विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सीएसआयआरकडून 79वा वर्धापनदिन साजरा


कोविड महामारीने निर्माण केलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सीएसआयआरने उल्लेखनीय प्रयत्न केले आहेतः डॉ. हर्षवर्धन

प्रतिष्ठेच्या भटनागर पुरस्कारांची घोषणा

Posted On: 26 SEP 2020 7:19PM by PIB Mumbai

 

सीएसआयआर अर्थात शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेने आज आपल्या संकुलातील एस एस भटनागर सभागृहात आपला 79वा वर्धापनदिन साजरा केला. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान, आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री आणि सीएसआयआरचे उपाध्यक्ष डॉ. हर्षवर्धन यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर अतिशय कमी उपस्थिती आणि सुरक्षित अंतराचे पालन करून प्रत्यक्ष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सीएसआयआरचे महासंचालक आणि शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन विभागाचे सचिव डॉ. शेखर मांडे, एचआरडीजीचे  आणि सीएसआयआरच्या सर्व प्रयोगशाळांचे प्रमुख ए. चक्रवर्ती आणि इतर विविध समाज माध्यम मंचांच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

सध्याच्या कोविड-19च्या आपत्तीच्या काळात संपूर्ण सीएसआयआरने केलेल्या कामाची मंत्र्यांनी प्रशंसा केली. ज्यावेळी आत्यंतिक गरज होती त्याच वेळी सीएसआयआरच्या प्रयोगशाळांनी आपली कामगिरी उंचावली आणि निदानशास्त्र, औषधे आणि व्हेंटिलेटर्स आणि इतर अनेक प्रकारच्या सामग्रीची गरज पूर्ण केली, असे ते म्हणाले. डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी एका डिजिटल पुस्तकाचे आणि सीएसआयआरच्या कोविड-19 प्रतिबंधात्मक कार्याचा  आणि  या लढ्यामध्ये सीएसआयआरने सुरू केलेल्या विविध उपक्रमांमागे असलेल्या लोकांच्या योगदानाचा आढावा सादर करणाऱ्या लघुपटाचे प्रकाशन केले. यावेळी सीएसआयआरच्या विविध पुरस्कारांची दूरदृश्य प्रणालीद्वारे घोषणा करण्यात आली. यामध्ये सीएसआयआर शालेय विद्यार्थ्यांसाठी नवनिर्मिती पुरस्कार-2020, सीएसआयआर युवा वैज्ञानिक पुरस्कार- 2020, सीएसआयआर  तंत्रज्ञान पुरस्कार-2020, सीएसआयआर ग्रामीण विकासासाठी विज्ञान-तंत्रज्ञान नवनिर्मिती पुरस्कार- 2017,2018,2019, सीएसआयआर हिरक महोत्सव तंत्रज्ञान पुरस्कार-2019 आणि जीवशास्त्रीय विज्ञान-तंत्रज्ञानामधील गुणवत्तेसाठी जी एन रामचंद्रन सुवर्णपदक या पुरस्कारांचा त्यात समावेश होता.

कार्यक्रमाच्या अखेरीला सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी प्रतिष्ठेच्या शांती स्वरुप भटनागर पुरस्कार 2020च्या विजेत्यांची नावे घोषित केली.

जागतिक महामारीने आपल्या समोर अभूतपूर्व अडचणी आणि काही अतिशय अवघड आव्हाने निर्माण केली असे डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या भाषणात सांगितले आणि  या आव्हानांचे रुपांतर सीएसआयआरने संधींमध्ये केल्याबाबत समाधान व्यक्त केले. इतिहासात पहिल्यांदाच सीएसआयरच्या सर्व प्रयोगशाळांनी मग त्या एरोस्पेस किंवा ओशनोग्राफीच्या असोत, लेदर किंवा जिनोमिक्सच्या असोत या सर्वच प्रयोगशाळांनी त्यांच्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर केला आणि त्यांची उर्जा कोविड-19 प्रतिबंधावर केंद्रित केली, असे त्यांनी सांगितले. सर्व प्रयोगशाळांमध्ये सहकार्याचे आणि परस्पर समन्वयाने काम करण्याचे वातावरण होते असे ते म्हणाले. सीएसआयआरच्या दृष्टिकोनामुळे वेगवेगळ्या विषयांशी संबंधित असूनही सर्वच प्रयोगशाळांमध्ये समावेशकतेचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्यांनी 100 च्या घरात तंत्रज्ञानांची निर्मिती केली.

