन उद्दिष्टे त्यांनी सांगितली- व्यापाराची व्याप्ती वाढवणे, उत्तम व्यापार आणि संतुलित व्यापारी संबंध याद्वारे दोन्ही देशातील व्यापारात मोठी वाढ होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग जगताने आर्थिक व्यवहारांची गाडी पुन्हा रुळावर आणण्यावर लक्ष केंद्रित केले असून त्याचे उत्तम परिणाम आपल्याला दिसत आहेत. आज अर्थव्यवस्थेत ‘व्ही’ आकाराची सुधारणा होतांना दिसते आहे. कोविड-19 च्या संकटातून संधी शोधत भारताने आपली अर्थव्यवस्था अधिकच उदार केली आहे, ज्यामुळे भारतात उद्योग-व्यवसाय करणे आता अधिकच सोपे झाले आहे, असे त्यांनी सांगितले. थेट परदेशी गुंतवणुकीच्या क्षेत्रात भारत आज सर्वाधिक मुक्त धोरणे असलेला देश ठरला आहे.

पुरवठ्याशी असलेल्या जोखीमेचे व्यवस्थापन करण्यासाठी पुरवठा साखळीत विविधता असणे आवश्यक आहे. यात, पारदर्शक नसलेल्या अर्थव्यवस्थांकडूनही शिस्तपालनाची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सध्या लष्करी आणि रणनीतीक स्तरावर परस्पर सहकार्याचे उपक्रम राबवले जात आहेत. हे सहकार्य येत्या काळात दोन्ही देशातील आर्थिक भागीदारीही मजबूत करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ऑस्ट्रेलिया धोरण अहवाल सारख्या प्रयत्नातून आपल्याला आपल्या  व्यापारी आणि वित्तीय धोरणांची अंमलबजावणी अधिक सुसंगतपणे  करण्यास मदत मिळेल, असेही ते म्हणाले.

 

* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1681765) Visitor Counter : 260