विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सीएसआयआर- एएमपीआरच्यावतीने  भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2020 मध्ये पारंपरिक कारागिर आणि हस्तकला प्रदर्शनाव्दारे महत्व अधोरेखित करणार


सीएसआयआरच्यावतीने विज्ञान महोत्सवापूर्वी जनजागृती करण्यासाठी पूर्व-कार्यक्रमांचे आयोजन

Posted On: 28 NOV 2020 8:48PM by PIB Mumbai

 

सीएसआयआर, केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था (सीएमईआरआय)च्यावतीने भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2020 पूर्वी जनजागृतीसाठी कार्यक्रमांची एक मालिकाच आयोजित करण्यात आली. यामध्ये विविध विषयांवरील कार्यक्रमांचा समावेश होता. महानगरपालिकांचे घन कचरा व्यवस्थापन, अॅम्फीबियन रोबोट, हवा आणि पाणी शुद्धीकरण, सौर ऊर्जा तंत्रज्ञान, स्मार्ट ग्रिड, मिनी-ग्रिड आणि कृषी यंत्रसामुग्री; अशा आठ विषयांची माहिती आभासी कार्यक्रमांच्या माध्यमातून 17,000जणांपर्यंत पोहोचविण्यात आली. या महोत्सव-पूर्व कार्यक्रमांचा समारोप दि. 27 नोव्हेंबर, 2020 रोजी झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय आयोजक- विज्ञान भारतीचे सचिव जयंत सहस्त्रबुद्धे प्रमुख पाहुणे म्हणून उपिस्थित होते.

याप्रसंगी जयंत सहस्त्रबुद्धे आपल्या भाषणात म्हणाले, नवीकरणीय ऊर्जा आणि घन कचरा व्यवस्थापन ही काळाची गरज असून सीएसआयआर - सीएमईआरआय हे एक प्रकारे सामाजिक लाभासाठी संशोधन आणि विकास, यासाठी कार्य करीत आहे. भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव म्हणजे समाजामध्ये विज्ञानाचा प्रसार करून आणि नाविन्यपूर्ण कल्पनांची देवाण-घेवाण अधिक वेगाने करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. भारताला समृद्ध वैज्ञानिक वारसा लाभला आहे. त्यामुळे आधुनिक काळात या वारशाचे प्रदर्शन करण्यासाठी असे महोत्सव उपयोगी ठरणार आहे. यंदाच्या महोत्सवाची संकल्पना निश्चित करताना  सद्यस्थितीचा विचार करण्यात आला आहे, आत्मनिर्भर आणि वैश्विक कल्याण यावर आधारित विज्ञान महोत्सव होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक काळामध्ये आरोग्य विषयक सर्व प्रश्नांवर आपल्या चरक संहिता आणि सुश्रुत संहितेमध्ये उपाय आहेत असे सांगून जयंत सहस्त्रबुद्धे म्हणाले, विशिष्ट रोगांना लक्ष्य करण्याऐवजी रोग होऊच नये यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करण्यासाठी या संहितांमध्ये उपाय सांगण्यात आले आहेत. ज्यावेळी संपूर्ण जगामध्ये कोठेही औपचारिक शिक्षण, अध्यापन प्रणाली नव्हती, त्या काळामध्ये आपल्याकडे नालंदा विद्यापीठ हे प्रसिद्ध शिक्षण केंद्र होते. नालंदा हे जागतिक शैक्षणिक केंद्र होते. संशोधन आणि विकास संस्थांनी राष्ट्रनिर्माणामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली तर देशाला  पुन्हा एकदा गतवैभव, समृद्धी मिळेल, भारताला सुवर्ण काळ पुन्हा प्राप्त होईल, आणि देश एक महाशक्ती बनेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमामध्ये एनआरएससीचे माजी समूह संचालक डॉ.एस.के सुब्रमण्यम, डॉ. सेतू  कसेरा यांची जल व्यवस्थापन, सोनाली मेहरा यांचे कोविड-19 याविषयांवर भाषणे झाली. तसेच डॉ. अविनाश कुमार श्रीवास्तव, प्रा.एस.एस. भदौरिया यांचीही विविध विषयांवर भाषणे झाली.

----

S.Tupe/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1676857) Visitor Counter : 144