मग ती औषधे असोत, लसी असोत. चाचण्या असोत, क्रमवारी, पीपीई, रुग्णालय सहायता उपकरणे, मास्क, सॅनिटायजर्स, निर्जंतुकीकरण प्रणाली असोत या सर्वच प्रकारांमध्ये सीएसआयआरने अतिशय जलदगतीने आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले, असे त्यांनी सांगितले. सीएसआयआरची सीसीसीएमबी ही पहिली प्रयोगशाळा होती ज्या प्रयोगशाळेने देशातील चाचण्यांचीच सुरुवात केली नाही तर या चाचण्या कशा प्रकारे करायच्या याचे प्रशिक्षण देखील अनेक वैद्यकीय व्यावसायिकांना दिले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आज देशातील चाचण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, याची माहिती तुम्हाला आहेच, असे ते म्हणाले.

सीएसआयआरमध्ये 2000 पेक्षा जास्त जिनोम्सची वर्गवारी करण्यात आली असून त्यांनी विश्लेषणासाठी साधने विकसित केली आहेत, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली. सीएसआयआरने चाचण्या आणि निदानाच्या नावीन्यपूर्ण पद्धती विकसित करतानाच फाविपिरावीरसारखी स्वस्त औषधांचे संश्लेषण केले, लसींच्या चाचण्या करण्याचे काम केले आणि अशाच प्रकारे इतर महत्त्वाचे योगदान दिले. त्याचबरोबर तात्पुरत्या रुग्णालयांची देखील उभारणी केली. अशा प्रकारच्या एका रुग्णालयाचे मी गाझियाबादला उद्घाटन केले, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची वाहतूक करता यावी आणि मध्यस्थांच्या मदतीविना विक्री करता यावी यासाठी सीएसआयआरने अतिशय यशस्वी ठरलेल्या किसान सभा ऍपची आणि नंतर आरोग्यपथ ऍपची निर्मिती केली.

ज्या ज्या वेळी आव्हानात्मक स्थितीमध्ये देशाला गरज लागली त्या त्या वेळी प्रतिसाद देणारी संस्था म्हणून सीएसआयआर उदयाला आली आहे, असे ते म्हणाले. यापूर्वी देखील असे घडले आहे आणि सध्याच्या काळात देखील तातडीने प्रतिसाद देण्याचे काम या संस्थेने केले आहे, अशा शब्दात त्यांनी या संस्थेच्या योगदानाची प्रशंसा केली.

आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने एक आराखडा तयार करण्याचे आणि त्यानुसार धोरण आखण्यासाठी  प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी सीएसआयआरला केले.

शालेय विद्यार्थ्यांमधील नवनिर्मितीक्षमता पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला आणि सर्व युवा वैज्ञानिक पुरस्कार विजेत्यांचे, तंत्रज्ञान पुरस्कार विजेत्यांचे आणि सीएआयआरडी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.

मार्च महिन्यामध्ये सीएसआयआरने देशाच्या अपूर्ण गरजा लक्षात घेतल्या, या महामारीला तोंड देण्यासाठी आपल्या क्षमतेचे आणि सामर्थ्याचे मूल्यमापन केले आणि निदान, देखरेख, औषधे, रुग्णालयांना उपयुक्त उपकरणे, पीपीई किट आणि पुरवठा साखळी आणि मालवाहतूकशास्त्र यानुसार काम करण्यासाठी बहुआयामी धोरणाचा अंगिकार केला, असे सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले. या धोरणामुळे आता अतिशय उत्साहवर्धक परिणाम दिसू लागले आहेत, असे ते म्हणाले.

****

B.Gokhale/S.Patil/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1659400) Visitor Counter : 118