पंतप्रधान कार्यालय

भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारीबाबत संयुक्त निवेदन

Posted On: 28 SEP 2020 10:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  28 सप्टेंबर  2020

डेन्मार्कच्या पंतप्रधान महामहीम  मेट्टे फ्रेडरिक्सन  आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 सप्टेंबर 2020 रोजी भारत आणि डेन्मार्क दरम्यान आभासी शिखर परिषदेचे सह -अध्यक्षपद भूषवले.

2. पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांनी द्विपक्षीय संबंधांबाबत  मैत्रीपूर्ण वातावरणात विचारांचे आदानप्रदान केले.  कोविड -19 महामारी आणि हवामान बदल आणि हरित परिवर्तन यासारख्या दोन्ही देशांच्या हिताच्या जागतिक मुद्द्यांवर यावेळी  चर्चा झाली. शाश्वत अर्थव्यवस्था आणि संस्थांना गतिमान करण्याबाबत यावेळी सहमती झाली.

3. ऐतिहासिक दुवे, सामायिक लोकशाही परंपरा आणि प्रादेशिक, तसेच आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थैर्यासाठी  द्विपक्षीय संबंधांच्या  निरंतर  विकासाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

4. विश्वासू भागीदार राहण्याची सामायिक इच्छा लक्षात घेऊन, दोन्ही पंतप्रधानांनी भारत-डेन्मार्क संबंध हरित धोरणात्मक भागीदारीत वृद्धिंगत करण्याबाबत  सहमती दर्शवली. ही भागीदारी भारत आणि डेन्मार्क यांच्यात संयुक्त सहकार्य आयोग  ( 6 फेब्रुवारी 2009 रोजी स्वाक्षरी ) स्थापन करण्याच्या विद्यमान करारावर आधारित असेल ज्यामध्ये राजकीय , आर्थिक आणि व्यावसायिक ; विज्ञान आणि तंत्रज्ञान; पर्यावरण , ऊर्जा; शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रात सहकार्याची  कल्पना केली आहे; . याव्यतिरिक्त, नवीकरणीय  ऊर्जा, शहरी विकास, पर्यावरण, कृषी आणि पशुसंवर्धन, अन्न प्रक्रिया, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन , नौवहन, कामगार गतिशीलता आणि डिजिटायझेशन यावरील  विद्यमान संयुक्त कार्य गटांना तो पूरक असेल.

5. हरित धोरणात्मक भागीदारी  ही राजकीय सहकार्याला गती, आर्थिक संबंध आणि हरित विकासाचा विस्तार,  रोजगार निर्माण करणे आणि जागतिक आव्हाने व संधी या मुद्द्यांवर सहकार्य बळकट करण्यासाठी परस्पर लाभदायक  व्यवस्था आहे;ज्याचा भर  पॅरिस कराराच्या महत्वाकांक्षी अंमलबजावणीवर आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या उद्दीष्टांवर आहे.

6.हरित धोरणात्मक भागीदारी स्थापनेचे महत्त्व दोन्ही पंतप्रधानांनी मान्य केले आणि त्या अंतर्गत भारत आणि डेन्मार्क संबंधित मंत्रालये, संस्था आणि हितधारक  यांच्या माध्यमातून  सहकार्य करतील.

ऊर्जा आणि हवामान बदल

7.हरित ऊर्जा संक्रमण आणि हवामान बदलावरील जागतिक आव्हाने आणि उपायांबाबत उभय पंतप्रधानांनी भागीदारी कारण्याबाबत सहमती दर्शवली. किनाऱ्यावरील पवन आणि नवीकरणीय उर्जा बाबत   धोरणात्मक क्षेत्र सहकार्य तसेच भारत-डेन्मार्क क्षमता निर्मिती वर ऊर्जा भागीदारी (आयएनडीईपी), पवन ऊर्जेबाबत  तंत्रज्ञानाचे ज्ञान-सामायिकरण आणि  हस्तांतरण; उर्जा मॉडेलिंग आणि नवीकरणीय ऊर्जेचे  एकत्रीकरण यावर भारत-डेन्मार्क ऊर्जा भागीदारी यातून जागतिक ऊर्जा संक्रमण, हरित विकास आणि शाश्वत विकासाच्या दिशेने  काही सामायिक जागतिक आव्हानांवर तोडगा काढण्याची सामायिक वचनबद्धता दिसून येते.  येत्या काही वर्षांत ऊर्जा भागीदारी आणखी बळकट होण्याची कल्पना दोन्ही बाजूंनी मांडण्यात आली.

