सांस्कृतिक मंत्रालय

केंद्रीय संस्कृती मंत्री प्रह्लादसिंग पटेल यांनी 13 व्या शतकातील प्रभू राम, लक्ष्मण आणि देवी सीता यांच्या कांस्य मूर्ती तामिळनाडू मूर्ती शाखेकडे सुपूर्द केल्या

Posted On: 18 NOV 2020 8:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 नोव्‍हेंबर 2020


केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रह्लादसिंग पटेल यांनी आज नवी दिल्ली येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे मुख्यालय, धरोहर भवन येथे आयोजित एका समारंभात, तामिळनाडू सरकारच्या मूर्ती शाखेला प्रभू राम, लक्ष्मण आणि देवी सीता यांच्या कांस्य मूर्ती सुपूर्द केल्या. यावेळी सांस्कृतिक मंत्रालय ,भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि तमिळनाडू सरकारचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

 

लंडनमधील मेट्रोपॉलिटन पोलिसांनी  15 सप्टेंबर 2020 रोजी या कांस्य मूर्ती लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तांकडे सुपूर्द केल्या होत्या. 1958 मधील छायाचित्र दस्तऐवजा नुसार, या मूर्ती तामिळनाडूच्या नागापट्टिनम जिल्ह्यातील आनंदमंगलममधील श्री राजगोपाल विष्णू मंदिराच्या मालकीच्या असून हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या  काळात बांधलेलेआहे. तामिळनाडू पोलिसांच्या मूर्ती शाखेने केलेल्या तपासा नुसार श्री राजगोपाल विष्णू मंदिरातून या मूर्तींची चोरी   23/24 नोव्हेंबर 1978 रोजी करण्यात आली होती.

प्रभू राम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या या कांस्य मूर्ती भारतीय धातू कलेचा उत्कृष्ट नमुना असून या मूर्ती अनुक्रमे 90.5 सेमी, 78 सेमी आणि 74.5 सेमी उंचीच्या आहेत. या मूर्तींच्या शैलीनुसार या इसवी सन पूर्व 13 व्या शतकातील आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली 2014 पासून एकूण 40 पुरातन वस्तू परदेशातून भारतात परत आल्या असून 1976 पासून 2014 पर्यंत केवळ अशा 13 पुरातन वस्तू पुनर्प्राप्त झाल्या आहेत असे पटेल यांनी हस्तांतरण सोहळ्यादरम्यान माध्यमांना सांगितले.

या मूर्ती देशात परत आणण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, विशेष मूर्ती शाखा, तामिळनाडू सरकार, डीआरआय आणि भारत उच्चायुक्त लंडन यांनी केलेल्या अविरत प्रयत्नांसाठी त्यांचे  पटेल यांनी अभिनंदन केले.  

 

 

भारतीय स्वातंत्र्याच्या  75 व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या एक भाग म्हणून भारतीय स्वातंत्र्य चळवळ, स्वातंत्र्यसैनिकांचे जीवन, भारतीय परंपरा, वारसा व संस्कृती, पर्यटन विकास आणि प्रोत्साहन व इतर विषयांवर काम करणार्‍या संस्था/ अर्जदार यांना माजी पंतप्रधान स्व.  अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती पासून 25 डिसेंबर 2020 ते 15 ऑगस्ट 2021 या कालवधीत एएसआयच्या विविध स्मारकांमध्ये राष्ट्रीय विषयाशी संबंधित शुटींग / छायाचित्रण करणाऱ्या (जागतिक वारसा स्थळ वगळता) संस्था/ अर्जदार यांना शुल्कात  सूट देण्यात येईल अशी घोषणा पटेल यांनी यावेळी केली. छायाचित्रण करण्यासाठी संबंधित अर्जदार/संस्थांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. 

Click here to access list of antiquities retrieved from foreign countries to India from 1976 to 2020 


* * *

Jaydevi PS/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1673852) Visitor Counter : 141