आयुष मंत्रालय
औषधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाचा वनौषधी उद्योग संघटनांशी सामंजस्य करार
Posted On:
24 SEP 2020 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2020
औषधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या एनएमपीबी अर्थात राष्ट्रीय वनौषधी मंडळाने आयुष आणि विविध वनौषधी उद्योग संघटनांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ऐतिहासिक करार केला. या वनौषधी उद्योग संघटनांमध्ये एडीएमए( आयुर्वेदिक ड्रग मॅन्युफॅक्चर असोसिएशन),मुंबई, एएमएएम( असोसिएशन फॉर मॅन्युफॅक्चरर्स ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन्स), नवी दिल्ली, एएमएमओआय( आयुर्वेदिक मेडिसिन्स मॅन्युफॅक्चरर्स ऑर्गनायजेशन, त्रिसूर, एएचएनएमआय( असोसिएशन फॉर हर्बल अँड न्यूट्रास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इंडिया), मुंबई, फिक्की( फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज), नवी दिल्ली आणि सीआयआय( कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) यांचा समावेश आहे. आयुषचे सचिव राजेश कोटेचा यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. या उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ते पाठबळ पुरवण्याची हमी त्यांनी दिली. मात्र, त्यासाठी या उद्योगांनी एक गट बनवावा आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवरील तोडग्यांसह मंत्रालयाशी संपर्क साधावा असे त्यांनी स्पष्ट केले. आयुष प्रणालीच्या विकासासाठी विद्यमान सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
एनएमपीबीने पाठबळ दिलेल्या वनौषधी लागवड आणि संकलन कार्यक्रमातील वनौषधी उत्पादक शेतकरी/ संकलक यांना पुनर्खरेदीची हमी देण्याची ग्वाही या उद्योगांनी एनएमपीबीला दिली. आयुष मंत्रालयाच्या वतीने एनएमपीबीचे सीईओ डॉ. जेएलएन शास्त्री यांनी सामंजस्य करारावर सही केली तर एडीएमएच्या वतीने चंद्रकांत भानुशाली, एएमएएमचे प्रदीप मुलतानी, एएमएमओआयचे डॉ. रामनाथन, एएचएनएमआयचे संजय मरीवाला, फिक्कीचे प्रवीण मित्तल आणि सीआयआयचे राजीव वासुदेवन यांनी त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधित्व केले. आयुष मंत्रालयाने उचललेल्या या महत्त्वाच्या पावलामुळे आयुष, न्यूट्रास्युटिकल आणि वनौषधी उद्योगाला दर्जेदार कच्च्या मालाचा शाश्वत पुरवठा होऊ शकेल, अशी अपेक्षा या उद्योग संघटनांनी व्यक्त केली.
B.Gokhale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1658848)
अभ्यागत कक्ष : 181