8.हवामान बदलांविरूद्धच्या जागतिक लढाईत भारत आणि डेन्मार्क यांनी आघाडीवर राहण्याबाबत सहमती दर्शवली. दोन्ही देशांनी हवामान आणि उर्जा यावर अतिशय महत्वाकांक्षी राष्ट्रीय उद्दीष्टे ठेवली आहेत जी पॅरिस कराराच्या महत्वाकांक्षी अंमलबजावणीत योगदान देतील. महत्वाकांक्षी हवामान आणि शाश्वत उर्जा उद्दीष्टे प्राप्त करणे शक्य आहे हे दोन्ही देश एकत्रितपणे जगाला दाखवतील.

9.हवामान बदल आणि नवीकरणीय उर्जेवर विविध स्तरांवर नियमित सल्लामसलत आणि  संवाद आयोजित करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले.

पर्यावरण / जल  आणि संसाधनांचा अपव्यय न होऊ देता वापर करणारी आर्थिक व्यवस्था

10.दोन्ही पंतप्रधानांनी पर्यावरण / जल आणि संसाधनांचा  अपव्यय न होऊ देता निरंतर वापर करणारी आर्थिक व्यवस्था निर्मितीबाबत सरकारच्या विद्यमान सहकार्याचा  विस्तार आणि बळकटीकरण करण्याच्या दिशेने कार्य करण्याचे मान्य केले. त्यांनी पाण्याच्या कार्यक्षमतेत आणि बिगर-महसूल पाण्याबाबत (पाण्याचे नुकसान) सहकार्य करायला सहमती दर्शविली आणि या संदर्भात भारतीय जलशक्ती  मंत्रालय आणि डॅनिश पर्यावरण संरक्षण संस्था आणि डॅनिश पर्यावरण आणि अन्न मंत्रालयाला प्रारंभिक तीन वर्षांच्या कालावधी (2021-23) साठी कृती आराखडा  विकसित करण्याची जबाबदारी सोपवली.

11.दोन्ही पंतप्रधानांनी भारत-डेन्मार्क जल तंत्रज्ञान आघाडी द्वारे पाणी पुरवठा, पाणी वाटप, सांडपाणी प्रक्रिया, सीवरेज सिस्टम, प्रक्रिया केलेल्या  सांडपाण्याचा पुनर्वापर, जल व्यवस्थापन आणि जल  क्षेत्रात ऊर्जेचा योग्य वापर  या विशिष्ट क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची संयुक्त इच्छा व्यक्त केली.

स्मार्ट सिटीजसह शाश्वत शहरी विकास

12.दोन्ही देशांनी 26 जून  2020  रोजी शाश्वत शहरी विकासावर दुसरा भारत-डेन्मार्क संयुक्त कृती गट आयोजित केल्याची दखल घेतली आणि गोव्यातील अर्बन लिव्हिंग लॅबच्या माध्यमातून स्मार्ट सिटीजसह शाश्वत शहरी विकासात द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्यावर सहमती दर्शवली.

13.उदयपूर व आर्हस आणि तुमकुरु व अलबोर्ग दरम्यान विद्यमान शहर ते शहर सहकार्य दृढ करण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली.

14.त्यांनी नमूद केले की डॅनिश कंपन्या भारतातील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या संरचनेत  हातभार लावत आहेत आणि शाश्वत शहरी विकासाच्या सर्व क्षेत्रात डेन्मार्ककडून वाढत्या  सहभागाचे त्यांनी स्वागत केले.

व्यवसाय, व्यापार आणि नौवहन

15.दोन्ही पंतप्रधानांनी हरित आणि हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर विशेष लक्ष केंद्रित करून दोन्ही देशांचे सरकार, संस्था आणि व्यवसाय यांच्यात भागीदारी विकसित करण्याच्या कल्पनेचे स्वागत केले. हरित उर्जेमध्ये सार्वजनिक आणि खाजगी गुंतवणूकींना आधार देण्यासाठी नियामक चौकटीच्या अटींचे महत्त्व त्यांनी मान्य केले.

