कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

नव्या कृषी सुधारणांमुळे दुर्गम, डोंगराळ भागात राहणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येतील -केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 08 OCT 2020 6:55PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी सुधारणा कायद्यांमुळे देशातील दुर्गम, डोंगराळ भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येतील, असा विश्वास, केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.

जम्मू-कश्मीरच्या रामबन आणि उधमपूर जिल्ह्यातल्या विविध तालुक्यातील शेतकरी, सरपंच आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांनी आज संवाद साधला. नवे कृषी कायदे, शेतकरी समुदायासाठी, विशेषतः दुर्गम भागात आणि सीमावर्ती भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान सिध्द होणार आहेत. या शेतकऱ्यांना वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने आपला माल बाजार समितीत नेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असे. मात्र, आता नव्या व्यवस्थेत, त्यांच्यासाठी आपला माल विकण्याचे इतर अनेक पर्याय उपलब्ध असतील, असे त्यांनी सांगितले.

अनेक शेतकरी, याआधी आपला  माल साठवून ठेवत असत आणि तो बाजारात नेण्यासाठी मध्यस्थ किंवा दलालांची वाट बघत, कारण हा माल स्वतः नेण्याची व्यवस्था त्यांच्याकडे नव्हती.

मात्र आता, ते त्यांच्या मर्जीनुसार, वेगवेगळ्या माध्यमातून आपला माल विकण्यासाठी कोणाशीही संपर्क साधू शकतील किंवा त्याच्यासोबत कंत्राटी शेती करण्याचा पर्यायही त्यांच्याकडे उपलब्ध असेल.

मोदी सरकार सध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि पशुबाजार समित्या बंद करणार असल्याच्या विरोधकांच्या आरोपालाही त्यांनी उत्तर दिले. वस्तुस्थिती अशी आहे, की या समित्या तर सुरु राहतीलच, पण इतर अनेक ठिकाणी विक्री केंद्रे सुरु केली जातील आणि आजही ही प्रक्रिया सुरूच आहे, असे त्यांनी सांगितले. आजच्या  युवा, आधुनिक आणि गतिमान जगातल्या शेतकऱ्याला जुन्या व्यवस्थांमध्ये अडकवून ठेवणे योग्य नाही, त्यांना त्यांचे पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

<><><><><>

B.Gokhale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1662807) Visitor Counter : 64