शिक्षण मंत्रालय
केव्हीएस वर्धापन दिन-2020 मध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे मार्गदर्शन
प्रविष्टि तिथि:
15 DEC 2020 7:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2020
केंद्रीय विद्यालय संघटनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले. केंद्रीय विद्यालय संघटनेने आज आपला वर्धापनदिन ऑनलाईन पद्धतीने साजरा केला. शालेश शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या सचिव अनिता करवाल, केव्हीएस आयुक्त निधी पांडे आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या केंद्रीय विद्यालयांमध्ये शहरी, ग्रामीण, श्रीमंत, गरीब असे विविध प्रकारची पार्श्वभूमी असलेले सर्वच विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने ही विद्यालये खऱ्या अर्थाने भारताचे वास्तविक चित्र सादर करतात, असे यावेळी धोत्रे यांनी सांगितले. केंद्रीय विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या संधी निर्माण होत असल्याने ही विद्यालये इतरांपेक्षा वेगळी ठरतात. आज केंद्रीय विद्यालयांमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी प्रशासन, क्रीडा क्षेत्र, विज्ञान अशा सर्वच क्षेत्रात नेतृत्व करत आहेत.
भावी पिढ्यांना उत्तम आणि जागरुक नागरिक बनवण्यावर नव्या शिक्षण धोरणात प्रामुख्याने भर दिला जात आहे असे धोत्रे यांन सांगितले. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये केव्हीएस महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सामाजिक हिताशी संबंधित कोणत्याही उपक्रमाची सुरुवात नेहमीच केंद्रीय विद्यालयांपासून होते असे ते म्हणाले. पर्यावरण संरक्षण असो किवा एक भारत श्रेष्ठ भारत असो, या सर्वच उपक्रमांमध्ये केंद्रीय विद्यालयांनी अतिशय उत्तम भूमिका बजावली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आत्मनिर्भर भारताची निर्मिती करण्यामध्ये केंद्रीय विद्यालये नेतृत्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1963 मध्ये 20 रेजिमेंटल शाळांपासून सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयाच्या प्रवासाचे आता देशभरातील 13 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या 1245 विद्यालयांच्या विशाल जाळ्यामध्ये रुपांतर झाले असल्याचे केव्हीएस आयुक्त निधी पांडे यांनी स्वागतपर भाषणामध्ये सांगितले. केव्हीएस आणि या संघटनेचे विद्यार्थी शिक्षणातील सर्वोच्च गुणवत्तेचे मापदंड निर्धारित करत आहेत आणि इतर संस्थांना देखील प्रेरणा देत आहेत, असे सांगत निधी यांनी 2020 च्या सीबीएसईच्या परीक्षांमध्ये केव्हीएसने बारावीच्या परीक्षांमध्ये 98.62 टक्के उत्तीर्ण टक्केवारीची नोंद करून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली असल्याची माहिती दिली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा आणि भौतिक व्यवहारांसंदर्भात केंद्रीय विद्यालय संघटना अतिशय दक्षतेने काम करत आहे, असे पांडे यांनी सांगितले. त्याच प्रकारे अटल टिंकरिंग लॅब, जिज्ञासा, नॅशनल चिल्ड्रन्स सायन्स काँग्रेस यांसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यावर देखील भर दिला जात आहे.
कोविड आपत्तीच्या आव्हानात्मक कालखंडातही आमच्या शिक्षकांनी अतिशय समर्पित भावनेने आणि बांधिलकीने शिक्षण देणे सुरूच ठेवले ही बाब अतिशय अभिमानास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.
सर्वांसाठी शिक्षण या संकल्पनेचा अवलंब करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल/ ऑनलाईन साधनांचा त्यांनी अंगिकार केला आहे, असे त्या म्हणाल्या. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये केव्हीएस विद्यालये संपूर्ण पाठबळ आणि योगदान देतील, असा विश्वास निधी पांडे यांनी व्यक्त केला.
* * *
M.Chopade/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1680858)
आगंतुक पटल : 137