16.दोन्ही नेत्यांनी सागरी कामकाजावरील सखोल सहकार्याची प्रशंसा केली आणि जहाज बांधणी  आणि रचना , सागरी सेवा आणि ग्रीन शिपिंग तसेच बंदर विकासात सहकार्य वाढवण्याच्या क्षमतेची दखल घेतली.

17.उद्योगसंबंधी शिष्टमंडळांना प्रोत्साहन देण्याचे, लघु आणि सुक्ष्म उद्योगांचा बाजारपेठेतील प्रवेश सुलभ करण्याचे तसेच उद्योग सुलभता वाढविणार असल्याचे दोन्ही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. 

18.बौद्धिक मालमत्ता हक्कविषयक नव्याने वाढत्या सहकार्यावर भारत आणि डेन्मार्क या दोन्ही देशांनी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे दोन्ही देशांना आपापल्या राष्ट्रीय बौद्धिक मालमत्ता यंत्रणेचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण करण्यास मदत मिळेल आणि त्यायोगे नाविन्यता, सर्जनशीलता आणि तांत्रिक प्रगतीलाही प्रोत्साहन मिळेल.

विज्ञान, तंत्रज्ञान, नाविन्यता आणि डिजीटायझेशन

19. तंत्रज्ञान क्षेत्रातील विकास तसेच नवीन उपाययोजनांच्या अंमलबजावणीला गती देण्याच्या दृष्टीने भारत आणि डेन्मार्क हे दोन्ही देश, सक्षम सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यता (एसटीआय) क्षेत्रांतील गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि सुविधा प्रदान करण्याचे महत्त्व जाणतात. या तिन्ही क्षेत्रांतील सहकार्य, भारत आणि डेन्मार्कमधील अधिकारी तसेच लहान - मोठ्या कंपन्या आणि संशोधन तसेच उच्च शिक्षण संस्था यांच्यातील संबंधांना प्रोत्साहन देते. ऊर्जा, पाणी, जैव-स्रोत आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रकल्प राबविण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यता क्षेत्रातील विद्यमान द्विपक्षीय भागीदारी अधिक सक्षम करण्याबाबत दोन्ही देश सहमत झाले.

20. हरीत संक्रमणासाठी डिजिटायझेशन आणि डिजिटल उपाययोजना तसेच बिझनेस मॉडेलमधील (उद्योग रचना) आपले स्वारस्य समान असल्याची समान भावना दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली आणि शाश्वत हरीत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विकास, नाविन्यता आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी वाढविण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.

अन्न आणि कृषी

21. कृषी क्षेत्रात सहकार्य करण्याची अफाट क्षमता लक्षात घेता, दोन्ही पंतप्रधानांनी अन्न प्रक्रिया आणि अन्न सुरक्षा, तसेच पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय या क्षेत्रांत दोन्ही देशांत कार्यरत अधिकारी, उद्योग आणि संशोधन संस्था यांच्यात सखोल आणि निकटतम सहकार्य वाढविण्यास प्रोत्साहन दिले.

आरोग्य आणि जीवन विज्ञान

22. आरोग्य क्षेत्रातील संवाद आणि सहकार्य बळकट करण्यासाठीची क्षमता आणि इच्छाशक्तीवर दोन्ही देशांनी भर दिला. साथीचे रोग आणि लसी, विशेषत: कोविड-19 आणि भविष्यातील साथरोगांचा सामना करण्यासाठी आरोग्य धोरणाशी संबंधित संवाद वाढविण्यावर आणि चांगल्या पद्धतींची परस्परांशी देवाणघेवाण करण्यातील स्वारस्यावर दोन्ही देशांनी शिक्कामोर्तब केले.  संशोधन क्षेत्रातील सहकार्याबरोबरच जीवन विज्ञान क्षेत्रासाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण करून उद्योगांसाठी व्यावसायिक संधींच्या विस्तारावर काम करण्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले.

