रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

स्थानिक तज्ज्ञांच्या सहकार्यासाठी एनएचएआयचा 200 प्रमुख संस्थांबरोबर सहयोग करणार

Posted On: 20 NOV 2020 11:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  20 नोव्हेंबर 2020

देशामध्ये जागतिक दर्जाची राष्ट्रीय महामार्ग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि तांत्रिक संस्था तसेच उद्योग यांच्यामध्ये सहकार्य सेतू निर्माण करण्याच्या उद्देशाने एनएचएआय म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या प्रयत्नाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे. स्थानिक तज्ज्ञांच्या पुढाकाराने नामांकित संस्थांबरोबर सहकार्य करण्याचा निर्णय ‘एनएचएआय’ने घेतला आहे. त्यानुसार 18 आयआयटी संस्था ( यामध्ये आयआयटी रूडकी, आयआयटी मुंबई, आयआयटी वाराणसी, आयआयटी गुवाहाटी, आयआयटी कानपूर, आयआयटी खरकपूर यांचा समावेश आहे.) 26 एनआयटी संस्था आणि 190 इतर प्रतिष्ठित, नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश आहे. या सर्व संस्थांनी एनएचएआयबरोबर सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. यापैकी जवळपास 200 संस्थांबरोबर याआधीच सामंजस्याचे करारही करण्यात आले आहेत.

या सर्व संस्था सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने ऐच्छिक सहयोग देणार आहेत. यामध्ये नामांकित तांत्रिक संस्था आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या परिसरातील महामार्गाचा भाग दत्तक घेऊन विकसित करणार आहेत. जवळपास 300पेक्षा जास्त संस्थांनी हे ऐच्छिक काम करण्यास मान्यता दिली आहे.

महामार्गाचा विशिष्ट भाग दत्तक घेऊन त्याची देखभाल करण्याबरोबरच या संस्था त्या भागामध्ये विविध विद्याशाखांचे अभ्यास क्षेत्र म्हणून वापरू शकतील. त्याच बरोबर उद्योग व्यवसायातल्या  नवीन ट्रेंडचा परिचय करून देण्यासाठी, नवसंकल्पनांचा शोध घेऊन त्या विकसित करण्यासाठी वापर करता येणार आहे.

या उपक्रमामध्ये भागीदार संस्था रस्त्याची सुरक्षा, देखभाल, इतर सोई-सुविधा, वाहतुकीची कोंडी होत असेल तर तेथील अडथळे हटविणे, अपघाताच्या दृष्टीने धोक्याची वळणे असतील तर ती चिह्नीत करणे, तसेच रस्त्याच्या सुरक्षित वापरासाठी कोणत्या सुधारणा करणे आवश्यक आहे, याची माहिती एनएचएआयला देणे, हे कामे करणे अपेक्षित आहे.

कोणत्याही नवीन प्रकल्पांची संकल्पना, आरेखन आणि प्रकल्पाचे नियोजन करताना सल्लागार म्हणून एनएचएआयबरोबर संलग्न होऊन मदत करण्याचे काम या सहभागी संस्था करू शकणार आहेत. यामध्ये स्थानिक हवामान, आर्थिक परिणाम, प्रत्यक्ष कामाचे मापदंड कसे असणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर नवसंकल्पना सुचविण्यासाठीही संस्थांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

सध्याच्या महामार्गांच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणत्या क्षेत्रामध्ये सहकार्य करणे शक्य आहे, याची माहिती:-

  1. सध्या असलेल्या कमतरता दूर करून स्थानिक अनुभवाच्या आधारे आधीच्या समस्या सोडविण्यावर भर देणे.
  2. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून खर्चात बचत करण्याचे उपाय शोधून देखभालीमध्ये सुधारणा घडवून आणणे.
  3. वाहतुकीचा सरासरी वेग वाढविण्यासाठी स्थानिक पर्यायांचा विचार करून अडथळे काढून टाकणे.
  4. वापरकर्ते आणि नवीन मार्गांवर देण्यात येत असलेल्या सुविधा लक्षात घेवून वाहतुकीचे योग्यप्रकारे संचलन करण्यासाठी मार्ग शोधणे.

एनएचएआयने पदवीच्या 20 आणि पदव्युत्तर शिक्षण घेणा-या 20 विद्यार्थ्‍यांना छात्रवृत्तीसह इंटर्नशिप करण्याची सुविधाही देऊ केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामामध्ये योगदान देता येणार आहे.

एनएचएआयच्यावतीने संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणावर मेगा हायवे प्रकल्पांचे काम सुरू आहे. देशात जागतिक स्तरावरचे महामार्गांचे जाळे उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हे कार्य करण्यात येत आहे. कोणत्याही संस्थेने महामार्गाचा थोडा भाग दत्तक घेऊन त्यामध्ये गुंतवणूक केली तर काम सुलभतेने होऊ शकणार आहे. तसेच वाहतुकीची कोंडी कमी करणे शक्य होईल. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी स्थानिकांच्या मदतीने संभाव्य स्थाने चिन्हीत करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर महामार्गांमुळे निर्माण होत असलेल्या स्थानिक समस्यांवर उपाय शोधण्यास मदत मिळू शकणार आहे.

 

M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1674595) Visitor Counter : 129