शिक्षण मंत्रालय
शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडून शाळा पुन्हा सुरु करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी
Posted On:
05 OCT 2020 9:34PM by PIB Mumbai
शिक्षण मंत्रालयाच्या अखात्यारीतील शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडून शाळा पुन्हा सुरु करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आज जारी करण्यात आल्या.केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ यांनी ट्वीटद्वारे आज या SOP/मार्गदर्शक सूचनांची घोषणा केली.
DoSEL, @EduMinOfIndia has issued SOP/Guidelines for reopening of schools. pic.twitter.com/pwJXZZd40w
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) October 5, 2020
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडून जारी करण्यात आलेल्या SOP/मार्गदर्शक सूचनांची ठळक वैशिष्ट्ये
केंद्रीय गृहमंत्रालयाने 30.09.2020 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शाळा पुन्हा सुरु करण्याबाबतचे निर्णय घेण्याची मोकळीक राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली आहे. 15 ऑक्टोबर नंतर राज्ये/ केंद्रशासित प्रदेश श्रेणीबद्ध रीतीने आणि संबधित शाळा/शिक्षणसंस्थांच्या व्यवस्थापनाशी सल्लामसलत करुन स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा/खाजगी शिकवणी वर्ग सुरु करण्याबाबतचे निर्णय घेऊ शकतात.
यातील भाग 1- शाळा पुन्हा सुरु करण्यासंबंधित आरोग्य आणि सुरक्षाविषयक पैलूबद्दल आहे. या सूचना, गृहमंत्रालयाच्या आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सुरक्षा प्रोटोकॉलवर आधारलेल्या आहेत. आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील स्थानिक स्थितीनुसार त्यांचा स्वीकार/ अंगीकार करत अंमलबजावणी व्हायला हवी.
1. शाळेच्या परीसरातील सर्व भाग नीट स्वच्छ करणे आणि त्यांचे निर्जंतुकीकरण करणे, यात शाळेतील सर्व सामान, उपकरणे, शालेय साहित्य, साठवणुकीच्या जागा, पाण्याच्या टाक्या, स्वयंपाकघरे,भोजनालय, स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा इत्यादीचा समावेश आहे तसेच आतल्या जागांमध्ये स्वच्छ हवा खेळती राहील याची खातरजमा करावी.
2. शाळांनी काही कृतीदले स्थापन करावीत, जसे- आपत्कालीन दक्षता,सर्वांसाठी सामान्य काळजी पथक, वस्तू पुरवठा मदत पथक, स्वच्छता तपासणी पथक इत्यादी.. अशा तऱ्हेने जबाबदारी वाटून घेतल्याने कामांची विभागणी सुकर होईल.
3. शाळांना स्वतःचे वेगळे प्रोटोकॉल बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले जावे. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुसार, सुरक्षितता आणि शारीरिक अंतराच्या बाबतीतले निकष तयार केले जावे तसेच, यासंदर्भातल्या जाहीर सूचना/पोस्टर्स/संदेश/ पालकांशी झालेला संवाद सार्वजनिक केला जावा, त्याची माहिती पोचवली जावी.
4. रोज बसण्याची व्यवस्था, शारीरिक अंतर/सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन केले जावे. कार्यक्रम अथवा उपक्रम साजरे करणे टाळावे. शाळेत जाण्या येण्याच्या प्रवेश द्वारावर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, त्यानुसार वेळापत्रकात बदल करावेत.
5. शाळेत येतांना सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मास्क/चेहरा झाकणे आणि पूर्णवेळ मास्क घालून असणे अनिवार्य असेल. विशेषतः वर्गात किंवा एखादी सामुहिक कृती, भोजन, प्रयोगशाळांमध्ये किंवा वाचनालयात बसतांना मास्कसह सर्व नियमांचे पालन अनिवार्य असेल.
6. शारीरिक/सामाजिक अंतर आणि सुरक्षा मानकांचे सुयोग्य पालन करण्यासाठी जागोजागी चिन्हांच्या मदतीने सूचना दिल्या जाव्यात. मुलांना शाळेत पाठवण्याबाबत आधी पालकांची पूर्वसंमती घेणे आवश्यक असेल. ज्या विद्यार्थ्यांना घरुनच ऑनलाइन शिक्षण घ्यायचे असेल, त्यांना ते घेऊ द्यावे.
7. विद्यार्थी, पालक, शिक्षक, समुदाय सदस्य आणि वसतीगृहातील कर्मचारी या सर्वांना कोविडच्या आव्हानाविषयी पूर्ण माहिती द्यावी.तसेच, शिक्षण आणि इतर मंत्रालयाच्या, मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांची जबाबदारी आणि भूमिकाही त्यांना समजावून सांगितली जावी.
8. सर्व वर्गांसाठीच्या शैक्षणिक वेळापत्रकात बदल करावेत. विशेषतः मधल्या सुट्या आणि परीक्षांचे वेळापत्रक बदलावेत. शाळा सुरु होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तके असण्याची व्यवस्था करावी.