सांस्कृतिक सहकार्य, नागरिकांमधील परस्पर संपर्क आणि श्रमिकांचे आवागमन

23. भारत आणि डेन्मार्क या दोन्ही देशांतील संबंध दोन्ही देशांच्या नागरिकांमधील प्रदीर्घ परस्पर संपर्कामुळेच अधिक समृद्ध झाल्याचे दोन्ही पंतप्रधानांनी मान्य केले. सांस्कृतिक सहकार्याच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील नागरिकांमध्ये परस्परांबाबत अधिक जाण आणि सामंजस्य वाढविण्यास दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली.

24. परस्परांच्या देशातील श्रमिकांची ये-जा वाढविण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी तसेच दोन्ही देशांमधील नागरिकांमध्ये सुसंवाद घडवून आणत पर्यटन क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यासाठी दोन्ही देशांमधील प्रवास अधिक सुलभ करण्याबाबत दोन्ही देशांनी सहमती दर्शविली.

बहुपक्षीय सहकार्य

25. नियमाधारित बहुपक्षीय व्यवस्थेला पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठीच्या प्रयत्नांत आणि उपक्रमांत सहभागी होण्याबाबत दोन्ही पंतप्रधान सहमत आहेत. यामध्ये ऊर्जा आणि हवामान बदलांसंबंधीच्या जागतिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करण्यासाठी बहुपक्षीय सहकार्य वाढविण्याची निकड आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था, आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा संस्था तसेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसोबतच्या सामाईक वचनबद्धतेचा समावेश आहे.

26. जागतिक विकासाला तसेच शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेंतर्गत मुक्त, समावेशक आणि नियमाधारित बहुपक्षीय व्यापार यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्याच्या आवश्यकतेचे दोन्ही देशांनी समर्थन केले.

27. जागतिक व्यापार संघटनेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेला दोन्ही देशांनी पाठिंबा दर्शविला. संघटनेत सर्वसमावेशक सुधारणांसाठी सहकार्य वाढविण्याच्या तसेच योगदान देण्याच्या दृढनिश्चयाचा दोन्ही देशांनी पुनरूच्चार केला. या सुधारणा सर्वसमावेशक असाव्यात आणि पारदर्शक पद्धतीने त्यांवर अंमलबजावणी व्हावी, यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शविली. जागतिक व्यापार संघटनेच्या द्विस्तरीय तक्रार निवारण यंत्रणेचा एक भाग म्हणून संपूर्ण क्षमतेच्या अपीलीय संस्थेची पुनर्स्थापना करण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याबाबतही दोन्ही देशांमध्ये एकमत झाले.

28. भारत आणि युरोपियन संघातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये महत्त्वाकांक्षी, न्याय्य आणि परस्पर फायदेशीर व्यापार तसेच गुंतवणूक करारांसाठी प्रयत्न करण्याबाबत दोन्ही देशांनी वचनबद्धता व्यक्त केली.

29. आर्क्टिक परिषदेच्या चौकटीत आर्क्टिक सहकार्याला जागतिक परिमाण आहे आणि पर्यावरणाच्या संरक्षणाची गरज तसेच हवामानातील बदलांशी दोन हात करताना ते लक्षात घेणे अतिशय गरजेचे आहे, असे दोन्ही देशांना मान्य केले. या भावनेसह दोन्ही देशांनी आर्क्टिक परिषदेच्या चौकटीत राहून हवामानातील बदलांच्या क्षेत्रात सहकार्याची तयारी दर्शविली.

30. दोन्ही नेत्यांनी मानवाधिकार, लोकशाही आणि कायद्याचे राज्य या सामायिक मूल्यांची दखल घेत लोकशाही आणि मानवी हक्क जपण्यासाठी बहुपक्षीय क्षेत्रात सहकार्य करण्याचे मान्य केले.

समारोप

31. डेन्मार्क आणि भारत या दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक हरीत भागीदारी सुरू करण्याच्या निर्णयामुळे त्यांच्यातील मैत्री आणि सहकार्याचा एक नवा अध्याय सुरू झाल्याची भावना दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली.

32. संबंधित क्षेत्रांतील महत्वाकांक्षी उद्दिष्टे आणि त्या अनुषंगाने आवश्यक कृती निर्धारित केल्या जातील, त्यानुसार कृती आराखडा तयार केला जाईल आणि त्यावर लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाईल.

MC/SK/MP/PM

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1659919) Visitor Counter : 363