पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार सर्व पातळ्यांवरुन प्रयत्न करत आहे : प्रकाश जावडेकर


प्रदूषण नियंत्रणासाठी सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचे स्वागत आणि प्रोत्साहन देण्याचा सरकारचा दृष्टीकोन

Posted On: 06 NOV 2020 5:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 नोव्‍हेंबर 2020

 

हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने सर्व पातळ्यांवरून उपाययोजना करत आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

जावडेकर यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे, जैविक कचऱ्यापासून कम्प्रेस्ड बायोगॅसची निर्मिती करणाऱ्या देशातल्या पहिल्या प्रात्यक्षिक प्रकल्पाचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातल्या प्राज टेक्नोलॉजीज या कंपनीने हा प्रकल्प विकसित केला आहे. तण किंवा पाचट जाळणे हे  वायू प्रदूषणाचे एक महत्वाचे कारण असून त्यावर अशा प्रकारच्या तंत्रज्ञानातून उपाययोजना करता येईल, अशी आशा जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केली. 

पर्यावरण आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्रांवर जैव-गतिशीलतेचा चांगला परिणाम होण्यासाठी, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा उत्तम वापर केल्याबद्दल जावडेकर यांनी यावेळी प्रमोद चौधरी यांच्या नेतृत्वाखालील चमूचे अभिनंदन केले. असे उपक्रम केवळ उर्जा सुरक्षा वाढवण्यासाठीचा नव्हे तर, उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णता आणण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात, असे जावडेकर यावेळी म्हणाले. आपली स्वतःची संशोधने विकसित  करुन, त्यांना जगभरात पोहचवणे हेच 'आत्मनिर्भर भारताचे' मर्म आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.

देशाच्या उत्तर भागात, विशेषतः राजधानी दिल्लीत  वाढत असलेल्या वायू प्रदूषणाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. प्रदूषण कमी करण्यासाठी त्याचे मूळ स्त्रोत शोधून काढत, त्यावरच नियंत्रण आणण्यासाठी सरकार काम करत आहे, मग ते उद्योग असोत किंवा औष्णिक ऊर्जा केंद्र, वाहनातून होणारे प्रदूषण, बांधकाम आणि पाडकाम, कचरा किंवा तण जाळणे अशा सर्व गोष्टींमधून नेमके किती प्रदूषण होते, याचा अभ्यास केला जात आहे, असे जावडेकरांनी सांगितले. वायू प्रदूषणाची समस्या मुळापासून संपवण्यासाठी सरकार पुढेही काम करत राहणार असून हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सरकार प्रोत्साहन देत आहे, असेही ते म्हणाले.

https://fb.watch/1ARDHTaoxj/

केंद्र सरकारच्या पुसा (PUSA) या  कृषी संशोधन संस्थेने तण किंवा इतर कृषी कचऱ्याचे विघटन करुन त्यापासून खत तयार करणारे जैवतंत्रज्ञान विकसित केले आहे, अशी माहिती त्यांनी त्यांनी दिली. या तंत्रज्ञानाच्या प्रायोगिक स्वरूपात चाचण्या दिल्लीसह पाच राज्यांमध्ये सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. हे तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास, अत्यंत कमी खर्चात पीक कचऱ्यापासून खतनिर्मिती शक्य होऊ शकेल, असे ते म्हणाले. भविष्यात, कृषी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी इतर अनेक मार्गही सापडतील, ज्यातून आज कचरा जाळण्यातून होणारे, पर्यावरणाचे नुकसान होऊ न देता उपाययोजना केल्या जाऊ शकतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भारत आता उर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे सांगताना  जावडेकर म्हणाले की सौर ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा या दोन्हीच्या निर्मिती व वापराला प्रोत्साहन दिले जात असून त्यातून देशभरात इंधनाद्वारे देशभरात होणारे प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या क्षेत्रात अधिकाधिक तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज असून ‘आत्मनिर्भर भारतात’ स्वच्छ उर्जेसाठी उर्जेचे अक्षय स्त्रोत विकसित करायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  

देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा, यासाठीही केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले. देशभरातील 122 शहरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम राबवला जात आहे, अशी माहिती जावडेकर यांनी दिली.

 

* * *

R.Tidke/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1670686) Visitor Counter : 376