पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बोगद्याचे 3 ऑक्टोबरला होणार उद्घाटन

Posted On: 01 OCT 2020 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑक्‍टोबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोहतांग येथे दि. 3 ऑक्टोबर, 2020 रोजी अटल बोगद्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

महामार्गावरील जगातील सर्वात जास्त लांबीचा हा अटल बोगदा आहे. मनाली ते लाहौल -स्पिती यांना जोडणा-या या बोगद्याची लांबी 9.02 किलोमीटर आहे. लाहौल स्पितीच्या संपूर्ण खो-यामध्ये हा बोगदा तयार करण्यात आला आहे. या भागामध्ये होणा-या हिमवर्षावामुळे लाहौल स्पितीच्या पुढच्या भूप्रदेशाला जवळपास सहा महिने उर्वरित देशाबरोबर संपर्क साधणे शक्य होत नव्हते.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा बोगदा तयार करण्यात आला आहे. हिमालयीन रांगांमध्ये समुद्र सपाटीपासून 3000 मिटर्स (10,000 फूट) उंचीवर असलेल्या पिर पंजाल येथे हा बोगदा तयार करण्यात आला आहे.

या बोगद्यामुळे मनाली ते लेह यांच्यामधले 46 किलोमीटर अंतर कमी झाले आहे. अतिउंचीवरच्या डोंगराळ भागामुळे अवघे 46 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनांना 4 ते 5 तासांचा कालावधी लागत होता.

मनालीपासून 25 किलोमीटरवर 3060 मीटर्स उंचीवर असलेल्या दक्षिण टोकापासून अटल बोगद्याला प्रारंभ होतो. तर उत्तरेकडे असलेल्या लाहौल खो-यामध्ये वसलेल्या तेलिंग, सिस्सू या गावाजवळ 3071 मीटर्स उंचीवर हा बोगदा संपतो.

या बोगद्याचा घोड्याच्या नालेसारखा आकार आहे. तसेच आठ मीटर रूंदीचा दुपदरी मार्ग त्यामध्ये तयार केला आहे. तर बोगद्याची उंची 5.525 मीटर ठेवण्यात आली आहे.

बोगद्याची एकूण रूंदी 10.5 मीटर असून त्यामध्ये 3.6 गुणिले 2.25 मीटरचा आपत्तीकाळासाठी अग्निरोधक बोगदा मार्ग तयार करण्यात आला आहे.

प्रतिदिनी 3000 गाड्या आणि 1500 मालमोटारी 80 किलोमीटर/प्रतितास वेगाने या बोगद्यातून वाहतूक करू शकतील, अशा पद्धतीने तो तयार करण्यात आला आहे.

या बोगद्यामध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रोमेकॅनिल प्रणाली तसेच हवा खेळती राहण्यासाठी सर्व व्यवस्था, एससीएडीए नियंत्रक अग्निरोधक प्रणाली बसविण्यात आली आहे.

या बोगद्याचे बांधकाम करताना सर्व प्रकारे सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली आहे. या सुरक्षा व्यवस्थेची काही वैशिष्ट़ये पुढील प्रमाणे आहेत.

  1. बोगद्याच्या दोन्ही प्रवेशस्थानांवर तपासणीसाठी नाके-अडथळे निर्माण केले आहेत.
  2. आपत्काळामध्ये दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधता यावा, यासाठी प्रत्येक 150 मीटर्सवर संपर्क यंत्रणा
  3. प्रत्येक 60 मीटर्सवर अग्निशमन यंत्रणा
  4. प्रत्येक 250 मीटर्सवर सीसीटीव्ही बसविण्यात आले असून स्वयंचलित घटना शोध प्रणाली त्यामध्ये आहे.
  5. प्रत्येक एक किलोमीटरवर बोगद्यामधल्या हवेची गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा
  6. दर 25 मीटर्सवर बाहेर पडण्यासाठी प्रकाश योजना आणि मार्गदर्शन चिन्हे
  7. या संपूर्ण बोगद्यामध्ये ब्राॅडकास्टिंग प्रणाली बसविण्यात आली आहे.
  8. प्रत्येक 50 मीटर्सवर अग्निशमनासाठी सुविधा
  9. प्रत्येक 60 मीटरवर कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

रोहतांग पास येथे अशा विश्वविक्रमी लांबीच्या बोगद्याच्या निर्माणाचा ऐतिहासिक निर्णय दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ते पंतप्रधान असताना दि. 3 जून, 2000 रोजी घेतला होता. या बोगद्याचा शिलान्यास दक्षिण टोकाच्या अॅक्सेस मार्गावर दि. 26 मे, 2002 मध्ये करण्यात आला होता.

बीआरओ म्हणजेच सीमा मार्ग संघटनेच्यावतीने या अतिउंचीवरच्या डोंगराळ भौगोलिक प्रदेशामध्ये बोगदा तयार करण्यासाठी येणा-या अडचणींवर मात करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. सर्वात अवघड काम म्हणजे 587-मीटर क्षेत्रात सेरी नाला भागामध्ये बांधकाम करणे होते. हे काम पूर्ण करण्याचे अतिकठीण आव्हान दि. 15 ऑक्टोबर, 2017 रोजी पार पाडण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 24 डिसेंबर, 2019 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या सर्वात उंचीच्या रोहतांग बोगद्याचे ‘अटल बोगदा’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देशासाठी जे योगदान दिले, त्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ या बोगद्याला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे.

या बोगद्याचे रोहतांग येथे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाहौल स्पिती येथील सोलंग खोरे आणि सिस्सू येथे एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत.

 

* * *

U.Ujgare/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1660601) Visitor Counter : 470