9. शाळेत, पूर्णवेळ एक संपूर्ण प्रशिक्षित डॉक्टर/परिचारिका/सहायक असतील याची खातरजमा करावी. तसेच, विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी एक समुपदेशक देखील नेमला जावा. विद्यार्थी तसेच शिक्षकांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जावी.
10. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून पुरेशी आरोग्यविषयक माहिती संकलित केली जावी. स्थानिक प्रशासनाकडून /;राज्य आणि जिल्हा पातळीवर मदतक्रमांक आणि जवळच्या कोविड केंद्र तसेच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठीचे सर्व क्रमांक प्राप्त करावेत.
11. उपस्थिती अनिवार्य नसावी, तसेच आजारपणाची सुटी देतांनाही नियमात लवचिकता असावी. जेव्हा आजारी असतील तेव्हा विद्यार्थी आणि शिक्षकांना घरी राहण्यास सांगावे.
12. कोविड संशयित रुग्ण आढळल्यास पुढची सर्व कार्यवाही प्रोटोकॉल नुसारच केली जावी.
13. जे दुर्बल/कमकुवत विद्यार्थी आहेत( बेघर/स्थलांतरित/दिव्यांग/कोविड रुग्णांच्या थेट संपर्कात आलेले विद्यार्थी) त्यांची विशेष काळजी घेतली जावी.त्यांच्या गरजांना प्राधान्य द्यावे. विद्यार्थ्यांना सहायक उपकरणे नि पूरक साधने देण्याची व्यवस्था करावी.
14. विद्यार्थ्यांच्या पोषाहारविषयक गरजा पूर्ण व्हाव्यात आणि कोविड काळात त्यांची रोगप्रतिकारशक्ती कायम राहावी यासाठी, राज्य/केंद्रशासित प्रदेशांना सूचना देण्यात होत्या की, गरम आणि ताजे मध्यान्ह भोजन दिले जावे किंवा अन्नसुरक्षा कायद्यानुसार, पात्र विद्यार्थ्यांना अन्नधान्य देण्याची व्यवस्था करावी, अन्नसुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छतेची तसेच शारीरिक अंतराची विशेष काळजी घेतली जावी.
भाग -2 यामध्ये शारीरिक /सामाजिक अंतर राखणे आणि त्याचे शैक्षणिक दृष्टीकोनातून शिक्षण देणे जसे की, व्यवहारामध्ये आणण्याचा अभ्यासक्रम, सूचनांचा भार, शिकवणीचे वेळापत्रक, मूल्यांकन इत्यादी. यांचे स्वरूप सल्ल्याचे आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी योग्य वाटेल अशा प्रकारे यासाठी स्वतःची मार्गदर्शक तत्वे तयार करावीत.
1. संपूर्ण वर्षासाठी विविध क्रियाकलाप, उपक्रम करण्यासाठी एक सर्वंकष वैकल्पिक दैनंदिनी तयार करण्यात यावी. या उपक्रमांमधून शिकवलेल्या गोष्टींचा उपयोग किती होतोय, हे लक्षात आले पाहिजे. सद्यस्थितीचा आणि आगामी भविष्याचा विचार करून शैक्षणिक वर्षाची दैनंदिनी तयार केली जावू शकते. संबंधित शिक्षण संचालनालयाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून सर्वंकष शैक्षणिक वर्षाचे नियोजन तयार केले जावू शकते. एनसीईआरटीने तयार केलेल्या वैकल्पिक शैक्षणिक दैनंदिनीविषयी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करता येऊ शकेल.
2. शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे एकत्रिकरण करण्यास प्राधान्य दिले जाऊ शकते.
3. शिक्षकांनी शक्य तितक्या वर्गामध्ये ‘आयसीटी’ समेकित करण्यासाठी मुलांचे कौशल्य अधिक विकसित करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रशिक्षण मॉडेल तयार केले जाऊ शकते.
4. शिक्षकांनी विविध विषयांचे शिक्षण देताना वेगवेगळ्या संकल्पना एकत्रित करून मुलांना महामारी (साथीचे रोग) याविषयी संवेदनशीलता निर्माण करावी. यामध्ये शिक्षकांना ईव्हीएस, भाषा, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र, कला या विषयांतल्या विविध संकल्पना एकत्रित करता येतील.
5. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर अभ्यासक्रम कशा पद्धतीने घेतला जाणार आहे, याविषयी चर्चा करणे आवश्यक आहे. तसेच शिकवताना कोणते मॉडेल स्वीकारण्यात येणार आहे हे स्पष्ट करावे. ( प्रत्यक्ष -समोरासमोर सूचना देऊन शिकविणार / वैयक्तिक कार्य देऊन किंवा पोर्टफोलिओ/ समूह आधारित प्रकल्प कार्य / समूह सादरीकरण इत्यादी ) तो विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ, शालेय आधारित मूल्यांकनाची तारीख, यामध्ये किती काळ सवलत असणार याविषयी चर्चा करण्यात यावी.
