शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आयपी साक्षरता आणि जागरूकता शिक्षण अभियानासाठी 'कपिला ' कलाम कार्यक्रम सुरु केला
शोधांचे एकाधिकार भारताला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जातील - रमेश पोखरियाल ‘निशंक’
या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना पेटन्ट यंत्रणा आणि तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली जाईल - रमेश पोखरियाल ‘निशंक’
इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी 2.0) वार्षिक अहवाल सादर, आयआयसी 3.0. चा प्रारंभ घोषित
Posted On:
15 OCT 2020 9:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2020
माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक दिवंगत डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या 89 व्या जयंतीनिमित्त केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी बौद्धिक संपदा साक्षरता आणि जागरूकता अभियानासाठी 'कपिला' कलाम कार्यक्रमाची आज व्हर्च्युअली सुरूवात केली. शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. उच्च शिक्षण सचिव अमित खरे; अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ.एम.पी. पूनिया आणि सदस्य सचिव डॉ.राजीव कुमार हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी बोलताना निशंक म्हणाले की केवळ देशाच्या स्वयंपूर्णतेसाठी शोध लावणे आवश्यक नाही तर त्यांचे एकाधिकार (पेटंट) घेणे देखील आवश्यक आहे. शोधांचे एकाधिकार भारताला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाईल, असे ते म्हणाले. नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठांचा भारताचा गौरवशाली इतिहास आहे त्यामुळे आपल्या संस्कृतीत बौद्धिक संपत्ती वारशाने मिळालेली आहे. पेटंट क्षेत्रात भारताला पुन्हा विश्वगुरु म्हणून जगाचे नेतृत्व करावे लागेल, असेही ते म्हणाले. 'राष्ट्रीय शोध दिन 'निमित्त भारताला स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने हा महत्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, असे ते म्हणाले. या मोहिमेअंतर्गत उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शोधाच्या पेटंटसाठी अर्ज करण्याच्या योग्य पध्दतीची माहिती मिळेल आणि त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव होईल. ते पुढे म्हणाले की, पेटंटच्या क्षेत्रात आपल्याला एक उत्तुंग झेप घेण्याची गरज आहे.
आपल्याला मिशन मोडमध्ये काम करावे लागेल कारण आपल्याकडे आयपी क्षेत्रात संधी साधण्यासाठी आवश्यक पुरेशी संसाधने आहेत असे ते म्हणाले. त्यांनी देशातील तरुणांना त्यांच्या अविष्कारांसह पुढे येण्याचे आवाहन केले. देशात पुरेशी गुणवत्ता आहे, आता तिला पेटंटसाठी एकत्र आणायला हवे , असेही त्यांनी स्पष्ट केले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पेटंटसाठी अर्ज भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही महाविद्यालये आणि संस्थांना सुविधा पुरवू. भारतीय विद्यार्थ्यांनी देशात राहून अभ्यास करावा असे आवाहन त्यांनी केले. एकविसाव्या शतकातील ‘नवभारतात ’ त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी त्यांनी भारतातच रहावे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी 2.0) चा वार्षिक अहवालही यावेळी सादर करण्यात आला आणि आयआयसी 3.0 सुरु झाल्याची घोषणा करण्यात आली. 15 ते 23 ऑक्टोबर हा सप्ताह 'बौद्धिक संपदा साक्षरता सप्ताह' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयआयसी 3.0 संकेतस्थळ देखील सुरू करण्यात आले.
यावेळी बोलताना संजय धोत्रे म्हणाले की, शिक्षण मंत्रालयाने 2018 मध्ये इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलची स्थापना केली. आतापर्यंत सुमारे 1700 उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये आयआयसीची स्थापना झाली आहे. आयआयसी 3.0 च्या अंतर्गत 5000 उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये आयआयसीची स्थापना केली जाईल. भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यासाठी आपल्याला बौद्धिक संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी अधिक सजग असले पाहिजे. संशोधन आणि विकासात सहभागी भारतीय विद्यार्थी आणि वैज्ञानिकांनी त्यांचे शोध जपण्यासाठी आणि संरक्षणासाठी अर्ज केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
बौद्धिक मालमत्ता साक्षरता सप्ताहांतर्गत 15 ते 23ऑक्टोबर या कालावधीत अनेक उपक्रम राबवले जातील, ज्यात या यंत्रणेविषयी आणि पेटंटसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेचे महत्त्व याबद्दल ऑनलाइन जागरूकता निर्माण केली जाईल. या आठवड्यात वादविवाद, पोस्टर स्पर्धा, प्रश्नमंजुषा आणि समूह बैठका घेतल्या जातील. शिक्षण मंत्रालयाच्या या मोहिमेमुळे भारताच्या उच्च शिक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये उद्योजकता आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1664942)
Visitor Counter : 261