संसदीय कामकाज मंत्रालय
राष्ट्रपती उद्या गुजरातमधल्या केवडिया येथे 80 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे उद्घाटन करणार
पंतप्रधानांची परिषदेला आभासी उपस्थिती; समारोप समारंभामध्ये करणार मार्गदर्शन
Posted On:
24 NOV 2020 10:25PM by PIB Mumbai
अहमदाबाद, 24 नोव्हेंबर 2020
अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे शताब्दी वर्ष असून त्यानिमित्त यंदाच्या 80व्या परिषदेचे गुजरातमधल्या केवडिया येथे आयोजन करण्यात आले आहे. दि. 25 आणि 26 नोव्हेंबर अशी दोन दिवस ही परिषद होणार आहे. या परिषदेची माहिती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज गांधीनगर येथे आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये दिली.
80 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे उद्घाटन उद्या, दि. 25 नोव्हेंबर, 2020 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सकाळी 11.00 वाजता होणार आहे. या कार्यक्रमामध्ये राज्यसभेचे उपसभापती आणि उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडूही उपस्थित राहणार आहेत. अशी माहितीही ओम बिर्ला यांनी यावेळी दिली.
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह सन्माननीय अतिथी या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. या परिषदेसाठी देशातल्या सर्व विधानसभा आणि विधान परिषदांच्या पीठासीन अधिक-यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये 27 विधानसभा आणि विधानपरिषदांच्या पीठासीन अधिका-यांनी उपस्थित राहणार असल्याचे सूचित केले आहे. या परिषदेमध्ये सर्व राज्यांच्या विधानमंडळांचे सचिव तसेच इतर उच्च अधिकारी वर्गही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
देशाला ब्रिटीशांच्या गुलामीच्या जोखडातून मुक्त करणारे, देशाचे महान सुपुत्र महात्मा गांधी यांचे जन्मस्थान गुजरातमध्ये आहे. स्वातंत्र्यापूर्वी पाचशेंपेक्षा जास्त संस्थांनांमध्ये विभागलेल्या देशाला एक राष्ट्र बनवणा-या लोह पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचाही जन्म गुजरातमध्येच झाला होता. देशाची एकता आणि प्रादेशिक अखंडता यांचे प्रतीक म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा केवडिया येथे उभारण्यात आलेला जगातला सर्वात भव्य पुतळा आहे. ‘स्ट्यॅच्यू आॅफ युनिटी’ म्हणजे भारतीयांच्या एकतेचे प्रतीक आहे. भारताच्या लोकशाही इतिहासामध्ये दि. 26 नोव्हेंबर या दिनाला ऐतिहासिक महत्व आहे. 26 नोव्हेंबर ,1949 ही ती ऐतिहासिक तारीख आहे, जेव्हा स्वातंत्र्यमिळाल्यानंतर भारताने आपल्या राज्य घटनेचा स्वीकार केला होताअसे सांगून ओम बिर्ला यावेळी म्हणाले, या दिवशी आपण ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करतो.
यंदाच्या वर्षी पीठासीन अधिकारी परिषदेचे शताब्दी वर्ष आहे साजरे करण्यात येत आहे. अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेला 1921 मध्ये प्रारंभ झाला. मागील काळामध्ये ही परिषद म्हणजे लोकशाही कार्यपद्धती अधिक बळकट करण्यासाठी अनुभवांचे आदान-प्रदान करणे, नवनवीन विचारांची देवाण-घेवाण करणे यासाठी एक सशक्त व्यासपीठ सिद्ध झाले आहे. यंदा ‘‘“विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांच्यात सुसंवाद समन्वय- जोशपूर्ण लोकशाहीची गुरुकिल्ली.” या संकल्पनेवर परिषदेमध्ये चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती ओम बिर्ला यानी पत्रकारांना दिली.
या परिषदेमध्ये पीठासीन अधिकारी वर्तमानातील संदर्भामध्ये देशात लोकशाही आणि सशक्त आणि प्रभावी बनविण्यासाठी विधिमंडळ, न्यायपालिका आणि कार्यपालिका या शासनाच्या तीन स्तंभामध्ये अधिक सहकार्य आणि समन्वय कसा राखता येईल, याविषयी चर्चा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विधिमंडळाच्या कार्यवाहीमध्ये अधिक शिस्तीचे पालन करणे, प्रक्रियेच्या नियमांचे पालन करणे याविषयी चर्चा करण्यात येणार आहे.
या दोन दिवसीय परिषदेचा समारोप दि. 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, असेही ओम बिर्ला यांनी सांगितले.
परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घटनेच्या प्रस्तावनेचे वाचनही करण्यात येणार आहे.
या व्यतिरिक्त पीठासीन अधिकारी, विधिमंडळांचे सचिव, अधिक जबाबदेही बनण्याची प्रतिज्ञा घेतील. परिषदेच्या पीठासीन अधिका-यांच्यावतीने एक घोषणापत्र प्रसिद्ध केल्यानंतर या परिषदेचा समारोप होणार आहे. पीठासीन अधिका-यांच्या परिषदेला पहिल्यांदाच राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत, हे या परिषदेचे वैशिष्ट्य असल्याचे ओम बिर्ला यांनी सांगितले.
या परिषदेमध्ये विविध राज्यांच्या विधानसभांच्या वतीने परिषदस्थानी वेगवेगळ्या अभ्यासांविषयी सादरीकरण ठेवण्यात आले आहे. यामुळे त्या राज्यांचे वैशिष्ट्य विस्ताराने जाणून घेणे शक्य होणार आहे.
* * *
Jaydevi PS/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1675497)
Visitor Counter : 144