6. वर्गातल्या सर्वात असुरक्षित असलेल्या मुलांच्या गरजा लक्षात घेवून त्यांना प्राधान्य देण्यात यावे. (बेघर झालेले/स्थलांतरीत झालेली मुले/ दिव्यांग/ कोविड-19 चा थेट दुष्परिणाम सहन करावा लागलेले विद्यार्थी/ ज्या मुलांच्या परिवारातील व्यक्ती कोविडमुळे रूग्णालयात दाखल होती किंवा कुटुंबातील सदस्यांचे कोविडमुळे मृत्यू झाला असेल, असे विद्यार्थी )
7. अध्यापनाच्या साधनसामुग्रीचा वापर शारीरिक /सामाजिक अंतर आणि सुरक्षिततेचे सर्व निकष ध्यानात ठेवून करण्यात यावा. साधन सामुग्रीमध्ये समवयस्कांचे अध्यापन आणि शिकणे, कार्यपुस्तिका आणि कार्यतक्ता यांचा वापर करणे, वर्गामध्ये तंत्रज्ञानाच्या आधारे साधन सामुग्रीचा वापर करणे, पालक / आजी-आजोबा/ मोठी भावंडे यांच्याकडून शिकून घेण्यासाठी सक्षम करणे. समाजातल्या स्वयंसेवकांच्या सेवांचा वापर करणे इत्यादी.
8. डिजिटल आणि ऑनलाइन शिक्षणासंबंधी ‘प्रज्ञता’ मार्गदर्शक तत्वे देण्यात आली आहेत. त्यांचा संदर्भ शिक्षक आणि विद्यार्थ्यांना घेता येईल. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पाठ्यपुस्तकांनाही आता डिजिटल सक्षम बनविले आहे. अशा पुस्तकांना कसे डाऊनलोड करायचे याची माहिती विद्यार्थी आणि पालक यांना द्यावी.
9. सर्व शिकणा-या मुलांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य झाले पाहिजे, यासाठी सर्व शिक्षक, पालक आणि व्यवस्थापकांनी मुलांच्या समग्र मुल्यांकनाकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. एससीईआरटी /एनसीईआरटी यांच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करून मुलांच्या आकलनशक्तीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी संवेदनशील राहून त्यांना समजून सांगावे, मूल्यांकनानुसार मुलांचे कौतुक करावे.
10. टाळेबंदीच्या काळामध्ये मुलांना घरामध्ये राहून औपचारिक शिक्षण घ्यावे लागले, आता पुन्हा विद्यार्थ्यांना शाळेत सहजपणाने रूळविणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने संक्रमणाचा हा काळ आहे. त्यामुळे शाळांनी आपल्या दैनंदिनीची फेररचना करून वार्षिक अभ्यासक्रम पूर्ततेसाठी नवीन वेळापत्रक तयार करावे. यामध्ये उपचारात्मक वर्ग भरवावेत किंवा ‘चला पुन्हा जावू शाळेत’, अशी मोहीम राबवावी, तसेच इतर उपाय योजावेत.
11. शालेय शिक्षक, शालेय समुपदेशक आणि शाळेचे आरोग्य कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थी वर्गाला भावनात्मक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज आहे. कोविड-19 महामारी उद्रेक आणि त्यापलिकडे जाऊन मानसिक आरोग्य आणि भावनिक सुदृढता आणण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि मुलांचे कुटुंबिय यांना मानसिक-सामाजिक पाठबळ देण्यासाठी ‘मनोदर्पण’ यामध्ये विविध उपक्रमांचा समावेश आहे.
12. या प्रमाणित कार्यप्रणाली/ मार्गदर्शक तत्वांच्या आधारे राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांनी शाळा पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी आणि यासंबंधित सर्व भागीदारांना प्रशिक्षित करण्यासाठी स्वतःची मानक कार्यप्रक्रिया विकसित करण्याची आवश्यकता आहे.
13. शाळेमध्ये वातावरण सुरक्षित रहावे यासाठी दक्षतासूची तयार करण्यासाठी, त्यामध्ये विविध सहभागितांचा समावेश करावा. यासाठी शैक्षणिक नियोजन आणि शाळेच्या कामकाजासाठी इमारतींचा वापर केला जाऊ शकतो.
14. राज्य/केंद्रशासित प्रदेश शिक्षण विभाग शाळा पुन्हा सुरू करण्यापूर्वी जागरूकता/दक्षता आणि क्षमता निर्माण कार्यक्रमाचे आयोजन करू शकतात. यामध्ये डीआयईटी प्राध्यापक सदस्य, शाळा प्रमुख, शिक्षक आणि पालक सहभागी होऊ शकतात.
------
M.Chopade/R.Aghor/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661892)
Visitor Counter : 1017