गृह मंत्रालय
पोलीस स्मृती दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय पोलीस स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी बलिदान दिलेल्या पोलिसांना वाहिली आदरांजली
देशाच्या एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना संपूर्ण देशाच्या वतीने कृतज्ञ भावनेने आपण आदरांजली अर्पण करत असल्याचे अमित शहा यांचे प्रतिपादन
Posted On:
21 OCT 2020 9:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2020
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी बलिदान दिलेल्या पोलिसांना आदरांजली अर्पण केली. देशाच्या एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना संपूर्ण देशाच्या वतीने कृतज्ञ भावनेने आपण आदरांजली अर्पण करत असल्याचे अमित शहा यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाच्या वतीने त्यांनी शहीद पोलिसांना आदरांजली अर्पण केली.
2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतर, पोलीसांच्या बलिदानाची देशवासियांना स्मरण ठेवणारे स्मारक निर्माण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 21 ऑक्टोबर 2018 ला पंतप्रधानांनी हे स्मारक राष्ट्राला समर्पित केल्याचे अमित शहा यांनी सांगितले. राष्ट्रीय पोलीस स्मारकाची निर्मिती, जनता, विशेष करून भावी पिढीचा पोलीस दलाप्रती दृष्टीकोन बदलण्याचा मोदी सरकारचा अर्थवाही प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
या स्मारकावर शहिदांच्या नावाबरोबरच 130 कोटी भारतीयांच्या भावनाही कोरल्या गेल्याचे आपण शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना सांगू इच्छितो असे ते म्हणाले. हे स्मारक म्हणजे केवळ विटा, सिमेंट यांनी घडले नाही तर हे स्मारक आपल्याला सदैव स्मरण देईल की या वीर जवानांनी देशाच्या स्वातंत्र्याला अमरत्व दिले आहे. हुतात्म्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाने देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेले आहे. अनेक युवकांच्या भविष्याला आकार दिला आहे.
लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्यात पोलीस दलाने बजावलेल्या अतिशय महत्वाच्या भूमिकेचा आपल्याला देशाचा गृह मंत्री म्हणून अभिमान असल्याचे ते म्हणाले. लाखो स्थलांतरित मजुरांना मदत असो, आजारी व्यक्तींना रुग्णालयात नेण्याचे काम असो, रक्त दान किंवा प्लाझ्मा दान असो पोलीस आपल्या कर्तव्यात सदैव तत्पर राहिल्याचे गृहमंत्री म्हणाले.
कोविड-19 विरोधातल्या लढ्यात 343 पोलिसांनी आपले प्राण गमावल्याचे सांगून त्यांचे बलिदान सुवर्णाक्षरात लिहिले जाईल.
पोलिसांनी देशाची अंतर्गत सुरक्षा सांभाळावी, सरकार त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आणि कटीबद्ध असल्याचे आश्वासन मोदी सरकारच्या वतीने आपण देत असल्याचे अमित शहा म्हणाले.
आज पोलिसांसमोर, दहशतवाद, बनावट चलन, अंमली पदार्थ, शस्त्रांची तस्करी, मानव तस्करी, सायबर गुन्हे, महिलावरचे अत्याचार यासंदर्भातले अपराध अशी अनेक आव्हाने आहेत. नव्या आव्हानांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पोलीस आधुनिकीकरण कार्यक्रम सुरु केला आहे. प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्वतःला सज्ज राखतील असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. देशाच्या सीमा अभेद्य राखण्यासाठी मनुष्य बळ आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालण्यासाठी मोदी सरकार अथक काम करत आहे. इतर देशांच्या तुलनेत प्रती लाख लोकसंख्येमागे पोलिसांची भारतात असलेली संख्या कमी आहे मात्र अनेक योजनांवर काम सुरु असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.संसदेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात संरक्षण शक्ती विद्यापीठ आणि न्याय वैद्यक विद्यापीठाशी संबंधित दोन विधेयके मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली. संरक्षण शक्ती विद्यापीठामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रात भविष्य घडवण्याची संधी मिळेल.त्याच बरोबर न्याय वैद्यक विद्यापीठाच्या माध्यमातून वैज्ञानिकांचे अपुरे मनुष्यबळ वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1666604)
Visitor Counter : 183