आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ. हर्ष वर्धन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या (आयआयएमसी) विद्यार्थ्यांना डिजिटली संबोधित केले
"पोलिओविरूद्धच्या भारताच्या लढ्यात ''आरोग्य पत्रकारिता" केंद्रस्थानी होती
2025 पर्यंत क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी डॉ. हर्ष वर्धन यांनी उदयोन्मुख पत्रकारांची मागितली मदत
Posted On:
27 NOV 2020 8:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2020
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी) च्या विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून संबोधित केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ वर्धन यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि उदयोन्मुख पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल आभार मानले. डॉ वर्धन यांनी नमूद केले की, "लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमे लोकांचा दृष्टिकोन ठरवण्यात महत्वाची भूमिका निभावतात. त्यामुळे पत्रकारांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे.”
गेल्या 11 महिन्यांपासून महामारीच्या काळात पत्रकारांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना डॉ वर्धन म्हणाले, “जनतेला माहिती देण्यासाठी पत्रकारांनी चोवीस तास काम केले. जानेवारी 2020 पासून सुरू झालेले कोविड युद्ध आता अकराव्या महिन्यात आहे. या प्रवासादरम्यान माध्यमे एक सक्रिय भागीदार राहिली आहेत. . ” लोकांना माहिती देण्याच्या प्रयत्नात ज्यांनी आपले बलिदान दिले अशा व्यक्तींना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. “माझ्या कोरोना योद्धयांच्या यादीमध्ये पत्रकारांचा देखील समावेश आहे”, असे ते म्हणाले.
पोलिओ विरूद्धच्या लढाई दरम्यान पत्रकारांच्या योगदानाचे स्मरण करताना ते म्हणाले, “पोलिओविरूद्धच्या भारताच्या लढ्यात आरोग्य पत्रकारिता केंद्रस्थानी होती. ज्या काळात देशात 60% पोलिओग्रस्त होते, त्यावेळी पोलिओमुक्त भारताचे स्वप्न पाहणे हे वास्तवापलिकडचे होते. पत्रकारांच्या सकारात्मक योगदानामुळे हा राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वी बनवण्यास मदत झाली आहे. ”
2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलनासाठी पत्रकारांची मदत घेताना डॉ वर्धन म्हणाले, “ क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात मनापासून सहभागी होण्याचे आणि हे स्वप्न साकार करण्याचे तुम्हा सर्वाना मी आवाहन करतो. पत्रकारांचा सक्रिय सहभाग लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करण्यास मदत करेल.
ते पुढे म्हणाले, “माध्यमांनी अविश्वसनीय माहिती प्रसारित करण्यापासून स्वत: ला रोखले पाहिजे. विश्वासार्ह माहितीसाठी लोक माध्यमांवर विश्वास ठेवतात. जनतेला विश्वासार्ह आणि सत्यापित माहिती पुरवणे हे प्रत्येक पत्रकाराचे कर्तव्य आहे. असत्य बातम्या लोकांपर्यंत येणे धोकादायक आहे आणि यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. "
डॉ. वर्धन यांनी आयआयएमसी आणि आरोग्य मंत्रालय यांच्यात सहकार्यात्मक कार्यक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव दिला जो आरोग्य आणि विज्ञान या क्षेत्रातील उदयोन्मुख पत्रकारांसाठी शिकण्याचा एक चांगला अनुभव असेल.
आय.आय.एम.सी.चे महासंचालक प्रा.संजय द्विवेदी, आय.आय.एम.सी. चे अतिरिक्त महासंचालक (प्रशासन) के. सतीश नंबुदिरीपाद, कार्यक्रमाच्या निमंत्रक प्रा. सुरभी दहिया आणि कार्यक्रमाचे सह-निमंत्रक प्रा (डॉ.) प्रमोद कुमार कार्यक्रमाला उपस्थित होते.
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1676606)
Visitor Counter : 186