सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
खादी आणि ग्रामोद्योगने स्वदेशीला चालना देण्यासाठी एसपीजी संकुलात खादी भांडार सुरु केले
Posted On:
26 SEP 2020 6:38PM by PIB Mumbai
खादी आणि ग्रामोद्योगने ‘स्वदेशी’ ला चालना देण्यासाठी विशेष संरक्षण दलाच्या (एसपीजी) द्वारका, दिल्ली येथील निवासी संकुलात शाखा सुरु केली आहे. केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना आणि एसपीजी संचालक अरुण कुमार यांनी संयुक्तरीत्या या शाखेचे उद्घाटन केले. दोन निवासी संकुलात राहणाऱ्या एसपीजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 4000 कुटुंबीयांना याचा लाभ होणार आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीकडे असते.
एसपीजी सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुद्ध व हातमागाची “स्वदेशी” वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी खादी विक्रीची शाखा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे केव्हीआयसीने म्हटले. याठिकाणी 20% सवलतीच्या दराने सर्व खादी उत्पादनांची विक्री करण्यात येणार आहे. 125 एकर जागेवर विस्तारलेल्या द्वारका येथील एसपीजी कॉम्प्लेक्समध्ये जवळपास 15,000 लोक राहतात. त्याच्या जवळच 26 एकर जागेवर एसपीजी कर्मचार्यांची 800 कुटुंबांचे वास्तव्य आहे आणि म्हणूनच खादी भांडाराला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. एसपीजीने केव्हीआयसीला नाममात्र 1 रुपया महिना अशा दराने जागा उपलब्ध करुन दिली आहे.
एसपीजी पंतप्रधानांच्या सुरक्षेची काळजी घेते, जे स्वतः खादीचे मोठे पुरस्कर्ते आहेत. या भांडारामुळे एसपीजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची काळजी केव्हीआयसी घेईल, असे विनय कुमार सक्सेना म्हणाले. ते पुढे म्हणाले की खादी विक्रीमुळे खादी कारागिरांना चालना मिळेल आणि केवळ स्थानिक उत्पादनास प्रोत्साहित करून आणि ग्रामीण उद्योगांना बळकटी मिळाल्यास आम्ही लोकांसाठी शाश्वत व्यवसाय उत्पन्न करू शकू.
पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकल आवाहनाच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे आहे. यापूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निमलष्करी दलांच्या कॅन्टीनमधून स्वदेशी उत्पादनंची विक्री करण्याचे आदेश दिले होते. केव्हीआयसीने आयटीबीपी सोबत करार करुन त्यांना कच्चे मोहरीचे तेल पुरवत आहे. या भांडारातून केव्हीआयसी खादीचे कापड आणि तयार कपडे तसेच ग्रामीण उद्योगांनी निर्माण केलेल्या उत्पादनांची विक्री करणार आहे.
******
B.Gokhale/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1659377)
Visitor Counter : 129