आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
जन आंदोलन आणि कोविड योग्य वर्तन विषयी एम्स आणि केंद्र सरकारच्या रूग्णालयांच्या प्रमुखांबरोबर डॉ. हर्षवर्धन यांची बैठक
‘‘लस उपलब्ध होईपर्यंत सामाजिक लशीचे अनुसरण करण्याची गरज, आगामी दोन -अडीच महिने सण-उत्सव तसेच हिवाळ्यात कोरोनाविरुद्धची लढाई महत्वपूर्ण’’
Posted On:
14 OCT 2020 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2020
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जन आंदोलन आणि कोविड योग्य वर्तन विषयी मोहिमेचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये देशातल्या सर्व एम्सचे प्रमुख आणि केंद्र सरकारच्या रूग्णालयाचे प्रमुख सहभागी झाले होते.
कोविड-19 महामारीचा उद्रेक संपूर्ण देशभर झाला आहे, त्यामुळे आगामी महिन्यात येत असलेल्या सण उत्सवांचा महत्वपूर्ण काळ लक्षात घेवून संपूर्ण देशाने एकत्रित प्रयत्न करून कोविड-19 विरूद्ध अधिक तीव्र लढा करण्याची आवश्यकता आहे, असे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, ‘‘ आता आपण कोविड-19 विरूद्ध सुरू केलेल्या लढ्याच्या दहाव्या महिन्यात प्रवेश करीत आहोत. दि. 8 जानेवारी,2020 रोजी कोविड-19 विषयी पहिली बैठक झाली होती. त्यांनतर कोविड-19 विरुद्ध आपण सर्वजण अथक लढा देत आहोत. कोविडला नामोहरम करण्यासाठी आपण आवश्यक पायाभूत वैद्यकीय सुविधा अतिशय कमी कालावधीत निर्माण केल्या जात आहेत, हे आज आपण अगदी अभिमानाने सांगू शकतो. यामध्ये 90 लाखांपेक्षा जास्त खाटा, 12,000 विलगीकरण केंद्रे आणि 1900 पेक्षाही जास्त तपासणी प्रयोगशाळांची सुविधा सध्या देशात आहे.’’ कोविडशी सामना करण्यासाठी कोविड योद्धांनी केलेले अथक प्रयत्न, समर्पित वैद्यकीय सेवक, यांच्याविषयी त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त करून सर्वांना अभिवादन केले. अनेक रुग्णांचे प्राण वाचविताना ज्या कोविड योद्ध्यांना मृत्यू पत्करावा लागला, त्यांच्याविषयी शोक भावना व्यक्त केल्या.
यावेळी डॉ. हर्षवर्धन म्हणाले, आगामी दोन ते अडीच महिन्यांचा काळ कोविड-19 विरुद्ध लढा देताना आपल्या सर्वांसाठी अतिशय नाजूक आणि महत्वपूर्ण असणार आहे. कारण हिवाळा सुरू होत आहे आणि अनेक सण-उत्सवांचा हा काळ आहे. अशावेळी प्रत्येक नागरिकाने कोविड-19 विषाणूचा प्रसार होणार नाही, अशाच पद्धतीने आपले वर्तन, आचरण ठेवणे अपेक्षित आहे. ही जबाबदारी सर्वांची आहे. प्रत्येक नागरिकाची सुरक्षा लक्षात घेवून आपण याची दक्षता घेतली पाहिजे.’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 योग्य वर्तन याविषयी दि. 8 ऑक्टोबर, 2020 रोजी सर्व देशवासियांना आवाहन केले आहे. त्या जनआंदोलनामध्ये सहभागी होवून कोविड-19 विरूद्धच्या लढ्याचा भाग बनावे, असे सांगून डॉ. हर्षवर्धन म्हणाले, संपूर्ण जगावरच या विषाणूचा अतिशय विपरित परिणाम झाला आहे. परंतु कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सोपा खबरदारीचा उपाय म्हणजे, सार्वजनिक स्थानी आपले वर्तन , आचरण आहे. सर्वांनी बाहेर पडताना मास्कचा वापर करून चेहरा झाकावा, वारंवार हात स्वच्छ करावेत, सामाजिक अंतर राखावे, सार्वजनिक ठिकाणी शिंकणे, खोकणे यांच्याविषयीच्या शिष्टाचाराचे पालन करावे, ही एक प्रकारे सामाजिक लसच आहे. जोपर्यंत कोविड-19 आजाराविरुद्धची लस येत नाही, तोपर्यंत आपण सर्वांनी या सामाजिक लशीचे पालन करणे महत्वाचे आहे,. यामुळेच रोगाच्या प्रसाराची साखळी खंडित होणार आहे, असेही मंत्री यावेळी म्हणाले.
कोविडविरुद्ध भारताचा लढा याविषयी माहिती देताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले, उपचारामध्ये भारत सातत्याने नवीन टप्पे गाठत आहे. देशात रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही जगात सर्वाधिक आहे. तसेच जगात सर्वात कमी मृत्यूदर आहे. सक्रिय रूग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना पाठविलेल्या प्रमाणित नितीमुळे उपचारांना यश मिळत आहे. आपल्या चाचणी क्षमतेमध्येही वाढ झाली आहे.देशातल्या 9 कोटींपेक्षा जास्त लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. मास्क आणि पीपीई संच बनविण्यात भारत स्वावलंबी बनला आहे.
समाजातल्या प्रभावशाली व्यक्ती आणि स्थानिक स्वयंसेवी संस्था यांच्या बैठका घेवून कोविड-19 विरुद्ध योग्य वर्तनाविषयी जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1664772)
Visitor Counter : 274