रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

आगामी पाच वर्षात भारताला ऑटोमोबाईल उत्पादन केंद्र बनविण्याच्या दिशेने सरकारचे काम सुरू: नितीन गडकरी


इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवृद्धीसाठी त्यांची गुणवत्ता कायम राखून निर्मीती खर्च कमी करण्याचे गडकरी यांचे ऑटो उद्योगांना आवाहन

Posted On: 06 NOV 2020 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 नोव्‍हेंबर 2020

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितले की,  आगामी पाच वर्षात भारताला ऑटोमोबाईल उत्पादनाचे जागतिक केंद्र बनविण्याच्यास दिशेने सरकारचे काम सुरू आहे. स्वयंचलित वाहन उद्योगाला पुरक, समर्थन देण्यासाठी सरकारने याआधीच धोरण निश्चित करीत आहे.

फिक्की कर्नाटक राज्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘इलेक्ट्रिक मोबिलिटी परिषद 2020’ या आभासी कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी बोलत होते. स्वयंचलित वाहन निर्मिती उद्योगाला अतिशय उज्ज्वल भविष्य आहे आणि आगामी काळामध्ये जगातील इलेक्ट्रिक वाहनांची सर्वात मोठी बाजारपेठ निर्माण करण्याची क्षमता भारतामध्ये आहे. त्यामुळेच भारताने इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला सातत्याने पाठिंबा दिला आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवृद्धीसाठी त्यांची गुणवत्ता कायम राखून निर्मीती खर्च कमी करण्याचे आवाहन गडकरी यांनी ऑटो उद्योगांना यावेळी केले. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची विक्री जसजशी वाढत जाईल, तसतसा या व्यवसायाला लाभ होईल. अधिकाधिक उत्पादनामुळे सर्व बाजारपेठेंपर्यंत आपली वाहने पोहोचू शकतील, असेही गडकरी म्हणाले. भारतातील स्वयंचलित वाहन उद्योजकांकडे इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील इतकेच नाही तर निर्यातीच्या संधीही निर्माण होतील.

ई-मोबिलिटीमुळे  ही भविष्यात अधिक कार्यक्षम आणि पर्यावरण स्नेही वाहतूक व्यवस्था निर्माण होणार आहे. कच्चे तेल आयात करणे आणि हवेतील प्रदूषण कमी करणे या दोन प्रमुख चिंताजनक प्रश्नांवर तोडगा म्हणजे इलेक्ट्रिक वाहने असणार आहे. त्यामुळे या वाहनांकडे आपण एकात्मिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, असेही नितीन गडकरी पुढे म्हणाले.

फिक्की आणि इतर भागधारकांनीही भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राच्या विकासासाठी एकात्मिक दृष्टिकोनातून पुढे येण्यास संबंधित उद्योगांना प्रोत्साहन दिले पाहिजे. नीती आयोगाच्या एका अहवालाचा संदर्भ देवून नितीन गडकरी म्हणाले, 2022 पर्यंत भारताला कमीतकमी 10 गिगावॅट  सेल- बॅटरींची आवश्यकता असणार आहे. ही गरज वाढून 2025 पर्यंत 50 गिगावॅट सेल- बॅटरी लागणार आहेत. त्यामुळे भारतामध्येच बॅटरींची निर्मिती करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे देशामध्ये ई-बॅटरी तयार करण्याबाबत विचार करण्यात यावा. आपल्याला सर्वांना परवडणा-या किंमतीमध्ये बॅटरी तयार करण्यासाठी धोरण निश्चित करण्याची गरज आहे. तसेच आयात कमी करणे, प्रदूषण मुक्त आणि स्वदेशी पर्यायांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे, यावर गडकरी यांनी भर दिला.

गडकरी पुढे म्हणाले की, दिल्ली आणि मुंबई या द्रुतगती मार्गांवर आम्ही ई-महामार्ग बनविण्याच्या दृष्टीने विचार करीत आहोत. त्यामुळे या मार्गांवरून ई-बस आणि मालमोटारी धावू शकतील. यासाठी आम्ही एक प्रायोगिक प्रकल्प तयार करीत आहोत. दिल्ली ते मुंबई हा पट्टा भारताची जीवनरेखा बनेल आणि त्यासाठी आम्ही नवीन इलेक्टिक रस्ते बनविण्याची योजना तयार करीत आहोत. इंधन म्हणून देशात वीज उपलब्ध आहे. त्यामुळे विजेवर चालणारी वेगवान वाहतूक व्यवस्था हा देशातला सर्वात महत्वाचा पर्याय होऊ शकतो.

इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांनी आपल्या पुरवठा साखळीचे विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता आहे, असे सांगून गडकरी म्हणाले, कच्चा माल निर्मितीवर लक्ष केंद्रीत करणे आणि बॅटरीचे सेल स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावेत, यासाठी भर देण्याची गरज आहे. आता रस्ते वाहतुकीवरचा भार इतर पर्यायांमुळे कमी होणार आहे. त्यामुळे सर्वांनी पर्यावरण स्नेही वाहतूक पर्याय स्वीकारला पाहिजे. नवसंकल्पनांमुळे हा उद्योग अधिकाधिक पर्यावरण पुरक, हरित, स्वच्छ आणि शाश्वत पर्यायांकडे वाटचाल करेल, अशी मला आशा आहे.

सीएनजी, एलएनजी यासारख्या जैवइंधनाच्या वापराला चालना देण्याची आवश्यकता असल्याचेही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. तसेच लवकरच जैव-सीएनजीवर चालणाऱ्या ट्रॅक्टरची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

* * *

M.Chopade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1670754) Visitor Counter : 251